संगमनेर बाजार समितीवर थोरात गटाचेच वर्चस्व! विखे गटाचा अक्षरशः धुव्वा; खाते उघडण्यातही सपशेल अपयश..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर बाजार समिती संचालक मंडळाच्या निवडणुकीत इतिहासात पहिल्यांदाच विद्यमान महसूल मंत्र्यांनी संपूर्ण पॅनल उभा केल्याने यंदाची निवडणूक रंगतदार होईल असे कयास लावले जात होते. मात्र प्रत्यक्ष मतमोजणीत ते कयास म्हणजे केवळ बोलाचा भात असल्याचे स्पष्ट झाले असून केवळ हमाल-मापाडी मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराचा विजय वगळता माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास मंडळाने महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जनसेवा मंडळाचा अक्षरशः धुव्वा उडवला आहे. बाजार समितीच्या निकालावरुन संगमनेर तालुक्यातील जनता माजी मंत्री थोरात यांच्या पाठिशी भक्कम उभी असल्याचेही स्पष्ट झाले असून मतदारांनी मतपेटीतून श्रीराम गणपुले, जनार्दन आहेर, डॉ. अशोक इथापेंसारख्या दिग्गजांनाही पराभवाची धूळ चारली आहे.

शुक्रवारी संगमनेर बाजार समितीच्या विविध मतदारसंघातील 18 जागांसाठी 97.12 टक्के मतदान झाले. आज सकाळी त्याची मतमोजणी सुरु झाली. सकाळी दहाच्या सुमारास आलेल्या पहिल्या निकालातूनच या निवडणुकीत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास मंडळाचे वर्चस्व राहणार असल्याचे दिसून आले व एकंदरीत मतमोजणी पूर्ण होताहोता त्यावर शिक्कामोर्तबही झाले आहे. या निवडणुकीत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्त्वाखालील जनसेवा मंडळाच्या एकाही उमेदवाराला थोरात गटाशी लढत देता आली नाही, त्याचा परिणाम जनसेवा मंडळाच्या सर्व उमेदवारांना अतिशय दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. दुपारी दोन वाजता हाती आलेल्या अंतिम निकालातून केवळ हमाल-मापारी मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन कर्पे यांचा विजय झाला असून त्यांनी आपण शेतकरी विकास मंडळासोबत असल्याचे जाहीर केल्याने संगमनेर बाजार समितीवर थोरातांचेच वर्चस्व कायम आहे.

हाती आलेल्या निकालानुसार बाजार समितीच्या व्यापारी मतदारसंघातून शेतकरी विकास मंडळाच्या निसार शेख यांनी 339 मते मिळवून जनसेवा मंडळाच्या अजरीम गुलाम हुसेन शेख यांचा, तर मनसुख भंडारी यांनी 336 मते मिळवित खलील नवाब शेख यांचा दारुण पराभव केला. ग्रामपंचायत मतदारसंघातही थोरात गटाचे विजयाची घोडदौड कायम राखताना जनसेवा मंडळाचा धुव्वा उडवित नीलेश कडलग (936), संजय खरात (930), अरुण वाघ (841) व सखाराम शेरमाळे (834) अशा चारही जागा पटकाविल्या. हमाल-मापाडी मतदारसंघात मात्र अपक्ष उमेदवार सचिन कर्पे यांनी शेतकरी विकास आणि जनसेवा मंडळाच्या उमेदवारांना धोबीपछाड देत 90 मते मिळवून विजय मिळवला. थोरात गटाच्या महेंद्र गुंजाळ यांना 52 तर जनसेवा मंडळाच्या सोमनाथ दिघे यांना केवळ त्यांचे स्वतःचे एकमेव मत पडले.

सोसायटी मतदारसंघातील महिला राखीव गटातही थोरात गटाच्या दीपाली वर्पे (1181) व रुक्मिणी साकुरे (1166) यांनी तर इतर मागासवर्गीय गटातून सुधाकर ताजणे (1176) व विमुक्त जाती भटक्या जमाती मतदारसंघातून अनिल घुगे यांनी 1 हजार 79 मते मिळवून विजय संपादन केला. याच मतदारसंघातील सर्वसाधारण गटातून थोरात गटाच्या सुरेश कान्होरे (1150), सतीश खताळ (1140), शंकर खेमनर (1130), गीताराम गायकवाड (1129), मनीष गोपाळे (1116), कैलास पानसरे (1094) व विजय सातपुते (1049) यांनी जनसेवा मंडळाच्या डॉ. अशोक इथापे, अ‍ॅड. श्रीराम गणपुले, विकास गायकवाड, भिमराज चत्तर, काशिनाथ पावसे, बाळासाहेब शेटे व यशवंत शेळके यांच्यासारख्या दिग्गजांना पराभवाची धूळ चारली.

राज्यात सत्ता परिवर्तनानंतर महसूल मंत्रीपदी विराजमान झालेल्या राधाकृष्ण विखे पाटील गेल्या आठ-दहा महिन्यांत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मतदारसंघात हस्तक्षेप करण्यास सुरुवात केल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. त्यातच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर इतिहासात पहिल्यांदाच विखे पाटलांनी आपल्या जनसेवा मंडळाचा संपूर्ण पॅनलच मैदानात उतरविल्याने यंदाच्या निवडणुकीतील रंगत वाढल्याचे वातावरण निर्माण करण्यात आले होते. मात्र मतदारांनी संगमनेरातील सहकारी संस्था आणि कृषी उत्पन्न बाजार समितीवर बाळासाहेब थोरातांचे नेतृत्त्वच कायम असल्याचे दाखवून दिले आहे.

Visits: 80 Today: 2 Total: 114654

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *