शेवगावमध्ये पशु वैद्यकीय सेवेचे वाजले तीनतेरा
शेवगावमध्ये पशु वैद्यकीय सेवेचे वाजले तीनतेरा
नायक वृत्तसेवा, शेवगाव
शहरासह तालुक्यातील घटत चाललेली पाळीव जनावरांची संख्या व वाढत चाललेली दर्जाहीन खासगी पशुवैद्यकीय सेवा सध्या चर्चेची विषय बनली आहे. शासकीय पशुवैद्यकीय अधिकार्यांचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने खासगी सेवा देणार्या पशु वैद्यकांचे चांगलेच फावत असल्याचा आरोप पशुपालकांनी केला आहे.

पशु वैद्यकीय सेवा देताना जनावरांचे कृत्रिम रेतन, देखभाल, किरकोळ आजार, जागेवर सलाईन देणे, कधी-कधी अवघड शस्त्रक्रिया करणे असे गंभीर प्रकार होऊन अनेक शेतकर्यांची हजारो रुपये किंमतीची जनावरे दगावली असल्याचे हा विषय ऐरणीवर आला आहे. यामुळे शहरासह तालुक्यातील पाळीव जनावरांची संख्या घटली आहे. याकडे शासकीय पशु वैद्यकीय विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने खासगी पशु वैद्यक शेतकर्यांकडून अव्वाच्या सव्वा दराने वसुली करत आहे. या प्रकरणी दाद कोणाकडे मागायची तरी कोणाकडे सवालही पशु पालकांनी विचारला आहे. त्यात आणखी भर म्हणून शहरात राजरोसपणे चालू असणार्या कत्तलखान्यांकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे शहरवासियांचे आरोग्य आणि पाळीव जनावरांसह मोकाट जनावरांचेही आरोग्य धोक्यात आले आहे.
