शिक्षिकेंनी केली अनोख्या पद्धतीने वटपौर्णिमा साजरी

नायक वृत्तसेवा, अकोले
प्रशिक्षणामूळे वटपौर्णिमाच्या दिवशी सुट्टी नसल्याने महिला शिक्षिकेंनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अनोखी वटपौणिमा साजरी केली. यावेळी विस्ताराधिकारी सविता कचरे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे व जिल्हा प्रशिक्षण संस्था ( डायट ) संगमनेर, जि. अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रत्येक तालुक्यात वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण आयोजित केले आहे. या प्रशिक्षणामूळे वटपौर्णिमाच्या दिवशी सुट्टी नसल्याने महिला शिक्षिकेंनी अनोख्या पद्धतीने वटपौर्णिमा साजरी करत आपल्या पतींसाठी दीर्घायुष्य चिंतले.

प्रशिक्षण संस्थेने प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील ज्या शिक्षकांचे १२ वर्ष पूर्ण सेवा झाली त्यांना वरिष्ठ व २४ वर्ष सेवा पूर्ण झाली त्यांना निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण महाराष्ट्रभर २ जून ते १२ जून पर्यंत आयोजित केले आहे. अगस्ती कला वाणिज्य व दादासाहेब रुपवते विज्ञान महाविद्यालय येथे हे प्रशिक्षण सुरु आहे. या प्रशिक्षणात वेगवेगळे दिन विशेष साजरे केले जातात.

५ जून रोजी पर्यावरण दिन वृक्षारोपण करून साजरा केला. मंगळवारी वटपौर्णिमेचे औचित्य साधून महिलांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून वटपौर्णिमा साजरी केली. यावेळी रेखा कांबळे यांनी ‘मी सावित्रीबाई फुले बोलते.’ हे स्वागत गीत सादर केले. यात त्यांनी सावित्रीबाई फुले आज असत्या तर त्यांनी कोणते प्रश्न हाताळले असते याची जाणीव सर्वांना करून दिली. सुलभक दीपक पाचपुते यांनी आजच्या स्त्रीयांचे ज्वलंत प्रश्न यावर मनोगत व्यक्त केले. यावेळी जिल्हा प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता प्रा. अरुण भांगरे व तालुका समन्वयक विस्ताराधिकारी सविता कचरे उपस्थित होते. यावेळी शिक्षकांतर्फे सर्व महिला शिक्षिकेंना पेन व गुलाबपुष्प देऊन त्यांचा सत्कार केला.

Visits: 105 Today: 2 Total: 1105399
