सप्टेंबर महिन्याने घेतले तालुक्यातील सतरा कोविड बाधितांचे बळी! गेल्या दोन दिवसांतच ग्रामीणभागातील तिघांचा संक्रमणातून झाला मृत्यू


नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागात सुरु झालेला कोविडचा कहर आता अधिक व्यापक झाला आहे. दररोज बसणार्‍या रुग्णवाढीच्या धक्क्यांसोबतच अधुनमधून रुग्ण दगावल्याच्या वार्ताही वाढल्याने तालुक्यात कोविड विषयी भितीदायक वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या एक सप्टेंबरपासून सुरु झालेली ही श्रृंखला महिन्याच्या अखेरच्या टप्प्यातही कायम असून मागील दोन दिवसांत तालुक्याच्या ग्रामीण क्षेत्रातील तिघांचा बळी गेल्याने रुग्णसंख्येसोबतच कोविड बळींची संख्याही वाढली आहे. सद्यस्थितीत तालुका 31 व्या शतकाच्या उंबरठ्यावर 3 हजार 87 वर पोहोचला असून शासकीय नोंदीनुसार आत्तापर्यंत 38 जणांचे बळी गेले आहेत. या महिन्याच्या पहिल्याच दिवशी माळीवाड्यातील सत्तर वर्षीय इसमाचा बळी गेला होता, त्यानंतर महिन्याभरात आजवर टप्प्याटप्प्याने तालुक्यातील 17 जणांचे बळी गेले असून 1 हजार 367 रुग्णांचीही आजवरची विक्रमी भर पडली आहे.


वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांच्या पूर्वानुमानानुसार सप्टेंबरमध्ये संगमनेर तालुक्याच्या रुग्णवाढीचा वेग गतीमान होण्याची अपेक्षा होती, त्यानुसार गेल्या 26 दिवसांची आकडेमोड पाहता तसे घडलेही. या अनुमानानुसार 2011 सालच्या जनगणनेनुसार रुग्णवाढीबाबत काही अंदाजही वर्तविण्यात आले होते, त्यातून शहरी भागातील रुग्णवाढीचा वेग कमी कमी होत जाणार असल्याचा महत्त्वाचा अंदाजही दैनिक नायकच्या माध्यमातून वर्तविण्यात आला होता. संगमनेर शहराची लोकसंख्या अंदाजित 80 हजार गृहीत धरुन शहरीभागातील रुग्णसंख्या एक हजार ते अकराशेच्या आसपास पोहोचण्याची अंदाज आहे. रविवारी रात्री उशीरापर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार आत्तापर्यंत शहरात 940 रुग्ण समोर आले असून 13 जणांचा बळी गेला आहे.


तर तालुक्याच्या ग्रामीणभागातील लोकसंख्या चार लाख गृहीत धरुनही अंदाज वर्तविण्यात आला होता. त्यानुसार ग्रामीणक्षेत्रात साधारणतः साडेतीन ते चार हजारांच्या आसपास रुग्ण आढळून तालुक्यातील एकुण बाधितांची संख्या साडेचार ते पाच हजारांपर्यंत जाण्याचा वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांचा अंदाज आहे. त्यासाठी संगमनेर तालुक्यातील वातावरण, येथील नागरिकांची प्रतिकार क्षमता, संक्रमणाचा गेल्या काळातील प्रवास आणि त्यातून पसरलेला संसर्ग, लोकसंख्येनिहाय संसर्ग पसरण्याची सरासरी या सर्वांचा गुणाकार आणि भागाकार आणि टक्केवारीतून आपल्याकडील कोविड संक्रमणाचा सरासरी सदर 1.36 ते 1.40 टक्के गृहीत धरुन ही आकडेमोड काढण्यात आली होती.


शहरातील लोकसंख्या 80 हजार गृहीत धरुन हा अंदाज वर्तविण्यात आला होता. त्यानुसार गेल्या 1 सप्टेंबरपासून शहरीभागातील रुग्णसंख्येत अचानक रिव्हर्स गिअर पडल्याचे दिसत आहे. दररोज समोर येणार्‍या बाधितांच्या संख्येत शहरातील जेमतेम रुग्णांचा समावेश असणं या अंदाजाला पाठबळ देणारं ठरत आहे. गेल्या 26 दिवसांचा विचार करता तालुक्याच्या एकुण रुग्णसंख्येत तब्बल 1 हजार 367 रुग्णांची भर पडली, मात्र यातील केवळ 242 रुग्ण शहरी भागातील असून या कालावधीत ग्रामीणभागात त्यापेक्षा पाचपट अधिक म्हणजे 1 हजार 125 रुग्ण समोर आले आहेत.


