अखेर डॉ.योगेश निघुते यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल! मयत डॉ.पूनम यांच्या भावाची फिर्याद; चारित्र्यावर संशयासह वारंवार पैशांचीही करीत होता मागणी..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेरातील तरुण महिला डॉ.पूनम योगेश निघुते यांच्या आत्महत्या प्रकरणास कलाटणी मिळाली असून घटनेनंतर चौथ्या दिवशी त्यांच्या भावाने शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. गेल्या दहा वर्षांपासून डॉक्टर योगेश हा आपल्या बहिणीला कशा पद्धतीने शारीरिक व मानसिक यातना देत होता याची इत्यंभूत माहिती या तक्रार अर्जात देण्यात आली आहे. याशिवाय त्याच्या मागणीवरुन तिच्या वडिलांनी वेळोवेळी बँक खात्यात भरलेल्या सुमारे साडेसात लाख रुपयांच्या रकमेचा तपशीलही फिर्यादीत देण्यात आला आहे. त्यावरुन पोलिसांनी संगमनेरच्या कथित प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ असलेल्या डॉ.योगेश यशवंत निघुते याच्या विरोधात पैशांसाठी शारीरिक व मानसिक त्रास देवून मारहाण करण्यासह आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या वृत्ताने अहमदनगर जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या रविवारी (ता.29) संगमनेरातील तरुण महिला डॉ.पूनम योगेश निघुते यांनी आपल्या ताजणे मळा परिसरातील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. अतिशय सुस्वभावी आणि हुशार असलेल्या तरुण महिला डॉक्टरने आत्महत्या केली असेल यावर कोणाचाही विश्वास बसला नाही अशी ही घटना होती. त्याच दिवशी मध्यरात्रीनंतर तीन वाजता संगमनेरात पोहोचलेल्या त्यांच्या माहेरच्या मंडळींनी डॉक्टर पूनम या आत्महत्या करणार नाहीत असा ठाम विश्वास व्यक्त करीत घातपाताचा संशय व्यक्त केला होता. तसेच डॉ.योगेश हा शहरातील परिचित बालरोगतज्ज्ञ असल्याने त्याच्या दबावापोटी उत्तरीय तपासणी अहवालात गडबड होण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या इच्छेनुसार कारवाई करण्याची तयारी दाखविली होती. त्यानुसार मयत डॉक्टर पूनम यांची उत्तरीय तपासणी औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (घाटी) इनकॅमेरा करण्यात आली होती. त्यानंतर सोमवारी त्यांच्या माहेरी जालना येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अंत्यविधी नंतरचे सोपस्कार उरकल्यानंतर मयत पूनम यांचे बंधू शरद कमलाकर कोलते (वय 32, रा.जूना जालना) यांनी आज (ता.01) सायंकाळी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात डॉक्टर योगेश यशवंत निघुते याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की दहा वर्षांपूर्वी 8 जुलै 2011 रोजी डॉक्टर पूनम व डॉक्टर योगेश निघुते यांचा जालना येथे थाटामाटात विवाह झाला. जिल्हा परिषद सेवेत असलेल्या कमलाकर कोलते यांनी आपल्या ऐपतीपेक्षा कितीतरी अधिक चांगल्या पद्धतीने हा सोहळा पार पडला. मुलीला अपेक्षित असलेला डॉक्टर पती मिळाल्याने त्यांच्या माहेरची मंडळी आनंदात असतानाच अवघ्या सहा महिन्यातच डॉक्टर योगेश याने आपले खरे रुप दाखवण्यास सुरुवात केली आणि पैशांच्या मागणीसाठी तो आपली पत्नी पूनमकडे एक सारखा पैशांंचा तगादा लावू लागला. त्यातूनच त्याने मारहाण करण्यासही सुरुवात केली. त्याच्या मारहाणीच्या भीतीने डॉक्टर पूनम आपले वडील व भाऊ यांना फोन करून गुपचूप या गोष्टी सांगत.
आपला जावई उच्चशिक्षित आहे, आज नाहीतर उद्या परिस्थिती सुधारेल अशी समजूत घालून मयत डॉक्टर पूनम यांचे वडील वेळोवेळी तिच्या खात्यात काही रक्कम टाकीत व ती रक्कम नंतर डॉक्टर योगेश निघुते याच्या हाती जात. अशा पद्धतीने मागील आठ वर्षात मयत डॉक्टर पूनम यांच्या वडिलांनी टप्प्याटप्प्याने अडीच लाख रुपयांचा भरणा त्यांच्या खात्यात केला होता. याच दरम्यानच्या काळात डॉक्टर योगेश याला दारुचे व्यसन जडले. त्यातून डॉक्टर पूनम यांच्या मानसिक व शारीरिक छळात मोठी वाढ झाली. त्याच्या या व्यसनाला वैतागून त्याचे स्वतःचे आई-वडील त्याचे घर सोडून आपल्या मूळगावी लोणी येथे जाऊन राहू लागले. आपल्या संशयी वृत्तीमूळे डॉक्टर योगेश आपल्या पत्नीस कधीही माहेरी जाऊ देत नव्हता. 2019 मध्ये त्याने अचानक पाच लाख रुपयांची मागणी करीत डॉक्टर पूनम यांना प्रचंड त्रास देण्यास व मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्यांच्या वडिलांनी धनादेशाद्वारे पाच लाख रुपयांची रक्कम त्यांना दिली. या कालावधीत स्वतः एम.बी.बी.एस. असलेल्या डॉक्टर पूनम यांची संगमनेर नगरपालिकेच्या कॉटेज रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. मात्र डॉक्टर योगेश त्यावरुन त्यांच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला व त्यांना मारहाण करु लागला. त्यामुळे त्यांनी अल्पावधीतच ती नोकरी सोडून दिली.
डॉक्टर पूनम यांना एम.डी होण्याची खूप इच्छा होती. त्यासाठी त्यांनी मुंबईच्या लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशही घेतला होता. मात्र संशयाच्या कारणावरुन डॉक्टर योगेशने त्यांना आपला प्रवेश रद्द करण्यास भाग पाडले व आपल्याच रूग्णालयात म्हणजेच संगमनेरातील चिरायू चिल्ड्रेन हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करण्यास सांगितले. त्यानुसार डॉक्टर पूनम आपल्या पतीच्या रुग्णालयातच कार्यरत झाल्या. मात्र तेथेही आपल्या कर्मचाऱ्यांशी संबंध असल्याचा संशय घेऊन डॉक्टर योगेशने त्यांना रुग्णालयात येण्यास मनाई केली. गेल्या 11 जून रोजी डॉक्टर पूनम यांचे आई-वडील तिला भेटण्यासाठी संगमनेरात आले होते. मात्र डॉक्टर योगेशने तुम्ही अचानक का आला? पूनमने तुमच्याकडे माझी तक्रार केली का? वगैरे प्रश्नांची सरबत्ती करीत त्यांना आल्या पावली माघारी जाण्यास भाग पाडले. यावेळी जाताजाता त्या दोघाही मातापित्यांनी आपल्या लाडक्या लेकीला समजूतीचे चार बोल सुनावून तेथून निरोप घेतला.
गेल्या महिन्यात 22 ऑगस्ट रोजीच्या रक्षाबंधनासाठी डॉक्टर पूनम या आपल्या माहेरी जालना येथे गेल्या होत्या. रक्षाबंधनाचा सण झाल्यानंतर 24 ऑगस्ट रोजी त्या पुन्हा सासरी येण्यास निघाल्या. यावेळी आपल्या एकुलत्या एक बहिणीने आणखी दोन-चार दिवस राहावे असा आग्रह त्यांचे बंधू शरद यांनी केला, मात्र मी जर थांबले तर डॉक्टर योगेश माझ्या चारित्र्यावर संशय घेतील व विनाकारण मला पुन्हा मारहाण होण्यास सुरुवात होईल ही भीती त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे ठरल्या दिवशीच त्या आपल्या सासरी संगमनेर येथे आल्या. त्यानंतर अवघ्या पाच दिवसात त्यांनी आपल्या राहत्या घरातच गळफास घेऊन गेल्या दहा वर्षांपासून सुरु असलेला शारीरिक व मानसिक त्रास, सतत संशयातून होणारी अमानुष मारहाण यातून मुक्ती मिळवली. ज्या दिवशी डॉक्टर पूनम यांनी आत्महत्या केली, त्यादिवशी त्यांचे आई-वडील वृंदावन-मथुरा या तीर्थस्थानी श्रीकृष्णाच्या भजन-कीर्तनात तल्लीन होते. त्याचवेळी त्यांना ही दुर्दैवी घटना समजली.
डॉक्टर पूनम यांचे वडील कमलाकर कोलते हे जिल्हा परिषदेत सेवेत होते. सध्या ते सेवानिवृत्त आहेत. याशिवाय डॉक्टर पूनम यांना एकुलता एक शरद हा भाऊ असून त्यांंचे जूना जालना शहरात होलसेल मेडिकलचे दुकान आहे. वडीलांचे निवृत्तीवेतन आणि मेडिकल दुकानातून मिळणारे उत्पन्न यावरच कोलते कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालतो. शरद हे विवाहित असून त्यांना दोन अपत्ये आहेत. मध्यमवर्गीय श्रेणीतील कोलते कुटुंब अत्यंत आनंदाने जीवनाचा प्रवास करीत असताना अर्ध्यावरच त्यांच्या कुटुंबातील सर्वात लाडकी एकुलती एक लेक अशा पद्धतीने त्यांना सोडून गेल्याने या संपूर्ण कुटुंबालाच जबर धक्का बसला आहे. आज डॉक्टर पूनम यांच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरुन लग्नापासून शारीरिक व मानसिक त्रास देऊन मारहाण केल्याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 304 (ब), पैशांसाठी शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी कलम 498 (अ) व आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी 306 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पंकज शिंदे करीत आहेत.
मयत डॉक्टर पूनम निघुते या 22 ऑगस्ट रोजी आपल्या बंधुरायाला राखी बांधण्यासाठी आपल्या माहेरी जालना येथे गेल्या होत्या. त्यानंतर दोनच दिवसांनी म्हणजेच 24 ऑगस्ट रोजी त्यांचे बंधू शरद कोलते यांनी त्यांना संगमनेर येथे आणून सोडले. त्यानंतर जेमतेम पाच दिवसांंत त्यांनी आत्महत्या करीत आपला जीव दिल्याने कोलते कुटुंबीयांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. अवघ्या दहा दिवसांपूर्वी राखी बांधण्यासाठी आलेली आपली बहीण यानंतर कधीही परत येणार नाही या विचाराने त्यांचे बंधू शरद यांना वारंवार रडू कोसळत आहे.
Visits: 22 Today: 1 Total: 115268