नगराध्यक्षपदासाठी संगमनेरात चौरंगी लढतीची शक्यता! सन्मानजनक जागा नसल्यास स्वबळावर; ठाकरे सेनेचा आघाडीला इशारा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
उमेदवारी दाखल करण्याचा दिवस समोर असतानाही केवळ बैठकांवर बैठकांचे सत्र सुरु असल्याने जिल्ह्यातील महाविकास आघाडीत सर्वकाही आलबेल नसल्याचे चित्र दिसत आहे. त्यातच ठाकरेसेनेसह आघाडीतील उर्वरीत मित्रपक्षांची शुक्रवारी संगमनेरात बैठक झाल्याने या चर्चेला बळ मिळाले असून त्यातून संगमनेरात चौरंगी लढतीची शक्यता निर्माण झाली आहे. उबाठाचे जिल्हाप्रमुख सचिन कोते यांनी कोपरगाव, राहाता, शिर्डीच्या नगराध्यक्षपदाची मागणी केली असून संगमनेर व श्रीरामपूरच्या जागा काँग्रेससाठी सोडण्याची तयारी दाखवली आहे. त्यांच्या या मागणीला काँग्रेसचे ज्येष्ठनेते बाळासाहेब थोरात कितपत महत्त्व देतात यावर उत्तरेतील अन्य शहरांसह संगमनेरातील महाविकास आघाडीचे भवितव्य अवलंबून असणार आहे. गेल्या दोन दिवसांतील घडामोडी पाहता उत्तर नगरजिल्ह्यात महाविकास आघाडी एकसंध राहण्याची शक्यता मावळत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

पुढील महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यातील 246 नगरपालिकांसह 42 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका पार पडणार
आहेत. त्याची प्रक्रियाही सुरु झाली असून सोमवारपासून (ता.10) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होत आहे. यावेळी महायुतीकडून जिल्ह्याची सूत्र पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे असल्याने त्यांनी मित्रपक्षांशी समन्वयातून संवाद साधताना अद्यापपर्यंत महायुती एकसंध ठेवण्यात यश मिळवले आहे. डॉ.सुजय विखे-पाटील यांनी संगमनेरातील मेळाव्यातून वेगळा विचार करणार्या सहकार्यांना गर्भित इशाराही दिल्याने त्याचा परिणामही या यशात दिसून येतो.

विरोधकांकडून काँग्रेसचे ज्येष्ठनेते, माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी जिल्हा निवडणुकीची सूत्रे आपल्या हाती घेत दोनच दिवसांपूर्वी शिर्डीत पत्रकारांशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी जिल्ह्यात महाविकास आघाडी म्हणूनच स्थानिक स्वराज्य
संस्थांच्या निवडणुका लढवणार असल्याचे वक्तव्य केले होते. मित्रपक्षांशी बोलणी सुरु असून सर्वांचा सन्मान ठेवण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी आपल्या देहबोलीतून दर्शवले होते. मात्र त्याच्या दुसर्याच दिवशी शुक्रवारी (ता.7) महाविकास आघाडीतील प्रमुख घटकपक्ष असलेल्या ठाकरे सेनेच्या जिल्हाध्यक्षांनी संगमनेरात बैठक बोलावली. विशेष म्हणजे या बैठकीला काँग्रेस वगळता आघाडीतील उर्वरीत पक्षाचे पदाधिकारी उपस्थित असल्याचा दावाही करण्यात आला.

या बैठकीत कोते यांनी उत्तर नगरजिल्ह्यातील स्थितीवर माहिती देताना आघाडी म्हणून एकत्र असल्याचे सांगत कोपरगाव, शिर्डी व राहाता येथील नगराध्यक्षपदासह उर्वरीत सर्व ठिकाणी नगरसेवकपदाच्या सन्मानजनक जागा देण्याची मागणी केली.
गेल्याकाही दिवसांपासून यासंदर्भात त्यांच्यात वाटाघाटीही सुरु आहेत. त्यातून कोणताही निष्कर्ष समोर येण्यापूर्वीच कोते यांनी राहाता व शिर्डीच्या नगराध्यक्षपदावर आपला दावा जाहीर केल्याने या चर्चांमध्ये एकप्रकारे विरजन पडले आहे. त्याचे प्रतिबिंब संगमनेरच्या बैठकीतही दिसून आले. ऐनवेळी काँग्रेसकडून अनपेक्षित निर्णय घडल्यास धावपळ टाळण्यासाठी इच्छुक उमेदवारांना कागदपत्रांसह तयार राहण्याची सूचनाही या बैठकीतून देण्यात आली.

त्यामुळे संगमनेरसह उत्तरनगरजिल्ह्यात महाविकास आघाडीच्या एकसंध राहण्यावर शंका निर्माण झाली असून असे घडल्यास उत्तरेतील सर्व शहरांमध्ये उबाठा गटाचे उमेदवारही स्वतंत्रपणे निवडणुकीच्या रिंगणात दिसतील. एकीकडे महाविकास आघाडीत फाटाफूट होण्याची शक्यता असताना दुसरीकडे एमआयएमकडूनही शहरात चाचपणी सुरु आहे. या पक्षाच्या
जिल्हाप्रमुखांना भेटून काहींनी उमेदवारीची तयारी दाखवली असून पक्षाला चांगले यश मिळण्याचा भरवसा दिला आहे. त्यामुळे त्यांच्याकडूनही नगराध्यक्षपदाचा उमेदवार घेाषित झाल्यास आश्चर्य निर्माण होणार नाही. अशा स्थितीत संगमनेरात 2016 सालची पुनरावृत्ती होवून चौरंगी लढतीची शक्यता दाटत आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठनेते, माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार असल्याचे वक्तव्य शिर्डीत केले होते. त्यातून जिल्ह्यात दुरंगी लढतीचे चित्र निर्माण होत असतानाच उबाठा गटाच्या जिल्हाप्रमुखांनी शुक्रवारी (ता.7) संगमनेरात आघाडीतील शरद पवार गटासह वंचित आघाडीच्या पदाधिकार्यांसोबत बैठक घेवून एकत्रित लढण्याबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याची माहिती दिली. ऐनवेळी धावपळ नको म्हणून नगराध्यक्षासह सर्वजागांवर इच्छुकांनी तयारी करावी अशा सूचनाही त्यांच्याकडून देण्यात आल्या. शिवाय राहाता व शिर्डी येथील नगराध्यक्षपदाची जागा ठाकरेसेनाच लढवणार यावर ते ठाम असल्याने उत्तरेत महाविकास आघाडी एकसंध राहण्याची शक्यता मावळत असल्याचे चित्र दिसत आहे.