या महिन्यात तालुक्यातील मृतांच्या संख्येतही मोठी भर पडल्याचे दिसून येत आहे. गेल्या दोन दिवसांतच यात तब्बल तिघांची भर पडली आहे. गेल्या 18 सप्टेंबररोजी बाधित आढळलेल्या निमगाव बुद्रुक येथील 64 वर्षीय इसमाचा गेल्या शनिवारी (ता.26) तर गेल्या 23 सप्टेंबररोजी घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल झालेल्या हिवरगाव पठारावरील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह सोमवारी (ता.21) बाधित आढळलेल्या सायखिंडी येथील 40 वर्षीय तरुणाचा रविवारी (ता.27) दुर्दैवी मृत्यु झाला. या तिघांच्या मृत्युने शासकीय नोंदीवरील मृतांची संख्या 38 च्या घरात गेली आहे. तर अनधिकृत माहितीनुसार आत्तापर्यंत 43 जणांचा बळी गेला आहे. एकीकडे संगमनेर शहरातील कोविडचे संक्रमण काही प्रमाणात नियंत्रणात आल्याचा दिलासा मिळत असतांना दुसरीकडे ग्रामीणक्षेत्रातील दररोजची रुग्णवाढ आणि त्यातच या महिन्याभरात कोविडने बळी जाणार्‍यांच्या संख्येत झालेली वाढ नागरिकांमधील कोविडची भिती कायम ठेवण्यास कारणीभूत ठरली आहे.


सप्टेंबरने आत्तापर्यंत घेतले सतरा जणांचे बळी!
या महिन्यात आत्तापर्यंत तालुक्याच्या रुग्णसंख्येत 1 हजार 367 रुग्णांची भर पडण्यासोबतच तालुक्यातील 17 जणांचे बळीही गेले आहेत. यात शहरीभागातील तिघांचा तर ग्रामीणभागातील 14 जणांचा समावेश आहे. गेल्या 1 सप्टेंबरपासून शहरातील माळीवाड्यातील 70 वर्षीय इसम, पंपींग स्टेशन परिसरातील 73 वर्षीय महिला व गांधी चौकातील 70 वर्षीय इसमाचा तर समनापूर येथील 62 वर्षीय इसम, मालदाड येथील 35 वर्षीय तरुण, चंदनापूरी येथील 74 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 39 वर्षीय इसम, चिखली येथील 76 वर्षीय महिला, घुलेवाडी येथील 80 वर्षीय वयोवृद्ध नागरिक, हिवरगाव पठार येथील 70 व 55 वर्षीय इसम, वेल्हाळे येथील 65 वर्षीय इसम, मंगळापूर येथील 65 वर्षीय इसम, कौठे धांदरफळ येथील 55 वर्षीय इसम, मनोली येथील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, निमगाव बुद्रुक येथील 64 वर्षीय इसम व सायखिंडीतील 40 वर्षीय तरुणाचा समावेश आहे. याशिवाय श्रीरामपूर तालुक्यातील एक व कोपरगाव तालुक्यातील दोघांचाही या महिन्यात संगमनेरातील खासगी रुग्णालयात मृत्यु झाला आहे.

जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 89.33 टक्के..
जिल्ह्यातील कोविड रुग्णांच्या संख्येत दररोज भर पडत आहे. मात्र त्याचवेळी जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या कोविड केअर आणि कोविड हेल्थ सेंटर मधून रुग्ण बरे होवून घरी परतणार्‍यांची संख्याही रोज नवनवीन विक्रम नोंदवित आहे. आजही जिल्ह्यातील 856 रुग्णांना उपचारांती घरी सोडण्यात आले. त्यामुळे आता जिल्ह्यात उपचार पूर्ण करुन घरी परतणार्‍या रुग्णांची एकुण संख्या 37 हजार 531 झाली आहे. सकाळच्या सत्रात जिल्ह्याच्या रुग्णसंख्येत 53 नवीन रुग्णही वाढले आहेत. आज घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांमध्ये अहमदनगर महापालिका क्षेत्रातील 235, संगमनेर 74, राहाता व राहुरी प्रत्येकी 54, जामखेड 47, पारनेर 44, कोपरगाव 43, अकोले व श्रीरामपूर प्रत्येकी 42, नगर तालुका व नेवासा प्रत्येकी 39, पाथर्डी 35, शेवगाव 29, श्रीगोंदा 24, लष्करी रुग्णालय 21, लष्करी परिसरातील 11 व अन्य जिल्ह्यातील दोघांचा समावेश आहे.

Visits: 5 Today: 1 Total: 29743

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *