‘अर्पण रक्तपेढी’च्या तंत्रज्ञाकडून सहकारी महिलेचा विनयभंग संगमनेरच्या वैद्यकीय क्षेत्रात पुन्हा खळबळ; वाच्चता केल्यास सोडणार नसल्याची धमकी..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या अनेक वर्षांपासून संगमनेरात कार्यरत असलेल्या ‘अर्पण रक्तपेढी’तून अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या रक्तपेढीच्या वतीने गंभीर रुग्णांना तत्काळ रक्ताचा पुरवठा व्हावा यासाठी शहरातील काही मोठ्या रुग्णालयांमध्ये शाखा चालवल्या जातात. त्यातीलच एका मोठ्या रुग्णालयात असलेल्या शाखेत सदरचा प्रकार घडला. या प्रकरणी अर्पण रक्तपेढीत गेल्या तीन वर्षांपासून सेवेत असलेल्या एका 26 वर्षीय महिलेने रक्तपेढीत प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या नयन जैन याने आपल्यासोबत गैरकृत्य केल्याची तक्रार दाखल केली आहे. त्यावरुन शहर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून जैन याच्यावर अनुसचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये वाढीव कलम लागून त्याला अटक होण्याची दाट शक्यता आहे. या घटनेने संगमनेरच्या वैद्यकीय क्षेत्रात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.


याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरचा प्रकार गेल्या रविवारी (ता.6) सायंकाळी पाचच्या सुमारास घडला, मात्र पीडितेने अंतर्गत कारवाईची प्रतिक्षा करीत दोषी तंत्रज्ञावर कोणतीही कारवाई होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांकडे धाव घेतली. त्यानुसार पीडित 26 वर्षीय महिला ‘त्या’ रुग्णालयातील अर्पण रक्तपेढीच्या शाखेत नियमित काम करीत असताना जाणताराजा मैदानालगतच्या मुख्य शाखेत काम करणार्‍या नयन जैन या प्रयोगशाळा तंत्रज्ञाने तिला फोन केला. यावेळी त्याने ‘तु आपल्या रक्तपेढीच्या स्टोअरेज सेंटरमध्येच थांबून रहा, आपल्या ऑफिस बॉयला दुसरे काम आहे, त्यामुळे तो रक्त पाठवण्यासाठी येणार नाही. तेथील रक्त पिशव्या घेण्यासाठी मी स्वतः येत असून मला तेथील शिल्लक साठाही तपासायचा आहे..’ असे सांगत त्याने फोन बंद केला.


त्यानंतर काही वेळातच एका हातात लस्सीचा ग्लास आणि दुसर्‍या हातात कॅटबरी घेवून नयन जैन तेथे हजर झाला व त्याने आपल्या हातातील लस्सी पीडित महिलेला दिली. गेल्या तीन वर्षांपासून एकाच संस्थेत एकत्रित काम करीत असल्याने निर्माण झालेल्या सहज भावनेतून तिनेही लस्सीचा ग्लास घेत आपले काम सुरु ठेवले. दरम्यानच्या वेळेत आरोपी जैन याने आणलेली अर्धी कॅटबरी तोडून स्वतः खाल्ली व शिल्लक कॅटबरी घेवून तो पीडितेजवळ आला. यावेळी त्याने स्वतः तिच्या तोंडात कॅटबरी देण्याचा प्रयत्न केला, मात्र तत्पूर्वीच पीडितेने हात पुढे केल्याने त्याने सदरचे चॉकलेट तिच्या हातात दिले.


एकाच ठिकाणी काम करताना सामान्यपणे घडणार्‍या अशाप्रकारच्या घटनेनंतर पीडित महिला तिच्या खुर्चीत जावून बसली व काम करु लागली. त्यावेळी पाठीमागून येत आरोपी नयन जैन याने तिच्या गालांना स्पर्श करीत तिचा विनयभंग केला. यावेळी त्याने महिलांना लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करण्यास सुरुवात केल्याने पीडितेने त्याला जोरदार धक्का देत लोटून दिले. त्यामुळे त्याला आपल्या दूष्कृत्याची जाणीव होवून सुरुवातीला त्याने क्षमा याचनेच्या शब्दात ‘मी तुझे पाया पडतो, मात्र घडला प्रकार कोणाला सांगू नकोस’ अशी विनवणी करीत दुसर्‍याच क्षणात ‘जर तु याबाबत कोठे वाच्चता केलीस तर, तुला सोडणार नाही’ अशी धमकीही भरली.


या घटनेने भेदरलेल्या पीडितेने लागलीच सदरचा प्रकार रक्तपेढीच्या महिला अधिकार्‍यांच्या कानावर घातला. त्यांनीही तत्काळ तेथे येवून पीडितेला धीर दिला व घडलेल्या प्रकाराबाबत रक्तपेढीचे कार्याध्यक्ष नंदकिशोर तातेड यांना फोनवरुन माहिती दिली. त्यावेळी तातेड यांनी मी सध्या बाहेर देशात असून परतल्यानंतर याबाबत कारवाई करण्याचे आश्‍वासन देत तो पर्यंत शांत रहाण्यास सांगीतले. मात्र घटनेला पाच दिवसांचा कालावधी होवूनही काहीच कारवाई न झाल्याने अखेर पीडितेने शहर पोलीस ठाण्यात येवून घडला प्रकार कथन केला. त्यावरुन पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी आरोपी नयन जैन याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार यांच्याकडे देण्यात आला आहे.


सदरील महिला अनुसचित जातीची असून तिने जात प्र्रमाणपत्र सादर केल्यानंतर आरोपी नयन जैन याच्या विरोधात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (अ‍ॅट्रोसीटी) गुन्हा दाखल होणार असून त्याच्या अटकेची दाट शक्यता आहे. गेल्याच आठवड्यात शहरातील डॉ.अमोल करपे याच्यावर अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल होवून त्याला गजाआड केल्याची घटना ताजी असतानाच आता रक्तपुरवठा करणार्‍या नामांकित रक्तपेढीतून सहकारी महिला कर्मचार्‍यांच्या विनयंभगाचा प्रकार समोर आल्याने संगमनेरच्या वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.


गेल्या रविवारी घडलेल्या या घटनेत शहरातील एका नामांकित रुग्णालयाचे नाव घेतले जात आहे. मात्र सदर रुग्णालयाचा या घटनेशी कोणताही संबंध नसून गंभीर रुग्णांच्या सोयीसाठी अर्पण रक्तपेढीच्या वतीने अशाकाही रुग्णालयांमध्ये सुरु करण्यात आलेल्या शाखांमधील एका शाखेत हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला असून पीडितेने जात प्रमाणपत्र सादर केल्यानंतर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (अ‍ॅट्रोसीटी) वाढीव कलमं लागून आरोपी नयन जैन याला अटक होण्याची शक्यता आहे. अ‍ॅट्रोसीटी दाखल झाल्यानंतर या प्रकरणाचा तपासही पोलीस उपअधीक्षकांकडे येणार आहे.

Visits: 35 Today: 2 Total: 436882

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *