भरकटलेला रानगवा थेट पुणे-नाशिक महामार्गावर! अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू; वन्यजीवांची सुरक्षा पुन्हा चव्हाट्यावर..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
आपल्या नैसर्गिक अधिवासातून भरकटत थेट संगमनेर तालुक्यातील पठारभागात पोहोचलेल्या रानगव्याला भरधाव वेगाने जाणार्‍या अज्ञात वाहनाची धडक बसली. गुरुवारी सकाळी घडलेल्या या घटनेत जवळपास एक हजार किलो वजनाच्या रानगव्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा महामार्गावरच तडफडून मृत्यू झाला. या घटनेनंतर रस्त्याने जाणार्‍यांनी बहुधा तालुक्यात पहिल्यांदाच दिसलेल्या या वन्यजीवाला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली. याबाबत वनविभागाला माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने डोळासण्यात धाव घेत मृत रानगव्याचे शवविच्छेदन करीत पुढील कार्यभाग उरकला. या अपघातातून वन्यजीवांची सुरक्षा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली असून राजमार्ग प्राधिकरणाच्या हलगर्जीपणामुळे आणखी एका वन्यजीवाचा बळी गेला आहे.


याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सदरचा प्रकार गुरुवारी (ता.6) पहाटेच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावरील डोळासणे शिवारात घडला. या घटनेत तालुक्यात बहुधा पहिल्यांदाच दिसलेला रानगवा महामार्ग ओलांडीत असताना भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. या अपघातात रानगव्याला मोठ्या प्रमाणात इजा होवून त्यातून रक्तस्राव सुरु झाला. या प्रकाराने घाबारलेला वाहनचालक वाहनासह तेथून पसार झाला. पहाटेची वेळ असल्याने या परिसरातून तुरळक प्रमाणात वाहतूक सुरु होती. त्यामुळे रक्तबंबाळ होवून रस्त्याच्या कडेला पडलेल्या जखमी रानगव्याकडे कोणाचे लक्ष गेले नाही.


मात्र दिवस उजेडताच शाळकरी विद्यार्थी आणि दूध घालण्यासाठी निघालेल्या शेतकर्‍यांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत वनविभागाला कळविले. तो पर्यंत महामार्गाने जाणार्‍यांना रानगवा असल्याचे दिसताच ठार झालेल्या गव्यासोबत फोटो काढण्यास अनेकांनी गर्दी केली. त्यामुळे महामार्गावरील वाहतूकही संथ झाल्याने डोळासणे महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गर्दी हटवली. बिबट्या प्रमाणेच रानगवाही वन्यजीव सुरक्षा कायद्याखाली संरक्षित प्राणी आहे. त्या दरम्यान तेथे पोहोचलेल्या वनविभागाने रानगव्याची तपासणी केली असता तो ठार झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्याचा पंचनामा करुन शवविच्छेदनही करण्यात आले आहे.


संगमनेर तालुका डोंगरी म्हणून ओळखला जातो. तालुक्याला लागूनच अकोले तालुका आणि कळसूबाई-हरिश्‍चंद्रगड अभयान्याचा भाग असून त्याशिवाय दक्षिणेकडील बाजूला माळशेजच्या जंगलांसह जुन्नर तालुक्याची हद्द आहे. त्यामुळे संगमनेर तालुक्यात बिबटे, तरस यासारख्या हिंस्त्र पशूंसह अन्य वन्यजीवांचा नेहमीच वावर असल्याचे बघायला मिळतेे. मात्र गुरुवारच्या घटनेत चक्क तालुक्यात बहुधा पहिल्यांदाच रानगव्याचेही दर्शन घडले. मात्र वनविभागातील काही निवृत्त अधिकार्‍यांनी हा प्राणी यापूर्वीही बाळेश्‍वर टेकड्यांच्या परिसरात पाहिला गेल्याची माहिती दिली असून डोळासण्याजवळ अपघातात ठार झालेला रानगवा माळशेज घाटातून भरकटत आला असण्याची शक्यता वर्तवली आहे.


खरेतरं, पुणे-नाशिक महामार्गाची निर्मिती करताना मानवासह वन्यजीवांना रस्ता ओलांडताना अपघात होवू नये यासाठी वन्यजीवांचा वावर असलेल्या ठिकाणांवर भूयारीमार्ग (अंडरपास) करण्याचा प्रस्ताव होता. मात्र संबंधित ठेकेदार कंपनीने राजमार्ग प्राधिकरणातील काही अधिकार्‍यांना हाताशी धरीत अशी अनेक कामे आजवर पूर्ण केली नाहीत अथवा ती परिपूर्ण नाहीत. त्याचा परिणाम आजवर या महामार्गावर अनेक निष्पाप नागरिकांसह असंख्य वन्यजीवांनाही आपला जीव गमवावा लागला आहे, त्यात गुरुवारी एका रानगव्याचीही भर पडली आहे. या घटनेने संगमनेर तालुक्यातील वन्यजीवांच्या सुरक्षेचा विषय पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.


पाच वर्षांपूर्वी 9 डिसेंबर 2020 रोजी पुण्यातील कोथरुडमध्ये जंगलातून भरकटलेला रानगवा मानवी वसाहतीत शिरला होता. त्याला पाहण्यासाठी चोहोबाजूंनी गर्दी झाल्याने सैरभैर झालेल्या रानगव्याने घाबरुन अनेक ठिकाणांहून बाहेर पडण्याचे मार्ग शोधताना संरक्षक भिंतींना धडका दिल्या. जवळजवळ दिवसभर चाललेल्या या प्रकाराने धावून धावून दमलेला रानगवा अखेर हुल्लबाजांचा बळी ठरला आणि गतप्राण झाला. त्या विरोधात कोथरुडमधील रहिवाशांनी विरोधही केला आणि या घटनेची आठवण म्हणून 9 डिसेंबर 2021 रोजी कोथरुडमध्ये मृत्यू झालेल्या गव्याचे श्राद्धही घातले. संगमनेरात असाप्रकार घडेल याची अपेक्षा नसली तरीही पुणे-नाशिक महामार्गावर वन्यजीवांसाठी प्रस्तावित असलेल्या अंडरपासच्या कामासाठी गणेश बोर्‍हाडे यांनी चालवलेल्या लढ्याला पाठबळ मिळाले तरीही अनेक वन्यजीवांचे प्राण वाचू शकतील. डोळासण्याजवळ ठार झालेल्या गव्याला जमिनीखालून रस्ता सापडला असता तर कदाचित त्याचा जीवही वाचला असता.

Visits: 150 Today: 2 Total: 1106468

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *