अगस्तीच्या डबल-ट्रॉलीचा संगमनेरच्या वाहतुकीला अडथळा! वर्दळीच्या रस्त्यांवर रोजचीच डोकेदुखी; तब्बल तासभर भररस्त्यात ट्रॅक्टर नादुरुस्त..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
पोलिसांच्या नाकर्तेपणातून हमरस्त्यांसह जागोजागी तुंबलेल्या रस्त्यांवरील बेशिस्ती कमी होती म्हणून की काय त्यात आता ऊसाची वाहतूक करणार्‍या डबल-ट्रॉली ट्रॅक्टरची भर पडली आहे. यापूर्वी अशा ट्रॅक्टरमूळे अपघात घडून निष्पापांचे बळी गेल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यातून अशा प्रकारची ऊस वाहतूक करण्यास संगमनेरातून विरोध झाल्यानंतर संगमनेरच्या थोरात कारखान्याने हंगामाच्या काळात खासगी सुरक्षारक्षक नेमून त्यांच्या ऊसाची वाहतूक करणारे ट्रॅक्टर शहराबाहेरील रस्त्याने फिरवले. त्यामुळे शहरातंर्गत रस्त्यांवरील वाढलेली वर्दळ कमी होईल असे अपेक्षित असताना अकोल्याच्या अगस्ती कारखान्याने त्यांची जागा घेतली. ऊसाची वाहतूक करणारे अकोल्याचे ट्रॅक्टर बहुतांशी शहराच्या पूर्वेकडील भागातून ऊस घेवून निघत असल्याने त्यांचा प्रवास शहराच्या मुख्य रस्त्यांसह अतिशय वर्दळीच्या आणि दाटीवाटीच्या रस्त्यावरुन होतो. त्यातच काही ट्रॅक्टर रात्री रिफ्लेक्टर्सशिवाय चालवले जात असल्याने त्यातून अपघात घडल्याचीही उदाहरणे आहेत. वर्दळीच्या रस्त्यावर ट्रॅक्टर चालकाला अंदाज न आल्याने अपघात घडून अनेक निष्पापांचे बळी गेल्याच्या दुर्दैवी घटनाही शहराने अनुभवल्या आहेत. मात्र असे असतानाही त्याकडे दुर्लक्ष करीत अगस्तीचा ऊस वाहणारे असंख्य डबल-ट्रॉली ट्रॅक्टर संगमनेर पोलिसांच्या नाकावर टिच्चून शहरातून बिनधास्त डबलट्रॉलीसह ऊसाची वाहतूक करीत आहेत. अतिशय वर्दळ असलेल्या अकोले नाक्यावर त्यातील एक ट्रॅक्टर आज भर चौकातच नादुरुस्त झाला होता, त्यामुळे सुमारे तासभर चारही बाजूने येणार्‍या वाहतुकीचे बारा वाजले होते. नेहमीप्रमाणे वाहतूक पोलीस कागदावरच असल्याने वाहनधारकांना मोठा मनस्तापही सहन करावा लागला. शहराच्या प्रमुख रस्त्यांवरुन वाहणारी ही रोजची डोकेदुखी शहराबाहेरील रस्त्याने न्यावी अशी मागणीही आता वाढत असून एखाद्या घटनेतून त्याचा डोंब उसळण्याची शक्यता आहे.


सध्या ऊस कापणीचा हंगाम सुरु असल्याने ग्रामीणभागातून मोठ्या प्रमाणात ऊसाची वाहतूक सुरु आहे. ऊस वाहतुकीसाठी पारंपरिक पद्धतीने बैलगाड्यांसह मालट्रकचा वापर होत असताना अलिकडच्या काळात ट्रॅक्टर-ट्रॉलीमधून ऊस वाहतूक सुरु होवून ती मोठ्या प्रमाणात वाढल्याने रस्त्यांवरील वर्दळ वाढली आहे. त्यातच अनेक ट्रॅक्टरचालक रात्रीच्यावेळी ऊसाची वाहतूक करतात, मात्र ट्रॉलीच्या पाठीमागील बाजूस रिफ्लेक्टर्स लावत नसल्याने अपघात घडून अनेकांचे जीवही गेले आहेत. कायद्यात स्पष्ट तरतूद नसण्याची त्रूटी हेरुन सर्रासपणे डबलट्रॉलीचा वापर होत असल्याने चालकाचे त्यावरील नियंत्रण सुटण्याची नेहमीच शक्यता असते. त्यातच वर्दळीच्या रस्त्यांवर वाहने अतिशय दाटीवाटीने चालत असल्याने एरव्ही शहरी रस्त्यांचा फारसा अनुभव नसलेले ट्रॅक्टरचालक गोंधळतात आणि त्यातून अपघाताची शक्यता वाढते, संगमनेर शहरात यापूर्वी अशा असंख्य घटना घडल्या आहेत.


