संगमनेर नामदार चषकाचा साई छत्रपती घुलेवाडी संघ मानकरी तरुणाईच्या जल्लोषात संगमनेरकरांनी अनुभवला आयपीएलचा थरार


नायक वृत्तसेवा, संगमनेर
काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित व उपक्रमशील असलेल्या संगमनेर शहरात युवकांच्या क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी राजवर्धन यूथ फाऊंडेशनच्यावतीने आयोजित केलेल्या प्रतिष्ठेचा नामदार चषक 2023 हा अटीतटीच्या सामन्यात साई छत्रपती राहुल राऊत इलेव्हन घुलेवाडी या संघाने पटकावला आहे.

ग्रामीण व शहरी भागातील युवकांसाठी असलेल्या नामदार चषक 2023 चे आयोजन राजवर्धन यूथ फाऊंडेशनच्यावतीने जाणता राजा मैदानावर करण्यात आले होते. अत्यंत भव्य दिव्य असलेल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत आयपीएलच्या धरतीवर 16 संघांनी सहभाग घेतला. थेट प्रक्षेपण, अत्याधुनिक सुविधा, षटकार-चौकारांची आतिषबाजी, विद्युत रोषणाई, भव्यदिव्य व्यासपीठ यामुळे ही स्पर्धा खूप लोकप्रिय ठरली.

अंतिम सामन्यासाठी काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात, कांचन थोरात, कर्करोगतज्ज्ञ डॉ. जयश्री थोरात, उद्योगपती राजेश मालपाणी, कर्करोगतज्ज्ञ डॉ. हसमुख जैन, के. के. थोरात, नवनाथ अरगडे, रामहरी कातोरे, डॉ. निजानंद खामकर, शतानंद खामकर, निखील कातोरे, अजय फटांगरे, गोरख कुटे, योगेश भालेराव, दीपक करंजकर आदी उपस्थित होते. या अंतिम सामन्यात घुलेवाडी येथील साई छत्रपती राहुल राऊत 11 संघाने वडगाव पान येथील आयुष्य संघावर 1 धावेने मात केली. घुलेवाडी संघाने प्रथम फलंदाजी करताना सहा षटकांत 58 धावा केल्या. तर आयुष्य संघाला 57 धावा करता आल्या. यामध्ये घुलेवाडीच्या अमोल दुबेने गोलंदाजी व फलंदाजीत आपले कौशल्य दाखल मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवला. तर आयुष्याच्या जिग्नेश पटेलने पूर्ण स्पर्धेत 15 विकेट घेऊन सर्वांचे लक्ष वेधले.

याप्रसंगी बोलताना आमदार थोरात म्हणाले, खेड्यातील युवकांमध्ये मोठी गुणवत्ता असून आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्याची त्यांची क्षमता आहे. क्रिकेटमध्ये संगमनेरचा अजिंक्य रहाणे यांनी तालुक्याचे नाव मोठे केले असून नुकतीच आश्वी येथील पूनम खेमनर हिची सुद्धा आयपीएल संघात निवड झाली आहे हे संगमनेरकरांसाठी अभिमानास्पद आहे. राजवर्धन यूथ फाऊंडेशनच्या या स्पर्धेचा लौकिक राज्यात दिवसेंदिवस वाढत असून यामध्ये अनेक खेळाडू सहभाग घेत असतात. आनंदाच्या वातावरणात संपन्न होणारी मोठी स्पर्धा असून खेळामध्ये जय-पराजय होतच असतात. परंतु या खेळातून सांघिक भावना वाढीस लागते. आगामी काळातही या स्पर्धेत राज्यातील मोठ-मोठे खेळाडू सहभागी होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केल्या असून या चषकाच्या आयोजनासाठी काम केलेल्या सर्व तरुणांचे आमदार थोरात यांनी कौतुक केले.

या स्पर्धेतील प्रथम विजेता साई छत्रपती राहुल राऊत 11 घुलेवाडी या संघाला के. के. थोरात यांच्याकडून 1 लाख 21 हजार रुपये रोख रक्कम व सन्मानचिज्ञह देऊन गौरविण्यात आले. तसेच संघ मालकास पल्सर दुचाकी देण्यात आली. तर उपविजेत्या ठरलेल्या आयुष्य इलेव्हन वडगाव संघाला 71 हजार रुपये रोख रक्कम व एलईडी टीव्ही डॉ. निजानंद खामकर व सदानंद खामकर यांच्याकडून देण्यात आले. तृतीय क्रमांकाच्या शिरसाट स्पोर्ट्स मनोली संघाला आर. एम. कातोरे व निखील कातोरे यांच्याकडून 51 हजार रुपये व चषक देण्यात आला. तर चतुर्थ क्रमांकाच्या जीपी योद्धा संघाला अजय फटांगरे यांच्याकडून 33 हजार 333 रुपये रोख व चषक देण्यात आला. याचबरोबर पवन धाडीवाल यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीज, सुनील गुंजाळ व आर. डी. थोरात यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाज, अनुप अरगुडे यांच्याकडून सर्वोत्कृष्ट गोलंदाज, सात्विक पंडित यांच्याकडून सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक, अनिल कांदळकर यांच्याकडून सर्वाधिक षटकार, गौरव डोंगरे यांच्याकडून उत्कृष्ट खेळाडू, हर्षल राहणे यांच्याकडून विकेट हॅट्रिक, विराज मोरे यांच्याकडून सर्वोत्कृष्ट आयडॉल, बाळासाहेब ताजणे यांच्याकडून सर्वोत्कृष्ट तालुका, मधुसूदन दायमा यांच्याकडून सर्वोत्कृष्ट संघ, राऊत मामा यांच्याकडून निर्धाव षटक हे पुरस्कार देण्यात आले. नरेंद्र पवार व अभिजीत पुंड यांनी स्पर्धेला चेंडू पुरवले. या स्पर्धेच्या सर्वसामान्यांचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले होते. विद्युत रोषणाईने नटलेल्या जाणता राजा मैदानावर ढोल ताशांची व फटाक्यांची आतिषबाजी, प्रेक्षकांची उपस्थिती, तरुणाईचा जल्लोष यामुळे ही स्पर्धा अभिनव व संस्मरणीय ठरली. या स्पर्धेच्या आयोजनासाठी राजवर्धन यूथ फाऊंडेशनच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Visits: 17 Today: 1 Total: 117786

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *