अहमदनगरमधील घटनेची संगमनेरच्या प्रशासनाने दखल घेण्याची गरज! संगमनेरकरांचा जीव गुदमरला; शहराच्या चौफेर हातगाड्या आणि अतिक्रमणांचा विळखा..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या शुक्रवारी अहमदनगरच्या कापड बाजारातील अतिक्रमणधारकांनी तेथील एका दुकानदारावरच चाकू हल्ला करुन दोघांना जखमी केले. त्यातून या टोळक्याने संपूर्ण बाजारपेठेत दहशत निर्माण करण्याचाही प्रयत्न केला. ही घटना वरकरणी एका शहरापुरती भासत असली तरीही त्याची पुनरावृत्ती जिल्ह्यातील अन्य मोठ्या शहरांसह संगमनेरात होण्याची दाट शक्यताही यातून स्पष्टपणे समोर आली आहे. संगमनेरातही मध्यंतरी अशाप्रकारच्या दोन घटना घडून त्यातील एका घटनेत दोघा-चौघांनी एका व्यापार्‍याच्या दुकानात घुसून त्याला दमबाजी केल्याचे उदाहरण ताजे आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने अतिक्रमणातून शहराचे सामाजिक स्वास्थ बिघडण्यापूर्वीच नगरच्या घटनेतून धडा घेण्याची गरज निर्माण झाली आहे. सध्या संगमनेरचा प्रत्येक चौक आणि रस्ता अशाच बेकायदा अतिक्रमण, हातगाड्या आणि पथार्‍यांनी व्यापला असून त्यात परवानाच नसलेल्या प्रवाशी रिक्षांचीही लक्षणीय भर पडली आहे. त्यातून नगरच्या घटनेची संगमनेरात पुनरावृत्ती टाळण्यासाठी पालिका आणि पोलिसांनी समन्वयातून धडक कारवाईची गरज निर्माण झाली आहे.

गेल्या शुक्रवारी (ता.14) नगरमधील कापड बाजारातील दीपक नवलानी या व्यापार्‍याने आपल्या दुकानाच्या दारातच हातगाडी लावून रस्ता अडवणार्‍या अतिक्रमणधारकाला रस्ता सोडून उभे राहण्याची विनंती केली. त्याचा राग मनात धरुन प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे मुजोरी वाढलेल्या ‘त्या’ अतिक्रमणधारकाने आपल्या साथीदारासह दीपक नवलानी या व्यापार्‍यावर चाकूने सपासप वार केले. हा प्रकार घडवणारे दोघे-चौघेच होते, मात्र तो प्रकार पाहणार्‍यांची संख्या शेकडोंनी होती हे विशेष. त्यातील एकानेही हातात जीवघेणे शस्त्र असलेल्या त्या गुंडांना रोखण्याचा प्रयत्न केला नाही. हा सगळा प्रकार पाहणार्‍या आणि या गुंडांची दहशत सोसणार्‍या प्रणील बोगावत या दुसर्‍या एका व्यापार्‍याने मात्र हिंमत दाखवून आपल्या मित्राला मदत करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्यावरही अतिक्रमणातून जन्माला आलेल्या या गुंडांनी हल्ला चढवून त्यालाही जखमी केले. हा प्रकार नगरच्या संपूर्ण बाजारपेठेवर दहशत निर्माण करणारा ठरला.

नगरमधील घटना स्पष्टपणे समोर आल्याने चर्चेत आहे. मात्र असेच प्रकार यापूर्वीही आणि आजही संगमनेरात दररोज घडत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. मध्यंतरीच्या कालावधीत अशोक चौकातील महेश पतसंस्थेजवळ दोन फेरीविक्रेत्यांचे एकमेकांशी वाद होवून त्यातून एकाने दुसर्‍यावर थेट जीवघेण्या शस्त्रांसह हल्ला करण्याचा प्रकार घडला होता. तर दुसर्‍या घटनेत नवीन नगर रस्त्यावर भर रस्त्यात फळांची हातगाडी उभी करुन ‘भोंगा’ लावून फळांची विक्री करणार्‍याला फक्त ‘भोंग्याचा’ आवाज कमी करण्याची सूचना केली म्हणून चार ते सहा जणांनी गजबजलेल्या या परिसरातील त्या व्यापार्‍याच्या अधिकृत दुकानात घुसून त्याला दमबाजी करण्याचा प्रयत्न झाला होता. विशेष म्हणजे याबाबत ‘त्या’ व्यापार्‍याने अनेकवेळा हेलपाटे मारुनही पोलीस त्याची दखल घेण्यास तयार नसल्याचा धक्कादायक प्रकारही त्यातून समोर आला होता.

त्यावरुन शुक्रवारी जे नगरमध्ये घडले, त्याची पुनरावृत्ती संगमनेरात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. संगमनेर शहरातील बसस्थानकाचा परिसर असो, अथवा नवीन नगर रोड. शहराची मुख्य बाजारपेठ असलेला मेनरोड असो, अथवा गावठाण व उपनगरांना जोडणारा छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते चावडीपर्यंतचा रस्ता असो अशा प्रत्येक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे बोकाळली असून हातगाड्या, पथार्‍या व फेरीविक्रेत्यांमुळे सर्वसामान्य नागरिक, महिला व विद्यार्थ्यांना या रस्त्यांवरुन अक्षरशः जीव मुठीत धरुनच प्रवास करावा लागतो. त्यातून अनेकदा वाहनचालक आणि अतिक्रमणधारकांत खडाजंगीही होत असते. याशिवाय शहरातील एकही वर्दळीचा रस्ता अथवा चौक नाही जेथे अशा अतिक्रमणधारकांची मुजोरी दिसत नसेल. त्यावरुन त्यांना नेमके पाठबळ तरी कोणाचे असा सहज प्रश्नही सामान्य माणसांच्या मनात निर्माण झाला आहे.

वैभवशालीचा ढोल वाजवणार्‍या संगमनेर शहरातही अतिक्रमणधारकांची मुजोरी गगनाला भिडलेली असताना गेल्याकाही वर्षात त्यात बेकायदा रिक्षा आणि त्यांचे अनधिकृत थांबे यांची दररोज नव्याने भर पडत आहे. महानगरांमध्ये कालबाह्य ठरलेल्या आणि तेथील प्रशासनाने भंगारात काढलेल्या प्रवाशी रिक्षा संगमनेरात राजरोस आणून त्यातून प्रवाशांची वाहतूक केली जाते. या सर्व घटनाक्रमातून शहरातील प्रवाशी रिक्षांची संख्याही प्रचंड वाढल्याने त्यातील अनेकांनी परस्पर वाट्टेल तेथे आपापले थांबे निर्माण केले असून दुकानदार, पादचारी व प्रवाशांना अडथळे निर्माण केले जात आहेत. त्यांना विरोध केल्यास हमरीतुमरीच्या घटनाही समोर आल्याने आणि त्यातच पालिका व पोलीस प्रशासनाने त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याने दिवसेंदिवस अतिक्रमणधारकांसह शहरात शेकडोंच्या संख्येने असलेल्या भंगारातील प्रवाशी रिक्षांचे चालक मुजोर बनले असून त्यांना विरोध करणे म्हणजे अंगावर घेण्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे.

शुक्रवारच्या नगरमधील घटनेनंतर पुन्हा असे प्रकार घडू नयेत यासाठी अहमदनगर महापालिकेने कापडबाजार, गंज बाजार, शहाजी रोड व घासगल्ली सारख्या गजबजलेल्या ठिकाणी गेल्या दोन दिवसांपासून धडक मोहीम राबवून तेथील सर्व प्रकारची अतिक्रमणे काढून या भागात हातगाड्या व पथार्‍या लावण्यास मज्जाव केला आहे. दोघा व्यापार्‍यांवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर तेथील व्यापारी एकजूट झाल्याने व त्यांनी बाजारपेठा बंद ठेवून प्रशासनाला कारवाईस भाग पाडल्याने महापालिकेला कारवाई करावी लागली. संगमनेरचे प्रशासनही सध्या अशाच एखाद्या घटनेची तर वाट बघत नसेल? अशी स्थिती आज दिसत असून अशा घटनेतून शहराचे सामाजिक सौहार्द बिघडण्यापूर्वीच पालिका आणि पोलीस प्रशासनाने पुढाकार घेवून त्यावर नियंत्रण मिळवण्याची गरज आहे.


अतिक्रमणधारक, फेरी विक्रेते, फळविक्रेते व आता त्यात मोठी भर पडलेले अनधिकृत प्रवाशी रिक्षांचे थांबे यामुळे संगमनेरातही गजबज वाढली असून त्यातून पादचारी, प्रवाशी आणि व्यापार्‍यांचे त्यांच्याशी खटके उडण्याचे प्रसंग वेळोवेळी समोर येत आहेत. नगरच्या घटनेने त्याचे पर्यवसान दाखवले असून संगमनेरातही असेच प्रकार घडण्याची दाट शक्यता असल्याने ते टाळण्यासाठी संगमनेर नगरपरिषदेने धडक अतिक्रण हटाओ मोहीम राबविण्याची गरज आहे. अन्यथा येणार्‍या काळात नगरच्या घटनेची संगमनेरात पुनरावृत्ती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Visits: 246 Today: 1 Total: 1416243

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *