अपघाती मृत्यूनंतरही त्यांनी वाचवले पाच जणांचे प्राण! राजपाल परिवाराचे दातृत्त्व; ब्रेनडेड झालेल्या जगमोहन यांचे अवयव दान..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
‘मरावे परी कीर्ती रुपे उरावे’ या समर्थ रामदासांच्या उक्तीप्रमाणे संगमनेरच्या जगमोहन नानकचंद राजपाल या तरुण व्यापार्‍याच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांच्या परिवाराने दातृत्त्वाचा नवा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. शिर्डी रस्त्यावरील काकडी विमानतळानजीक झालेल्या अपघातात राजपाल यांच्या डोक्याला मार लागला होता. सुरुवातीला संगमनेर व त्यानंतर पुण्यात त्यांच्यावर उपचार करण्यात आले, मात्र अपघातात त्यांच्या मेंदूला मोठी इजा झाल्याने तो पूर्णतः निकामी (ब्रेन डेड) झाला होता. अशा स्थितीत त्यांचे माघारी येणे जवळपास अशक्य असल्याने जगमोहन यांची पत्नी, कन्या व बहीण-भावांनी त्यांना सदैव जिवंत ठेवण्यासाठी त्यांचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाने पाच जणांना जीवदान मिळाले आहे, त्यातील एकजण नाशिकमधील आहे. राजपाल परिवाराने दाखवलेल्या या दातृत्त्वाचे समाजाच्या सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

संगमनेरातील प्रसिद्ध व्यापारी जगमोहन नानकचंद राजपाल गेल्या मंगळवारी (ता.18) आपल्या दुकानातील एका कामगाराला सोबत घेवून दुचाकीवरुन कोपरगावकडे जात होते. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास त्यांची दुचाकी काकडी विमानतळाजवळून जात असताना तेथून एका विमानाने उड्डाण केले. त्याकडे पाहण्याच्या नादात जगमोहन राजपाल यांची दुचाकी रस्ता सोडून एका दगडावर जावून आदळली. या अपघातात दुचाकीवरुन उडून दगडावरच पडल्याने राजपाल यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि ते बेशुद्ध झाले, तर त्यांचा सहकारी किरकोळ जखमी झाला. अपघातानंतर त्यांच्या सहकार्‍याने तत्काळ 108 क्रमांकावर फोन करुन अपघाताची माहिती दिल्याने अवघ्या काही मिनिटांतच रुग्णवाहिका हजर झाली.

जखमी राजपाल यांना सुरुवातीला संगमनेरातील एका मोठ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांच्या मेंदूत अंतर्गत रक्तस्राव सुरु झाल्याने त्यांच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याने त्यांना पुण्याला हलविण्यात आले. रात्री उशिराने पुण्यातील रुग्णालयात त्यांच्यावर अतिशय अवघड समजली जाणारी शस्त्रक्रियाही करण्यात आली, मात्र त्यातून त्यांचा मेंदू निकामी (ब्रेनडेड) झाल्याचे समोर आले. ब्रेनडेड म्हणून घोषित केलेल्या व्यक्तीचा मेंदू निकामी होवून त्याचे कार्य पूर्णतः थांबलेले असते आणि त्यात सुधारणा होण्याची शक्यताही शून्य असते. कृत्रिम जीवरक्षण यंत्रणेच्या (व्हेंटिलेटर) मदतीने अशा व्यक्तीचे हृदय मात्र कार्यरत राहते व शरीरातील रक्तप्रवाहही सुरु असल्याने ती व्यक्ती जिवंत असते, मात्र वैद्यकीय दृष्टीने अशा रुग्णाला मृत म्हणूनच समजले जाते.

जगमोहन राजपाल यांचा मेंदू झाल्याची माहिती त्याच दिवशी पहाटे रुग्णालयाने त्यांचे बंधू हरीश यांना सांगितली व अवयव दानाबाबतही त्यांना विनंती करण्यात आली. त्यांनी आपली सामाजिक बांधिलकी ओळखून ब्रेनडेड असलेल्या जगमोहन यांच्या जावयांशी संवाद साधून परिवारातील अन्य सदस्यांना विश्वासात घेतले. राजपाल यांची कन्या पूजा यांनीही आपल्या वडिलांचे अवयव अन्य कोणाला जीवदान देवू शकत असतील ते दान करण्यास सहमती दर्शविली. त्यानंतर परिवारातील अन्य सदस्यांनी जगमोहन यांची पत्नी पूनम, दुसरे बंधू दिलीप व त्यांच्या दोघा बहिणींना विश्वासात घेवून त्यांनाही या निर्णयासाठी राजी केले.

त्यानुसार मेंदू निकामी झालेल्या जगमोहन राजपाल यांच्या अवयवदानाचा निर्णय झाल्यानंतर त्यांची शारीरिक तपासणी करण्यात आली व त्यातून त्यांचे यकृत (लिव्हर) व दोन मूत्रपिंड (किडनी) सुस्थितीत असल्याने अन्य रुग्णांना त्याचा लाभ मिळावा यासाठी ते दान करण्याचा आदर्श निर्णय घेण्यात आला. त्यांचे यकृत पूर्णतः चांगले असल्याने त्यातून तिघांना तर दोन मूत्रपिंडातून दोघांना अशा एकूण पाचजणांना त्यांचे अवयव देण्यात आले आहेत. त्यातील एक मूत्रपिंड नाशिकमधील एका रुग्णाला देण्यात आले असून उर्वरीत अवयव पुण्यातच नोंदणी झालेल्या अन्य चार रुग्णांना प्रत्यारोपित केले जाणार आहेत.

सन 1954 साली जगातील पहिले अवयवदान व त्याचे प्रत्यारोपण झाले होते तर भारतात 1998 साली पहिली प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. साधारण शरीरयष्टीची एकव्यक्ती मृत्यूनंतरही आठजणांना जीवनदान देवू शकते. दरवर्षी दोन ते अडीच लाख रुग्णांना मूत्रपिंडाची तर सुमारे लाखभर रुग्णांना यकृताची गरज असते. मात्र आपल्या देशात अवयदानाबाबत फारशी जागरुकता नसल्याने यातील अवघ्या दोन ते तीन टक्के लोकांनाच अवयव प्राप्त होतात. संगमनेरच्या राजपाल परिवाराने दाखविलेल्या दातृत्त्वातून समाजासमोर नवा आदर्श उभा राहिला असून या आदर्श निर्णयाबद्दल जगमोहन राजपाल यांच्या पत्नी पूनम, कन्या पूजा, जावई, दोघे भाऊ, बहिणी व जगमोहन यांच्या मुलाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Visits: 30 Today: 1 Total: 114606

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *