संगमनेर तालुक्यातील प्रतिष्ठीत पुढारी ‘हनी’च्या जाळ्यात! आरोग्य विभागातील शिपाई महिलेचा कारनामा; तिच्या ‘ट्रॅप’मध्ये अनेकजण फसल्याची शक्यता..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
आपल्या सौंदर्याचे प्रदर्शन करीत प्रतिष्ठीतांना लुटण्याच्या असंख्य घटना अलिकडच्या काळात समोर आल्या आहेत. मात्र संगमनेर तालुका त्यापासून काहीसा दूर असल्याचे वाटत असताना आता त्याचे लोण संगमनेरातही येवून पोहोचले आहे. या घटनेत मुळच्या संगमनेर तालुक्यातील रहिवासी असलेल्या महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने तालुक्यातील जवळे कडलग येथील एका प्रतिष्ठीत पुढार्‍याला तब्बल 64 लाख 50 हजार रुपयांना गंडविले आहे. या दोघांकडून वारंवार होणार्‍या आर्थिक पिळवणुकीला वैतागलेल्या या पुढार्‍याने शेवटी प्रतिष्ठेचा कोट खुंटीला टांगून थेट पोलीस ठाणे गाठल्याने ती ‘हनी’ गजाआड पोहोचली. मात्र, त्याचवेळी तिचा प्रियकर आपल्या अलिशान कारमधून पसार झाला आहे. विशेष म्हणजे सदरची ‘हनी’ शासकीय आरोग्य विभागात शिपाई म्हणून कार्यरत असून गेल्या काही वर्षात तिने तालुक्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रात ‘सेवा’ केली आहे. त्यामुळे तिच्या जाळ्यात अडकलेल्यांची संख्याही मोठी असण्याची दाट शक्यता आहे. शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या या हनीने गेल्या काही वर्षात केलेली प्रगती डोळे दीपवणारी आहे.

संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग म्हणजे बागायती परिसर म्हणून गणला जातो. डाळिंब, द्राक्षे या सारख्या बागांनी या परिसरातील शेतकर्‍यांच्या दारात समृद्धी आणली आहे. याच गावातील एका प्रतिष्ठीत पुढार्‍याला मात्र आपली समृद्धी या महिलेच्या पायावर ओतण्याची वेळ आली. चार वर्षांपूर्वी जून 2018 मध्ये सदरची महिला शिपाई आरोग्य विभागाच्या जवळे कडलग येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ‘सेवेत’ असतांना तिचा परिचय गावातील ‘त्या’ पुढार्‍याशी झाला. वडिलोपार्जित बागायती शेती आणि त्यातून मिळणारे अमाप उत्पन्न, गावातील प्रतिष्ठा आणि त्यात राजकीय पुढारी म्हंटल्यावर ‘त्या’ हनीने त्याच्या रुपातील सावज बरोबर हेरले. सुरुवातीला तिने आपल्या घरची परिस्थिती बेताची असल्याचे सांगत त्या पुढार्‍याकडून दोन लाखांची रक्कम उसनवारीने घेतली व पंधरा दिवसांत ती परत दिली.

यातून त्या पुढार्‍याचा तिच्यावरील विश्वास वाढला. त्यामुळे पंधरा दिवसांनी तिने पुन्हा आर्थिक अडचणीचे कारण सांगून त्यांच्याकडून पाच लाखांची मागणी केली. त्यांनीही तिच्यावर भरवसा ठेवून घुलेवाडीच्या युनियन बँकेतून 5 लाखांची रक्कम ‘ऑनलाईन’ तिला पाठवली. यावर काही काळ गेल्यानंतर त्या हनीने पुन्हा त्या प्रतिष्ठीत पुढार्‍याशी संपर्क साधून नेवासा येथे आपली वडिलोपार्जित शेतजमीन असून तिचे रेकॉर्ड तयार करण्यासाठी 15 लाख रुपयांची गरज असल्याचे सांगितले, त्या बदल्यात सह्या केलेले धनादेश देण्याची तयारीही तिने दाखवली. त्यानुसार त्या हनीने एका धनादेशावर दोन लाखांची रक्कम लिहून उरलेले दोन कोरे धनादेश त्या पुढार्‍याला दिले, त्यामुळे तिच्या विषयी त्यांच्या मनात विश्वास निर्माण झाल्याने त्यांनी तिला तब्बल 15 लाखांची रक्कम रोख स्वरुपात दिली. अशाप्रकारे ओळख झालेल्या जून 2018 च्या एकाच महिन्यात त्या हनीने त्या प्रतिष्ठीत व्यापार्‍याकडून वेगवेगळी कारणं सांगत तब्बल 20 लाख रुपयांची रक्कम उकळली.

त्यानंतर मात्र तिची जवळे कडलगमधून चंदनापुरीत बदली झाल्याने तिने ‘त्या’ पुढार्‍याशी संपर्क बंद केला. आपले दिलेले पैसे परत मिळावेत यासाठी त्यांनीही वारंवार तिच्या मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र तिच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. त्यानंतर 7 मार्च, 2022 रोजी अचानक दुपारच्यावेळी तिने त्यांच्याशी संपर्क साधून तुमचे सगळे पैसे उद्या सकाळी मी देणार आहे, तुम्ही बाभळेश्वरला या म्हणून त्यांना सांगितले. त्यानुसार दुसर्‍या दिवशी 8 मार्च रोजी संबंधित पुढारी बाभळेश्वर येथे पोहोचले असता एका हॉटेलसमोर दोघांची भेट झाली. यावेळी ‘त्या’ हनीच्या हातात एक पिशवी होती, त्यात नोटांचे बंडल असल्याचे त्यांना दाखवित ‘मोजून घ्या तुमचे पैसे’ असे म्हणत तिने ‘रस्त्यावर कुठे पैसे मोजता? मी हॉटेलमध्ये रुम घेतली आहे, तेथे चला व मोजून घ्या’ असे सांगून त्यांना हॉटेलातील खोलीत नेले.

खोलीत जाताच तिने आतून दरवाजा बंद केला. या प्रकाराने भांबावलेल्या त्या पुढार्‍याने पिशवी माझ्याकडे दे, मी पैसे मोजून घेतो असे तिला सांगताच खोलीचा दरवाजा कोणीतरी वाजवला. तिने लागलीच पुढे जात दरवाजा उघडला आणि एक अनोळखी इसम हातात मोबाईल घेवून चित्रीकरण करीतच त्या खोलीत दाखल झाला. काही वेळाने त्याने त्या पुढार्‍याशी झटापटही सुरू केली, तर त्या हनीने स्वतःच आपले कपडे काढीत त्याच्याशी लगट करण्यास सुरुवात केली. हा सगळा प्रकार मोबाईलमध्ये सुरू असलेल्या चित्रीकरणासाठी होता हे वेगळे सांगायला नको. अचानक उद्भवलेल्या या प्रसंगाने गावात पुढारपण मिरवणारी ती व्यक्ती हादरली. त्याचवेळी त्या इसमाने दमदाटी करीत ‘आमच्या दोघांचे शारीरिक संबंध आहेत, आम्ही नेहमी एकमेकांना भेटतो’ असे त्यांच्याकडून वदवून घेत त्याचेही चित्रीकरण केले. त्या दरम्यान सदरच्या व्यक्तीचे नाव राजेंद्र गिरी असल्याचे व तो लोणीचा रहिवासी असल्याचे समोर आले.

यानंतर कोणाला काहीएक सांगितल्यास चित्रीकरण व्हायरल करण्यासह जीवे मारण्याची धमकी देत त्या बहाद्दराने तेथेच त्यांच्याकडून 9 लाख रुपयांची मागणी केली. मात्र इतके पैसे घेवून कोणी फिरते का? असा प्रतिप्रश्न करीत त्यांनी घरुन आणून देतो असे सांगताच त्याच दिवशी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास समनापूर जवळ त्यातील साडेचार लाख रुपये घेण्यासाठी राजेंद्र गिरी आपली अलिशान ब्रीझ्झा कार (क्र.एम.एच.17/बी.व्ही.8886) घेवून तेथे आला व सदरची रक्कम घेत राहिलेले साडेचार लाख रुपये मला पाहिजेत नाहीतर छायाचित्रण व्हायरल करण्याची धमकी देवू लागला. प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झाल्याने त्या पुढार्‍यानेही दुसर्‍याच दिवशी संगमनेरमध्ये त्याला आणखी साडेचार लाखांची रक्कम सुपूर्द केली.

त्याचे पोट भरल्यानंतर तिने त्या पुढार्‍याकडून पैशांची मागणी सुरू केली आणि 17 मार्च, 2022 रोजी अकोले नाका येथे त्यांच्याकडून साडेसात लाखांची रक्कम उकळली. त्यानंतर चारच दिवसांत 21 मार्च रोजी त्याच ठिकाणी पुन्हा साडेसात लाख रुपये तर 28 मार्च रोजी परिवार शॉपीजवळ पाच लाखांची रक्कम उकळली. त्या पुढार्‍याला अमाप लुटूनही त्या दोघांचेही समाधान झाले नाही, 1 एप्रिल रोजी राजेंद्र गिरी याने त्यांना शासकीय विश्रामगृृहात बोलावून 4 लाख रुपये घेतले तर तिने 19 एप्रिल, 2022 रोजी अकोले नाक्यावर साडेसात लाखांची रक्कम उकळली. एकंदरीत जानेवारी 2022 पासून एप्रिलपर्यंत या दोघाही ठकांनी त्या पुढार्‍याच्या प्रतिष्ठेचा गैरफायदा घेत त्यांना वेळोवेळी धमकावित त्यांच्याकडून 40 लाख 50 हजार रुपये उकळले.

वारंवारच्या या मागण्यांना आता मात्र तो पुढारी वैतागल्याने अखेर त्याने शिर्डी पोलीस ठाणे गाळून पोलीस उपअधीक्षक संजय सातव यांची भेट घेतली व त्यांना सर्व प्रकार सांगितला. त्यांनीही ‘त्या’ पुढार्‍याला धीर देत कारवाईचे आश्वासन दिले. इतके पैसे दिल्यानंतरही त्या हनीने पुन्हा त्यांच्याकडून 4 लाखांची मागणी केल्याचे त्या पुढार्‍याने पोलिसांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर पोलिसांच्या सूचनेनुसार पुढील कारवाई सुरु झाली. त्यानुसार गेल्या सोमवारी (ता.6) शिर्डीत 4 लाखांची रक्कम देण्याचे ठरले. पोलिसांनी खुणा केलेल्या नोटांचे बंडल तयार करुन ते पीडित पुढार्‍याकडे दिले व आसपास पोलिसांनी सापळा लावला.

ठरल्याप्रमाणे सदरची हनी सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास शिर्डी बसस्थानका समोरील गल्लीत आली. यावेळी त्या पुढार्‍याने सोबत नेलेली 4 लाखांची रक्कम तिच्या सुपूर्द केली. या दरम्यान पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे त्या पुढार्‍याने आपल्या मोबाईलचा रेकॉर्डर सुरू करुन वरच्या खिशात ठेवल्याने या सर्व गोष्टी त्यात कैद झाल्या. यावेळी चार लाख रुपये मिळाल्यानंतरही तिने पुन्हा त्यांच्याकडून आणखी चार लाखांची मागणी केली व ते न मिळाल्यास नेहमीप्रमाणे धमकीही दिली व हातात आलेली चार लाखांची रक्कम पिशवीत घालून ती तेथून चालती झाली. यावेळी पीडित पुढार्‍याने इशारा करताच आसपास दबा धरुन बसलेल्या महिला पोलिसांनी तिच्यावर झडप घालीत तिला ताब्यात घेतले. तिच्या पिशवीची झडती घेतली असता पोलिसांनी विशिष्ट खुणा करुन दिलेले नोटांचे बंडल त्यात आढळून आले. गेल्या चार वर्षांच्या कालावधीत या हनीने जवळे कडलगच्या ‘त्या’ पीडित पुढार्‍याकडून तब्बल 64 लाख 50 हजार रुपयांची रक्कम उकळल्याचेही यातून समोर आले. या वृत्ताने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून त्या हनीच्या जाळ्यात आणखी खूप मोठे मासे अडकलेले असल्याची चर्चा सुरू आहे.


संगमनेर तालुक्यातील सुकेवाडीची रहिवासी असलेली ही 38 वर्षीय ‘हनी’ शासकीय आरोग्य विभागात शिपाई म्हणून कार्यरत आहे. सुरुवातीला ती जवळे कडलग येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवेत होती, नंतर तेथून तिची बदली कोविडच्या काळात चंदनापुरीत झाली. तेथील कार्यकाळ आटोपल्यानंतर सध्या ती राहाता तालुक्यातील अस्तगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत होती. या प्रकारावरुन तिने स्वतः कार्यरत असलेल्या ठिकाणच्या अनेक प्रतिष्ठीतांना असाच गंडा घातला असण्याची आणि तिच्या जाळ्यात संगमनेरातील काही रिअल इस्टेट एजंट, गाव पुढारी फसलेले असण्याची दाट शक्यता आहे. या महिलेने गेल्या चार वर्षात साधलेली प्रगती डोळे दीपवणारी असून एका शिपायाला कामाच्या ठिकाणी सोडण्यासाठी दररोज वाहनचालकासह अलिशान कार यायची यावरुन हे सहज लक्षात येईल. या प्रकरणाचा अधिक खोलात जावून तपास होण्याची गरज असून तिचा प्रियकरही एका गंभीर गुन्ह्यातील आरोपी असल्याची चर्चा आहे.

Visits: 20 Today: 1 Total: 120685

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *