ताज्या चाचणीतून जिल्ह्यात भाजप-राष्ट्रवादीचे वर्चस्व! राज्यातही पुन्हा भाजप-सेनेचेच सरकार; ठाकरेंच्या तुलनेत शिंदे गटाच्या सरशीचा अंदाज..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्याच्या विधानसभा निवडणुकीला दीड वर्षांचा कालावधी शिल्लक असताना ‘न्यूज एरिना इंडिया’ या सर्वाधिक विश्वासार्ह संस्थेने केलेल्या ताज्या मतदार चाचणीतून राज्यात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे सरकार येण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. इंटरनेटच्या माध्यमातून करण्यात आलेल्या या चाचणीतून राज्यातील 35 टक्के मतदारांनी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना पसंदी दिल्याचेही समोर आले असून आज निवडणूका झाल्यास अहमदनगर जिल्ह्यातील बारा जागांमध्ये प्रत्येकी पाच जागांवर भाजपा व राष्ट्रवादी तर दोन जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी होण्याचा अंदाजही या चाचणीतून जाहीर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे फोडाफोडीच्या राजकारणातून राज्यात सत्तांतर घडल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेबद्दल निर्माण झालेली सहानुभूतीही या चाचणीतून संपुष्टात आल्याचे समोर आले असून शिवसेनेला (शिंदे गट) 25 जागा मिळण्याचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे.

नुकत्याच पार पडलेल्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकांचे सर्वाधिक अचूक अंदाज वर्तविणार्‍या न्यूज एरिना इंडिया या संस्थेने ही चाचणी घेतली आहे. त्यानुसार राज्यात आज विधानसभेच्या निवडणूका झाल्यास काय स्थिती असेल याचा अंदाज घेतला गेला आहे. या चाचणीतून राज्यातील जनतेने भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या (शिंदे गट) विद्यमान सरकारवर विश्वास दाखवल्याचे समोर आले आहे. या चाचणीतून भाजपाला आजवरच्या सर्वाधिक 123 ते 129 जागा मिळण्याचा अंदाज असून शिंदेंच्या शिवसेनेला 25 जागा मिळतील. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला अवघ्या 17 ते 19 जागाच मिळतील असा निष्कर्षही या चाचणीतून काढण्यात आला आहे. चाचणीतून समोर आलेल्या या अंदाजानुसार फोडाफोडीनंतर सहानुभूती मिळालेल्या उद्धव ठाकरे यांच्या पक्षापेक्षा बंडाळी करणार्‍या गटाला अधिक जागा मिळणार असल्याचे समोर आले आहे.

भाजपा-सेनेच्या युतीसमोर काँग्रेस-राष्ट्रवादी व उद्धव ठाकरे गटाच्या महाविकास आघाडीने एकत्रित लढा दिल्यास त्याचा सर्वाधिक फायदा आघाडीतील काँग्रेसला होण्याचाही अंदाज वर्तविण्यात आला असून काँग्रेसला 50 ते 53, राष्ट्रवादी काँग्रेसला 55 ते 56, ठाकरेंच्या शिवसेनेला 17 ते 19 तर इतरांना 12 जागा मिळण्याचा अंदाज आहे. त्याचवेळी तिनही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढविल्यास काँग्रेसला अवघ्या 28 ते 30 जागा मिळू शकतील असेही या चाचणीतून जाहीर करण्यात आले आहे. म्हणजेच महाविकास आघाडी एकत्र लढल्यास आघाडीला 122 ते 128 या दरम्यान जागा मिळतील असेही या निष्कर्षातून समोर आले आहे.

राज्य विधानसभेच्या 288 जागांसाठी विभागवार पद्धतीने करण्यात आलेल्या या मतदार चाचणीतून अहमदनगर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघाचे अंदाजही जाहीर करण्यात आले आहे. जिल्ह्यात भाजप व राष्ट्रवादीला प्रत्येकी पाच तर काँग्रेसला दोन जागा मिळतील. जिल्ह्यातील शिर्डी, कोपरगाव, शेवगाव-पाथर्डी, श्रीगोंदा व राहुरी मतदार संघात भाजपा उमेदवार विजयी होतील असा अंदाज असून अकोले, नेवासा, पारनेर, नगर शहर व कर्जत-जामखेडमध्ये राष्ट्रवादी तर, संगमनेर व श्रीरामपूरमध्ये काँग्रेसचे उमेदवार विजयी होतील. जिल्ह्यात 2014 नंतर शिवसेनेचा (ठाकरे गट) एकही उमेदवार विजयी झालेला नसून गेल्या निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आलेल्या नेवासा मतदार संघातील शंकरराव गडाख यांनी निवडणुकीनंतर शिवसेनेची कास धरली होती.

या निवडणुकीत नेवासा मतदारसंघ भाजपपासून दूरच राहणार असल्याचे व तेथे आजच्या स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस विजयी होण्याचा अंदाज असून कोपरगावच्या परंपरेनुसार दर पाच वर्षांनी होणारी अदलाबदल यंदाही कायम राहून तेथे भाजप उमेदवार विजयी होईल. 2014 साली राहुरी मतदारसंघात शिवाजी कर्डिलेंचा विजय झाला होता, मात्र 2019 मध्ये राष्ट्रवादीच्या प्राजक्त तनपुरे यांनी त्यांचा पराभव केला. आता ईडीची पिडा टाळण्यासाठी तनपुरे यांनाच गळाला लावून राहुरीची जागा भाजपकडून बळकावली जाण्याचा अंदाजही वर्तविला गेला आहे. 2014 मध्ये जिल्ह्यातील सर्वाधिक सहा मतदारसंघ भाजपकडे, तीन काँग्रेसकडे, दोन राष्ट्रवादीकडे तर एक शिवसेनेकडे होता. आता भाजप आणि राष्ट्रवादी प्रत्येकी पाच तर काँग्रेसकडे दोन मतदारसंघ जातील असा अंदाज असून जिल्ह्यातून शिवसेनेचा सुपडा साफ होण्याचाही दावा न्यूज एरिना इंडियाने व्यक्त केला आहे.


‘न्यूज एरिना इंडिया’ ही इंटरनेटच्या माध्यमातून सर्व्हेक्षण करणारी संस्था असून आजवरच्या निवडणूक पूर्व चाचणीतून त्यांनी जाहीर केलेले निष्कर्ष सर्वाधिक विश्वासार्ह ठरले आहेत. या संस्थेने आजच्या राजकीय स्थितीला समोर ठेवून राज्यातील मतदारांना इंटरनेच्या माध्यमातून काही प्रश्न विचारण्यात आले होते, त्यातून समोर आलेल्या उत्तरांमधून राज्यात भाजप व शिवसेनेच्या (शिंदे गट) युतीला 148 ते 150 जागा मिळतील असा निष्कर्ष काढला गेला आहे. अर्थात राज्य विधानसभेच्या निवडणुकीला अद्याप दीड वर्षांचा कालावधी आहे, तोपर्यंत राजकीय समीकरणं बदलण्याचाही अंदाज आहे.

Visits: 251 Today: 1 Total: 1422927

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *