लोणीच्या दिशेने घोंगावणारे लाल वादळ संगमनेरात शमले? विद्यमान महसूलमंत्र्यांची माजी महसूलमंत्र्याच्या गावात शिष्टाई; अन्य दोन मंत्र्यांचाही समावेश..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
मागील लाँगमार्च आंदोलनात दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता होत नसल्याने त्याची आठवण करुन देण्यासाठी बुधवारी अकोल्यातून लोणीच्या दिशेने घोंगावत निघालेले लाल वादळ संगमनेरात शमले आहे. आंदोलनकर्ते अकोल्यात असतांनाच महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांना चर्चेचे निमंत्रण दिले होते, मात्र त्यानंतरही आंदोलक ठाम राहीले व सायंकाळी पंधरा किलोमीटरचे अंतर कापून तालुक्याच्या वेशीवरील धांदरफळात त्यांनी तळ ठोकला. आज दुपारनंतर हा लाँगमार्च वडगाव पानमध्ये मुक्कामी पोहोचणार होता. मात्र तत्पूर्वीच जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी आंदोलकांशी संवादाला सुरुवात केली. दुपार होताहोता महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपला नियोजित कार्यक्रम बदलून आदिवासी विकास व कामगार कल्याण खात्याच्या सहकारी मंत्र्यांसह आंदोलनाचे निमंत्रक कॉ.डॉ.अजित नवले यांच्यासह अन्य बत्तीस मोर्चेकर्‍यांशी संगमनेरच्या प्रशासकीय भवनात वाटाघाटी केल्या. त्या यशस्वी ठरल्याचे वृत्त असून काही वेळातच आंदोलनास्थळावर होणार्‍या पत्रकार परिषदेत त्याची अधिकृत घोषणा होणार आहे.


मागील वेळी अखिल भारतीय किसान सभेने आपल्या विविध मागण्यांसाठी नाशिक ते मुंबई लाँगमार्च काढला होता. हा मार्च शहापूर तालुक्यात पोहोचल्यानंतर शासनाने त्यांच्याशी वाटाघाटी करुन काही गोष्टींची तत्काळ पूर्तता केली तर प्रमुख गोष्टी ठराविक कालावधीत पूर्ण करण्याचे आश्‍वासन दिले. त्याचा कालावधी संपूनही राहिलेल्या मागण्यांची पूर्तता होत नसल्याने राज्य सरकारला आश्‍वासनांची आठवण देण्यासाठी किसान सभेने बुधवारी सायंकाळी अकोल्यातून लोणीच्या दिशेने प्रवास सुरु केला. रात्री दहाच्या सुमारास हे लाल वादळ संगमनेर तालुक्याच्या वेशीवरील धांदरफळ शिवारात रामेश्‍वर मंदिराच्या प्रांगणात येवून विसावलं.


सकाळी रामेश्‍वर ते अकोले रस्त्यावरील खतोडे लॉन्सपर्यंत प्रवास ठरला होता. दुपारच्या जेवणानंतर काहीसा विसावा आणि त्यानंतर उन्हाचा तडाखा कमी झाल्यानंतर संगमनेर शहर ओलांडून नऊ किलोमीटर अंतरावरील वडगावपान मध्ये जावून थांबणार होता. मात्र तत्पूर्वीच सकाळी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी डॉ.अजित नवले यांच्यासह प्रमुख आंदोलकांशी रामेश्‍वर मंदिराच्या प्रांगणातच संवाद साधला. आंदोलकांनी चर्चेतून मार्ग काढावा असे आवाहन बुधवारीच महसूलमंत्री विखे यांनी केले होते. त्यासाठी आज सकाळपासून ते संगमनेर तालुक्याच्या आसपासच थांबणार होते. मोर्चेकर्‍यांच्या शिष्टमंडळाने संगमनेरात चर्चेची तयारी दाखवल्यानंतर संगमनेरच्या प्रशासकीय भवनात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित, कामगार कल्याण मंत्री सुरेश खाडे, जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.


आंदोलक किसान सभेच्या वतीने निमंत्रक डॉ.अजित नवले यांच्यासह डॉ.अशोक ढवळे, उमेश देशमुख, चंद्रकांत गोरखाना, किसन गुजर, रडका कलांगडा, यशवंत झाडे, उद्धव पोळ, माणिक अवघडे, रमेश चौधरी, चंद्रकांत वरण, विजय काटेला, शंकर सिडाम, अजय बुरांडे, गोविंद आर्दड, अनिल गायकवाड, महादेव गारपवार, अमोल वाघमारे, सदाशीव साबळे, किरण गहला, डॉ.अशोक थोरात, संगिता साळवे, सुनिता पथणे, सचिन ताजणे, नामदेव भांगरे, निर्मला नागे, रंजना पर्‍हाड, डॉ.करण घुले, नंदू डहाळे, संतोष वाडेकर, अण्णासाहेब शिंदे, अनिता साबळे अशा एकूण 33 आंदालकांचा समावेश होता.


प्रशासकीय भवनात दीर्घ चाललेल्या बैठकीत किसान सभेने मांडलेल्या बहुतेक मुद्द्यांवर एकमत झाल्याचे समजते. त्याबाबतची अधिकृत घोषणा मात्र बंद दाराआड न करता आंदोलकांच्या समोर करावी अशी सूचना आंदोलकांनी केली, ती मान्य करुन प्रशासनाने महसूल व जिल्ह्याचे पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित, कामगार मंत्री सुरेश खाडे व जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्या उपस्थितीत धांदरफळच्या रामेश्‍वर मंदिराच्या प्रांगणात पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. काही वेळातच मंत्रीगण व आंदोलकांचे प्रमुख संयुक्त पत्रकार परिषदेत याबाबत घोषणा करतील असा अंदाज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *