विद्यापीठ कर्मचार्यांचे अकराव्या दिवशी सामूहिक रजा आंदोलन
विद्यापीठ कर्मचार्यांचे अकराव्या दिवशी सामूहिक रजा आंदोलन
नायक वृत्तसेवा, राहुरी
येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अधिकारी व कर्मचार्यांनी शुक्रवारी (ता.6) सकाळी अकाराव्या दिवशी सामूहिक रजा घेऊन आंदोलन केले.

महात्मा फुलेंच्या पुतळ्याजवळ शुक्रवारी सकाळी अधिकारी व कर्मचारी काळ्या फिती लावून सामाजिक अंतर राखत एकत्र जमले. त्यानंतर जोरदार घोषणाबाजी करत कार्याध्यक्ष डॉ.महावीरसिंग चौहान, डॉ.उत्तम कदम, डॉ.सोपान मोरे, डॉ.नंदकुमार कुटे, डॉ.रवी आंधळे, डॉ.विजय पाटील, डॉ.स्वाती शिंदे, मच्छिंद्र बाचकर, एकनाथ बांगर, पी.टी.कुसळकर यांनी मागण्यांसंदर्भात आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर प्रशासकीय इमारतीसमोर एकत्र येत आपल्या मागण्यांचे निवेदन कुलसचिव मोहन वाघ आणि अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे यांना देण्यात आले. यावेळी समन्वय संघाचे उपाध्यक्ष डॉ.उत्तम कदम म्हणाले, आजपर्यंत केलेल्या आंदोलनात सर्वांनी जशी साथ दिली. तशीच यापुढील बेमुदत काम बंद आंदोलनाला सर्वांनी साथ द्यावी. जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आपले आंदोलन सुरुच राहिल. कामबंद आंदोलनात शेतकर्यांची अडचण होऊ नये म्हणून विद्यापीठाने बियाणे विक्री सुरु ठेवली आहे. सोमवारी आंदोलन चौथ्या टप्प्यात जाणार असून आंदोलन अधिक तीव्र करण्यासंदर्भात यावेळी सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.

