आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर संगमनेरच्या कसायांना पोलिसांचा दणका! खांजापूरच्या डोंगरदर्यात धडक कारवाई; बत्तीस गोवंश जनावरांची कत्तलीतून सुटका
नायक वृत्तसेवा, संगमनेर
आषाढी एकादशीच्या निमित्ताने राज्यभरातील वेगवेगळ्या संतांच्या दिंड्या पंढरीच्या वेशीवर पोहोचत असताना आणि अवघा महाराष्ट्र विठुरायाच्या भक्तिरसात चिंब होत असताना संगमनेरातून अतिशय धक्कादायक वृत्त समोर आले आहे. पोलिसांकडून वारंवार आवाहन करुनही बकरी ईदच्या निमित्ताने कुर्बानी देण्यासाठी अतिशय निर्दयीपणे डोंगरदर्यात डांबून ठेवलेल्या तब्बल 32 गोवंश जनावरांची मंगळवारी (ता.27) पोलिसांनी सुटका केली. या कारवाईला बजरंग दलासह स्थानिक नागरिकांचाही पाठिंबा मिळाला. ताब्यात घेण्यात आलेल्या सर्व जनावरांना स्थानिक वाहनचालकांच्या मदतीने सायखिंडीच्या जीवदयामध्ये सुखरुप सोडण्यात आले आहे.
याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, सदरची कारवाई मगळवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास खांजापूर-कुरण शिवारातील डोंगराळ माळरानात करण्यात आली. या परिसरात कत्तलीच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात गोवंश जनावरे निर्दयीपणाने बांधून ठेवल्याची माहिती शहर पोलिसांना समजली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव यांनी पोलीस पथकासह या परिसरात छापा घातला असता जागोजागी काटवनात मोठ्या प्रमाणात गोवंश बांधून ठेवल्याचे त्यांना आढळून आले.
या कारवाई दरम्यान पोलिसांना स्थानिक नागरिक आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचे सहकार्य मिळाले. या भागात निर्दयीपणाने बांधून ठेवलेली 32 गोवंश जनावरे सोडवून स्थानिक वाहनचालकांच्या मदतीने त्यांना सायखिंडी येथील जीवदया पांजरपोळमध्ये पाठविण्यात आले. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल राधाकिसन मुकरे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यावरुन पोलिसांनी अज्ञात इसमाविरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यासह प्राण्यांना निर्दयतेने वागणूक दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पोलिसांनी 1 लाख 32 हजार रुपयांच्या 32 गोवंश जनावरांसह 25 हजार रुपये किंमतीच्या दोन मोटारसायकली जप्त केल्या आहेत.
गुरुवारी हिंदू धर्मियांचा आषाढी एकादशी आणि मुस्लिम धर्मियांचा बकरी ईदचा सण आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील विविध ठिकाणच्या पोलीस अधिकार्यांनी हिंदू-मुस्लिम समाजातील नागरिकांच्या बैठका घेऊन सलोखा कायम ठेवण्यासाठी आषाढीच्या दिवशी मुस्लिमांनी कुर्बानी देऊ नये असे आवाहन केले होते. परंतु, सदर ठिकाणी सापडलेली गोवंश जनावरे कत्तलीच्या हेतूनेच निर्दयीपणोन बांधून ठेवण्यात आलेली होती. मात्र, त्यांची कत्तल होण्यापूर्वीच पोलिसांनी तेथे छापा घातल्याने त्या 32 गोवंशांना जीवदान मिळाले आहे.