एकीकडे अपघाताची कायम शक्यता निर्माण करणार्‍या या डबल ट्रॅक्टरट्रॉलीचा दुसरीकडे शहरी वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत आहे. भर वर्दळीच्या रस्त्यांवरुन जातांना दुचाकी आणि तीनचाकी वाहनांच्या दाटीत पुढे सरकण्यास धास्तावलेल्या ट्रॅक्टरचालकांमुळे वाहतुकीचा खोळंबा होत असल्याच्याही घटना आहेत. त्यामुळे शहरातून त्याला विरोध वाढल्यानंतर संगमनेरच्या स.म.भाऊसाहेब थोरात कारखान्याने शहराबाहेरील बाह्यवळण रस्त्यांवर खासगी सुरक्षारक्षक नेमून त्यांच्याद्वारे कारखान्याकडे ऊस घेवून निघालेल्या मालट्रक, बैलगाड्यांसह ट्रॅक्टरही बाहेरील रस्त्याने कारखान्याकडे पाठवण्यास सुरुवात केली. त्यातून शहरातंर्गत वाहतुकीचा ताण कमी होवून तासागणिक होणारी जागोजागची वाहतूक कोंडी सावरेल असे अपेक्षित असताना अकोल्याच्या अगस्ती कारखान्यासाठी ऊस वाहतूक करणार्‍या डबल ट्रॅक्टरट्रॉलींनी त्याला छेद दिला आहे.


बहुतेक शहराच्या पूर्वेकडील ऊसपट्ट्यातून अगस्तीच्या दिशेने दररोज दिवसभर सुटणार्‍या या ट्रॅक्टर्सची संख्या मोठी आहे. त्यांना अकोल्याकडे जाण्यासाठी कोल्हार-घोटी राज्यमार्गाचा मुख्य पर्याय आहे. मात्र हा रस्ता शहरातील मेनरोड म्हणून गणला जात असल्याने गवंडीपूरा ते अकोलेनाक्यापर्यंत या रस्त्यावरुन जड वाहतूक होवू शकत नाही. त्याचा पर्याय म्हणून आकाराला आलेल्या व्हाया बसस्थानक बी.एड्.कॉलेज रस्त्याने अकोल्याकडे होणारी बहुतेक वाहतूक होते. सध्या ऊसाचा हंगाम असल्याने सर्वच ठिकाणच्या कारखान्यांचे धुरांडे सुरु आहेत. त्यामुळे कारखान्यांच्या दिशेने जाणार्‍या ऊसवाहनांची संख्याही वाढत आहे. अकोल्याच्या अगस्ती कारखान्याला संगमनेरातून मोठ्या प्रमाणात ऊस जातो. त्याची वाहतूकही शहरातंर्गत जाणार्‍या कोल्हार-घोटी राज्यमार्गाने होत असल्याने जागोजागी वाहतूक कोंडीत भर पडत आहे.


आज (ता.27) सकाळी अकोले नाक्यावरील जाजू पेट्रोल पंपासमोर ऊसाची वाहतूक करणारा असाच एक टडबलट्रॉली ट्रॅक्टर बंद पडला. त्यामूळे चालक फिटर पाहण्यासाठी भर चौकातच अर्धे वळण घेतलेल्या अवस्थेत असलेला ट्रॅक्टर सोडून निघून गेला. अकोलेनाक्यावरील चौफुलीचा हा भाग अतिशय वर्दळीचा समजला जातो. त्यातच आज शनिवार असल्याने शाळेला अर्धी सुट्टी असते. त्यामुळे शाळा सुटण्याच्या वेळेलाच हा ट्रॅक्टर भररस्त्यातच बंद होवून पडल्याने विद्यार्थी, पालक, वाहनधारक, दुकानदार, पादचारी अशा सगळ्यांनाच त्याचा नाहक मनस्ताप भोगावा लागला. त्यातून संगमनेरचे ऊसवाहक ट्रॅक्टर शहराबाहेरुन जात असताना अकोल्याचे ट्रॅक्टर शहरातील रस्त्यांवर का? असा प्रश्‍न उपस्थित होवू लागला असून शहरातून ऊस वाहतुकीला विरोध वाढू लागला आहे.


डबलट्रॉली लावून ऊसाची वाहतूक करणं कायदेशीर दृष्टीने किचकट नाही. कदाचित वाहन कायद्याची निर्मिती होत असताना भविष्यात शेतीच्या कामासाठी वापरल्या जाणार्‍या ट्रॅक्टरचा माल वाहतूक वाहनाप्रमाणे ऊस वाहतुकीलाही वापर होईल असे कायदाकर्त्यांना वाटले नसावे. त्यामुळे कायद्यात वाहतुकीला प्रतिबंध करण्याची कठोर तरतूद नाही. त्याचा गैरफायदा घेवून अलिकडे सर्रासपणे ट्रॅक्टरट्रॉलीचा वापर करुन रात्री-अपरात्री ऊसाची वाहतूक वाढल्याने अपघातांची संख्याही वाढत आहे. त्यात आता अशा वाहनांमुळे शहरातील वाहतुकीच्या समस्याही निर्माण होवू लागल्याने कारखान्यांनी आपापल्या वाहनांसाठी शहराबाहेरील रस्त्यांचे पर्याय देण्याची गरज आहे. पोलीस प्रशासनानेही अशा वाहतुकीला शहरातून मनाई करुन त्यांना बाह्य रस्त्यांचा वापर करण्यास भाग पाडण्याची गरज आहे.

Visits: 128 Today: 2 Total: 1414225

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *