घाटांच्या परिसरातून होणार्‍या वाळू तस्करीला लगाम! पालिकेची कारवाई; गंगामाई घाटाकडून जाण्यासाठी आता प्रवेशद्वार


नायक वृत्तसेवा, संगमनेर
वारंवार आंदालने, निवेदने व मागण्या करुनही अव्याहत सुरू असलेल्या वाळू तस्करीला संगमनेरातील घाटांच्या परिसरात आता लगाम लागला आहे. गेल्या पंधरवड्यात या परिसरात फिरण्यासाठी येणार्‍यांनी अचानक आंदोलन पुकारुन प्राचीन घाटांचे नुकसान टाळण्यासाठी तेथून होणारा वाळू उपसा थांबवण्याची मागणी केली होती. त्यावेळी संगमनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी आंदोलकांची भेट घेवून पंधरा दिवसांत गंगामाई घाटाकडून नदीकडेे जाणार्‍या रस्त्यावर लोखंडी प्रवेशद्वार उभारुन दुचाकी व चारचाकी वाहनांना अटकाव करण्याचा प्रस्ताव दिला होता. तो आता पूर्ण झाल्याने मोठ्या कालावधीनंतर घाटांच्या परिसरातील वाळूचोरी पूर्णतः थांबल्याचे समाधानकारक चित्र सध्या घाटांच्या परिसरात दिसत आहे.

संगमनेर तालुक्यातून वाहणार्‍या मुळा, प्रवरा, आढळा, म्हाळुंगी व कस नदीतून गेल्या कित्येक वर्षांपासून बेसुमार वाळू उपसा सुरु आहे. गेल्याकाही वर्षात बिनभांडवली असलेल्या या बेकायदा व्यवसायात डंपर, ट्रॅक्टर-ट्रॉलीसह भंगारातील कालबाह्य झालेल्या रिक्षा, बैलगाड्या आणि गाढवांवरुनही मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरु झाला होता. त्यातच रिक्षातून वाळू वाहतूक करणार्‍या बहुतेकांनी गंगामाई घाट ते वडगणपती पर्यंतच्या परिसरातच वाळू उपसा सुरू केल्याने नदीपात्रातील पाणी पुरवठ्याच्या विहिरी, पालिकेची पाईपलाईन व अनेक घाटांचे अस्तित्व धोक्यात आले होते.

बेसुमार वाळू चोरीपासून किमान घाटांचा परिसर सुरक्षित रहावा यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून वृक्ष परिवार, गंगामाई परिवार व या परिसरात फिरण्यासाठी येणार्‍या पर्यावरणप्रेमींनी प्रयत्नरत होते. त्यासाठी या सर्वांनी अनेकदा आंदोलनेही केली व तक्रारीही केल्या. मात्र त्या-त्यावेळी प्रशासन तात्पूरती कारवाई करीत व नंतर चार-आठ दिवसांनी सगळं काही पूर्ववत होत असे. मध्यंतरीच्या कालावधीत तर रिक्षातून वाळूचोरी करणार्‍यांना कोणाचाही धाकच राहीला नसल्याची स्थिती निर्माण होवून त्यांच्याकडून राजरोसपणे दिवसाढवळ्या वाहत्या पाण्यातूनही वाळू उपसा सुरु झाला होता.

विशेष म्हणजे या तस्करांनी नदी म्हणजे आपल्या बापाचीच मालमत्ता असल्यागत नदी परिसरातील नागरिकांच्या विरोधाकडे दुर्लक्ष करीत चक्क दिवसा घाटांवरच उपसलेल्या वाळूच्या गोण्यांच्या थप्प्या मारण्यास सुरुवात केली. त्यामुळे संतप्त झालेल्या वरील घटकांनी पंधरवड्यापूर्वी सकाळी अचानक ठिय्या आंदोलन पुकारुन गंगामाई परिसरातील सर्व वाळूतस्करांना पिटाळून लावले व त्यांनी उभ्या केलेल्या वाळू गोण्यांच्या राशी पुन्हा पात्रात सोडून गोण्या जाळून टाकल्या. यावेळी पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ व संगमनेर सजाचे कामगार तलाठी पोमल तोरणे यांनी गंगामाई परिसरात जावून आंदोलकांची भेट घेतली.

यावेळी संतप्त झालेल्या आंदोलकांनी येथील वाळू चोरीबाबत कठोर भूमिका घेण्याची मागणी केल्यांनतर मुख्याधिकार्‍यांनी पंधरा दिवसांत गंगामाईकडून नदीकडे जाणार्‍या रस्त्यावर लोखंडी प्रवेशद्वार उभारुन सर्वप्रकारच्या वाहनांना नदीच्या परिसरात जाण्यास अटकाव करण्याचा प्रस्ताव ठेवला. तो मान्य करुन त्यावेळी आंदोलन थांबविण्यात आले होते. त्यावेळी मुख्याधिकार्‍यांनी दिलेल्या आश्वासनाची आता पूर्तता झाली असून गंगामाई मंदिराजवळ लोखंडी प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे. त्यामुळे घाटाकडे जाण्यासाठी आता केवळ पायीमार्गच उपलब्ध असल्याने वडगणपतीपासून गंगामाईपर्यंत होणारा वाळू उपसा पूर्णतः थांबला आहे. पालिकेने दिलेल्या आश्वासनानुसार कृती केल्याने गंगामाई परिवार, वृक्ष परिवार व या परिसरात फिरावयास येणार्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *