धरणं भरताच लाभक्षेत्रासह आता पाणलोटातही पडलाय लख्खं सूर्यप्रकाश!

धरणं भरताच लाभक्षेत्रासह आता पाणलोटातही पडलाय लख्खं सूर्यप्रकाश!
विसर्जनाच्या दिनी पाच हजार क्युसेक्सने वाहणारी अमृतवाहिनी प्रवराही आकुंचली
नायक वृत्तसेवा, अकोले
ऑगस्टच्या मध्यात पाणलोट क्षेत्रात धुवाँधार कोसळणार्‍या जलधारांनी जिल्ह्यातील सर्व धरणांची सर्वोच्च पातळी गाठली. त्यामुळे यंदाच्यावर्षी ओला दुष्काळ पडतो की काय अशीही एकवेळ अवस्था निर्माण झाली होती. मात्र ती फोल ठरली असून लाभक्षेत्रा पाठोपाठ आता पाणलोटातील पावसानेही धरणक्षेत्रातून माघार घेतली असून गेल्या 48 तासांपासून पावसाचे आगार समजल्या जाणार्‍या मुळा-प्रवरा खोर्‍यात चक्क लख्खं सूर्यप्रकाश पडला आहे. लाभक्षेत्रातील पाऊस गायब होवूनही जवळपास आठवडा उलटल्याने मान्सूनचा प्रवास परतीच्या दिशेने सुरु झाल्याचे जाणकारांमधून बोलले जात आहे.


अहमदनगर जिल्ह्याच्या अर्थकारणाचा स्त्रोत असलेल्या गोदावरी उर्ध्वभागात यंदा वरुणराजाचे मरगळ आल्यागत आगमन झाल्याने धरणांचे पाणीसाठे कासवगतीने पुढे सरकत होते. मात्र त्याचवेळी लाभक्षेत्रात समाधानकारक पर्जन्यधारा कोसळत होत्या. धरणांच्या पाणलोटात जेमतेम आणि लाभक्षेत्रात जोरदार असे चित्र अभावानेच बघायला मिळाल्याने मध्यंतरीचे दोन महिने लाभक्षेत्रासह पाणलोटासाठी ‘कभी खुशी कभी गम’ अशी स्थिती निर्माण झाली होती.


मात्र जुलै महिन्याच्या शेवटाला वरुणराजाने मरगळ झटकून पाणलोटात बरसण्यास सुरुवात केल्याने ऑगस्टच्या अवघ्या पंधरवड्यातच पाणलोटातील चित्र पालटले. मुळा व प्रवरा खोर्‍यात या दरम्यान जोरदार पाऊस सुरु झाल्याने 15 ऑगस्टला भरण्याची मर्यादा ओलांडणार्‍या भंडारदर्‍याचा जलसाठा अवघ्या एका दिवसाच्या विलंबाने तांत्रिक पातळीवर पोहोचला, त्यामुळे भंडारदर्‍याच्या पाणलोटात चैतन्याचे भरते आले. भंडारदरा भरल्याने निळवंडे धरण भरण्याचा मार्गही प्रशस्त झाला, त्यामुळे खालच्या भागातील अकोले, संगमनेर, राहुरी, राहाता, श्रीरामपूर व नेवाशातील लाभार्थी आनंदले.


याच सुमारास पावसाने सातत्य राखल्याने भंडारदर्‍यासह निळवंड्यातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडावे लागले. त्याचा परिणाम मराठवाड्याची तहाण भागवणार्‍या जायकवाडीच्या जलाशयातही यंदा समाधानकारक पाणी पोहोचते झाले. प्रवरा खोर्‍याबरोबरच मुळा खोर्‍यातील हरिश्चंद्रगडाच्या परिसरातही पावसाचा जोर वाढल्याने मुळा तालबद्ध झाली आणि खळाळत धरणाच्या दिशेने धावली. गेल्या पंचवीस दिवसांच्या पावसाने या धरणाचा नूरही पालटला आणि बघताबघता धरणाने 98 टक्क्यांचा जलसाठा धारण केल्याने गणेश विसर्जनाच्या दिवशी धरणाच्या अकरा दरवाजांना उचलण्याची वेळ आली.


जिल्ह्यातील सर्वाधीक क्षमतेचे हे धरणही भरल्याने अवघ्या जिल्ह्यातील वातावरण आनंदित झाले. सद्यस्थितीत जिल्ह्याच्या दक्षिण भागासाठी वरदान ठरणार्‍या पिंपळगाव जोगा (41.18 टक्के), माणिकडोह (42.76 टक्के), पारगाव (33.41 टक्के) व विसापूर (59.48 टक्के) या धरणांना वगळता येडगाव, वडज, डिंभे, घोड, मांडओहोळ, सीना व खैरी या धरणांतील जलसाठे समाधानकारक अवस्थेत असून दक्षिणेतील केवळ वडज, मांडओहोळ व सीना ही धरणं पूर्ण क्षमतेने भरली आहेत. गेल्या चोवीस तासांत भंडारदरा धरणाच्या पाणलोटातील घाटघरमध्ये झालेला 12 मिलीमीटर पाऊस वगळता उर्वरीत संपूर्ण जिल्ह्यातून पाऊस गायब झाला आहे.


गणेश विसर्जनाच्या दिनी प्रवरा नदीपात्रातून 4 हजार 988 क्युसेक्सचा प्रवाह वाहत होता तर मुळा धरणातूनही दोन हजार क्युसेक्स पाणी सोडले जात होते. आता मात्र पाऊसच थांबल्याने या धरणांचे दरवाजे पुन्हा बंद करण्यात आले असून भंडारदरा धरणाच्या विद्युतगृहाद्वारे 872 क्युसेक्स, निळवंड्याच्या विद्युतगृहाद्वारे 71 क्युसेक्स तर मुळा धरणातून अवघे पाचशे क्युसेक्स पाणी सोडले जात आहे. आज सकाळी ओझरनजीकच्या प्रवरा नदीपात्रातून 1 हजार 93 क्युसेक्स पाणी वाहत असल्याने सद्यस्थितीतही जायकवाडीच्या दिशेने 1 हजार 500 क्युसेक्सचा प्रवाह सुरु आहे.

Visits: 97 Today: 1 Total: 1111287

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *