राहुरीचा पूर्वभाग अतिवृष्टी नुकसान भरपाईपासून वंचित तातडीने भरपाई न दिल्यास आंदोलनाचा दिला इशारा

नायक वृत्तसेवा, राहुरी
2022 च्या सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा सर्व मंडलातील गावांना तडाखा बसला आहे. मात्र, दोन मंडल वगळता इतर मंडलातील शेतकर्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळाली नसून शासनाने राहुरी तालुक्याच्या पूर्व भागातील उर्वरित वंचित मंडलातील गावांना तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

सुरुवातीला जून महिन्यात पावसानं दडी मारली होती. त्यानंतर मात्र, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात राज्यात पावसाने धुमाकूळ घातला होता. अहमदनगर जिल्ह्यातील इतर तालुक्यांप्रमाणे राहुरी तालुक्यातही अतिवृष्टी झाली. यामुळे शेतकर्याची उभी पिकं वाया गेली होती. हाती आलेली पिकं वाया गेल्याने शेतकरी संकटात सापडला होता. सोयाबीन, कापूस, फळबागा या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. पिकांच्या नुकसानीसह काही ठिकाणी शेतकर्यांच्या जमिनी देखील खरवडून गेल्या होत्या.

याचा मोठा आर्थिक फटका शेतकर्यांना बसला होता. त्यानंतर परतीच्या पावसानेही राज्यभरात धुमाकूळ घातला होता. अतिवृष्टीतून वाचलेली पिके या परतीच्या पावसानं वाया गेली. परतीचा पाऊस लांबल्यामुळे काढणीला आलेली पिके आडवी झाली होती. खरिपाच्या शेतीला तळ्यांचे स्वरूप आले होते. जवळपास 15 ते 20 दिवस शेतीत या पावसाचे पाणी वाहत होते. कपाशीच्या वेचणीच्या ऐन हंगामात यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेतकर्यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला होता.

जिरायती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकर्यांना 6 हजार 800 रुपये प्रतिहेक्टर ऐवजी 13 हजार 600 रुपये प्रतिहेक्टर इतकी मदत देण्यात येणार आहे. तर बागायती पिकांच्या नुकसानीसाठी 13 हजार 500 प्रतिहेक्टर ऐवजी 27 हजार प्रतिहेक्टर देण्यात येणार आहे. तर बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी 18 हजार प्रतिहेक्टर ऐवजी 36 हजार रुपये प्रतिहेक्टर देण्यात येणार असल्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. या बातमीची सर्वत्र वाहवा झाली. यामुळे नुकसानग्रस्त शेतकर्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, अद्याप पहिलीच मदत शेतकर्यांना मिळाली नसल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. त्यातच राहुरी तालुक्यात जवळपास बरीच गावे या नुकसान भरपाईपासून वंचित राहिल्याने सरकारने कोणत्या निकषांच्या आधारे या गावांना नुकसान भरपाईपासून डावलले? असा सवाल आता शेतकरी वर्गातून उपस्थित होत आहे. शासनाने नुकसान भरपाईपासून वंचित असलेल्या शेतकर्यांच्या बँक खात्यावर तातडीने भरपाईची रक्कम वर्ग करावी. अन्यथा आंदोलनाचा इशारा शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन म्हसे, राष्ट्रवादीचे विजय कातोरे, रमेश म्हसे, शिलेगावचे सरपंच संदीप म्हसे, अरुण डोंगरे, अमोल पेरणे, उमेश पेरणे, वैभव पेरणे, लक्ष्मण म्हसे, पोपट म्हसे, भाऊसाहेब देवरे, भाऊसाहेब शिरसाठ, शिवाजी औटी, अप्पासाहेब म्हसे, भीमराज म्हसे, मधुकर म्हसे, राकेश म्हसे तालुक्याच्या पूर्वभागातील शेतकर्यांनी दिला आहे.
