अन्न व औषध विभागाकडून संगमनेरात कारवाईचा ‘दिखावा’! बरबटलेले हात पोहोचले पानटपर्‍यांवर; मुख्य तस्करांवर मात्र मेहरबानी कायम..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
तरुणाईचा नास करणार्‍या गुटखा व सुगंधित तंबाखूवर राज्यात बंदी आहे. मात्र राज्यातील महानगरे असोत अथवा ग्रामीण भागातील एखादे खेडे अशा कोणत्याही ठिकाणी आजही गुटखा सर्रास मिळतो. त्यामागील कारणांची फार मीमांसा करण्याची गरज नसून अन्न व भेसळ विभागासह पोलिसांच्या आर्थिक संबंधातून बंदी असलेला हा धंदा खुलेआम सुरू आहे हे जगजाहीर आहे. मात्र अधुनमधून माध्यमांनी आवाज उठविल्यानंतर चर्चेची राळ दाबण्यासाठी कारवायांचे अस्त्रही वापरले जाते. तसाच काहीसा प्रकार बुधवारी संगमनेरातही घडला. ‘खास’ अहमदनगरहून ‘निमगाव जाळी’ ओलांडीत संगमनेरात पोहोचलेल्या महाशयांनी शहरातील तिघा पानटपरीचालकांना लक्ष्य करीत आठ-दहा हजारांचा गुटखा जप्त करुन आपली पाठ थोपटून घेतली व जाताजाता मोठ्या तस्करांचा ‘स्नेह’ घेवून पुन्हा आपली ‘आराम’ खुर्ची गाठली.

बुधवारी (ता.19) अहमदनगरच्या अन्न व भेसळ विभागाने आपले कर्तव्य तत्पर अन्नसुरक्षा अधिकारी प्रदीप पवार यांना ‘खास’ कारवाईसाठी संगमनेरात धाडले. या महाशयांनी शहरात चौफेर फटका मारुन शहर पोलीस ठाण्याच्या अगदी समोरच असलेल्या मोईनुद्दीन जैनुद्दीन शेख याच्या पानटपरीवर छापा घालीत सुमारे चौदाशे रुपयांचा गुटखा, सुगंधी तंबाखू व मावा जप्त केला. तेथून पुढे नाशिक रस्त्यावरील पंचवटी पान शॉपवरही अशीच कारवाई करीत सुमारे पाच हजारांचा गुटखा हस्तगत करण्यात आला. पोलीस ठाण्याकडे येतायेता या महाशयांना बसस्थानका समोरील शिवगणेश पान स्टॉलवर काहीशी गर्दी दिसल्याने त्यांनी तेथेही डोकावून साडेचार हजारांचा गुटखा जप्त केला.

बुधवारी दुपारी अडीच वोजल्यापासून पाच वाजेपर्यंत या सर्व कारवाया पूर्णही झाल्या आणि मुद्देमालासह तीनही टपरी चालकांना पोलीस ठाण्यातही आणण्यात आले. मात्र पवार महाशयांना प्रत्यक्ष तक्रार दाखल करण्यास मध्यरात्र उलटली. आता कारवाईसाठी इतका वेळ का लागला हे वेगळं सांगायची गरज नाही. मध्यरात्रीच्या सुमारास या तिघांवरही भा.दं.वि. सह  अन्नसुरक्षा कायद्याच्या विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले व आपली संगमनेर ‘व्हिजिट’ भलतीच यशस्वी झाल्याच्या आनंदात त्यांनी पुन्हा अहमदनगरचे आपले कार्यालय गाठले. खरेतर संगमनेर हे जिल्ह्यातील गुटखा तस्करीत महत्त्वाचे ठिकाण आहे हे आता लपून राहिलेले नाही. शहरापासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर निमगाव जाळीत महिन्याकाठी कोट्यावधीचा गुटखा विकणारा मोठा मासा रहातो. तेथेच त्याचे भलेमोठे गोडावूनही आहे.

कधीकाळी गुटखा किंग समजला जाणारा, मध्यंतरी दोन-चारवेळा कारवाया होवून गजाआडही बसलेला आणि आता पुन्हा एकदा सक्रीय झालेल्या त्या गुटखा किंगने शहरातील एका ‘भारदस्त’ वजनाच्या राजकीय पुढार्‍याचा हात धरला आहे. त्याच्या मदतीने अधिकार्‍यांशी ‘बोलणी’ करुन शहरात त्याने पुन्हा एकदा बस्तान बांधले आहे. बुधवारच्या कारवाईत मात्र नगरहून आलेल्या महाशयांना त्याचे नावच आठवले नाही. त्यामुळे त्याच्याकडूनच दोन-चार पुडे आणून पानटपरीवर विकणारे गजाआड झाले मात्र त्या महाशयांना नव्याने पुन्हा उभा राहीलेला हा गुटखा तस्कर मात्र दिसलाच नाही. यावरुन ही कारवाई म्हणजे गेल्या काही दिवसांपासून माध्यमात सुरू असलेल्या बातम्यांची राळ खाली बसविण्यासाठी केला गेलेला केवळ दिखावा होता हे अगदी स्पष्टपणे समोर आले असून या गोरखधंद्यात अन्न व औषध प्रशासनासह स्थानिक पोलिसांचेही हात बरबटलेले आहेत हे अगदी उघड आहे.

Visits: 9 Today: 1 Total: 115276

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *