आता रतनवाडीतही विक्रमी साडेसहा इंच पाऊस! पाणलोटात धूमशान; भंडारदर्‍यात 368 दशलक्ष घनफूट पाण्याची आवक


नायक वृत्तसेवा, अकोले
जिल्ह्यातील पावसाचे आगार समजल्या जाणार्‍या तालुक्याच्या पश्चिम घाटमाथ्यावर विलंबाने का होईना पावसाने जोर धरला असून दिवसागणिक पाणीसाठ्यांमध्ये वाढ होत आहे. गेल्या चोवीस तासांत भंडारदर्‍याच्या पाणलोटातील रतनवाडीत हंगामातील सर्वोच्च 168 मिलीमीटर (साडेसहा इंच) विक्रमी पावसाची नोंद झाली असून त्या खालोखाल घाटघरमध्येही 162 मिलीमीटर पाऊस नोंदविला गेला आहे. गेल्या वर्षी जूनच्या सरासरीपेक्षा यंदा पाऊस कमी झाला असला तरीही मागील पाच दिवसांपासून संततधार सुरु असल्याने आदिवासी पाड्यांसह लाभक्षेत्रात समाधानाचे वातावरण आहे. गेल्या चोवीस तासांत भंडारदरा धरणात 368 दशलक्ष घनफूट पाण्याची नव्याने आवक झाली असून पाणीसाठा 51 टक्क्यांच्या पुढे सरकला आहे. सध्या धरणातून विद्युत निर्मितीसाठी 837 क्युसेकचा विसर्ग सुरु आहे.

जूनच्या सुरुवातीला मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने यंदा पाणलोटात मान्सूनचे वेळेवर आगमन होण्याची स्थिती असताना बिपोरजॉय वादळाने मान्सूनचे गणितं बिघडवले. त्यामुळे संपूर्ण राज्यात चिंताजनक स्थिती निर्माण झालेली असताना गेल्या आठवड्यापूर्वी अवघ्या राज्याला मान्सूनच्या छगांनी व्यापले तर नगर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या मुळा, भंडारदरा व निळवंडे धरणांच्या पाणलोटात मागील पाच दिवसांपासून संततधार कोसळत असल्याने सह्याद्रीच्या कडेकपारीतून पाण्याचे ओहोळ वाहते झाले असून धरणांचे पाणीसाठेही हलू लागले आहेत. एकीकडे उशिराने आगमन झालेल्या वरुणराजाने तालुक्याच्या पश्चिम घाटमाथ्यावर मुक्काम ठोकलेला असताना दुसरीकडे पूर्वेकडील आढळा खोर्‍याला मात्र अद्यापही पावसाची प्रतीक्षा आहे.

मुळा खोर्‍यातील घाटमाथ्यावर कोसळत असलेल्या पावसाने यापूर्वीच 193 दशलक्ष घनफूट क्षमतेचा अंबित जलाशय ओसंडला असून शिरपुंजे व बलठण येथील प्रकल्प भरण्याच्या मार्गावर आहेत. ही दोन्ही जलाशये ओसंडल्यानंतर कोतुळनजीकच्या 600 दशलक्ष घनफूट क्षमतेच्या पिंपळगाव खांड जलाशयात पाण्याची आवक सुरु होईल, हा प्रकल्प पूर्ण भरल्याशिवाय मुळा धरणात पाण्याची आवक सुरु होत नाही. त्यामुळे आता मुळा धरणाच्या लाभक्षेत्राचे डोळे पिंपळगाव खांड जलाशयावर खिळले आहेत. दुसरीकडे निळवंडे धरणाच्या पाणलोटातील वाकी जलाशयाच्या पाणलोटातही गेल्या चार दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात जलधारा कोसळत असून 112.66 दशलक्ष घनफूट क्षमतेच्या वाकी जलाशयाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. हा जलायश तुडूंब झाल्यानंतर निळवंडे धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत असते.

सध्या तालुक्यातील मुळा आणि भंडारदरा धरणांच्या पाणलोटात पावसाचे धूमशान सुरु असून हरिश्चंद्रगडाच्या माथ्यासह पाचनई, कोथळे, कुमशेत, शिरपुंजे, अंबित, लहित, खडकी अशा सर्वदूर भागात संततधार सुरु आहे. तर भंडारदरा धरणाच्या पाणलोटात भंडारदर्‍यासह घाटघर व रतनवाडीमध्ये पावसाची स्पर्धा लागल्याचे चित्र दिसत आहे. या धरणाच्या पाणलोटातील घाटघरमध्ये शुक्रवारी सकाळी संपलेल्या चोवीस तासांत हंगामात पहिला विक्रम नोंदविला गेल्यानंतर, अवघ्या 24 तासांतच रतनवाडीने तो मोडून नवा विक्रम प्रस्थापित करताना साडेसहा इंच (165 मिमी.) पाऊस नोंदविला आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यातही वेगाने वाढ होत असून शुक्रवारी 48.80 टक्क्यांवर खाली गेलेला पाणीसाठा अवघ्या चोवीस तासांत पुन्हा 51.10 टक्क्यांवर पोहोचला आहे. आज सकाळी संपलेल्या 24 तासांत धरणात नव्याने 368 दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली असून विद्युत निर्मितीसाठी त्यातील 70 दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर करण्यात आला आहे.

एकीकडे तालुक्याच्या पश्चिम घाटमाथ्यावर पावसाला जोर चढत असताना दुसरीकडे पूर्वभागातील आढळा व भोजापूर जलाशयांना मात्र अद्यापही मोठ्या पावसाची अपेक्षा असून या दोन्ही धरणात अद्याप नवीन पाण्याची आवक सुरु झालेली नाही. गेल्या 24 तासांत भंडारदरा धरणाच्या पाणलोटातील रतनवाडीत सर्वाधिक 165 मिलीमीटर, घाटघर 162 मिलीमीटर, भंडारदरा 145 मिलीमीटर, वाकी 129 मिलीमीटर, निळवंडे 24 मिलीमीटर, आढळा 5 मिलीमीटर, कोतूळ 11 मिलीमीटर, अकोले 14 मिलीमीटर व संगमनेर येथे 7 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील मोठ्या धरणांच्या पाणलोटात पावसाला जोर चढल्याने समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.


आज सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासांत धरणातील पाणीसाठे पुढीलप्रमाणे : मुळा 8 हजार 817 दशलक्ष घनफूट (33.14 टक्के), पाण्याची आवक नाही, भंडारदरा 5 हजार 641 दशलक्ष घनफूट (51.10 टक्के), 368 दशलक्ष घनफूट नवीन पाण्याची आवक, निळवंडे 1 हजार 768 दशलक्ष घनफूट (21.25 टक्के), 72 दशलक्ष घनफूट नवीन पाण्याची आवक, आढळा 537 दशलक्ष घनफूट (50.66 टक्के) व भोजापूर 41 दशलक्ष घनफूट (11.36 टक्के), या दोन्ही धरणात अद्याप नवीन पाणी येण्यास सुरुवात झालेली नाही.

Visits: 100 Today: 1 Total: 1109013

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *