आंबीखालसा फाटा व घारगावमध्ये नियमांचे उल्लंघन करणार्यांवर दंडात्मक कारवाई! घारगाव व डोळासणे महामार्ग वाहतूक पोलिसांची मोहीम; नियम पाळण्याचेही केले आवाहन
![]()
नायक वृत्तसेवा, घारगाव
पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर सर्रासपणे नियमांचे उल्लंघन करुन प्रवास करणार्या नागरिकांवर आंबीखालसा फाटा व घारगाव येथे पोलिसांनी दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. एकीकडे कोरोनाचे संक्रमण वाढतेय तर दुसरीकडे वाहतुकीचे नियम पाळत नसल्याने अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर घारगाव व डोळासणे महामार्ग वाहतूक पोलीस प्रत्येकी शंभर रूपयांचा दंड वसूल करुन नियम पाळण्याचे आवाहन करत आहे.

गेल्या काही दिवसांपासून काहिसी विश्रांती घेतलेल्या कोरोना विषाणूने पुन्हा हातपाय पसरले आहे. यासाठी शासनस्तरावर विविध उपाययोजना आखण्यात आल्या असून संबंधित विभागांना अंमलबजावणी करण्यास सूचित केले आहे. त्यानुसार संक्रमण रोखण्यासाठी सर्वच विभाग सरसावले असून, प्रबोधनासह कारवाई केली जात आहे. गुरुवारी (ता.25) सकाळी घारगाव व डोळासणे महामार्ग वाहतूक पोलीस आंबीखालसा फाट्यावर थांबून महामार्गावरुन प्रवास करणार्या वाहनांना थांबवत तपासणी करत होते. यामध्ये विनामास्क, हेल्मेट व सीटबेल्ट न लावणार्यांकडून प्रत्येकी शंभर रुपयांचा दंड वसूल केला आहे.

याचबरोबर घारगाव पोलिसांनी घारगाव बसस्थानका परिसर, मेडिकल, बँका, दुकाने आदी आस्थापनांमध्ये जावून कोविड नियमांचे उल्लंघन करणार्यांवर दंडात्मक कारवाई केली आहे. या कारवाईने नागरिकांची एकच धांदळ उडाल्याचेही पहायला मिळाले. प्रत्येकी शंभर रुपयांचा दंड वसूल करुन कोरोना संक्रमण रोखण्यासाठी नियमांचे तंतोतंत पालन करुन प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहनही केले. या मोहिमेत घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील, महामार्ग वाहतूक पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे, पोलीस उपनिरीक्षक धिरज राऊत, मुख्य हवालदार आदिनाथ गांधले, गणेश लोंढे, सुरेश टकले, राजेंद्र लांघे, राजू खेडकर, संतोष खैरे, विशाल कर्पे, किशोर लाड, गणेश तळपाडे, नारायण ढोकरे, पंढरीनाथ पुजारी, भारत गांजवे, संजय मंडलिक, अरविंद गिरी, उमेश गव्हाणे, कैलास ठोंबरे आदी सहभागी होते.

पठारभागातील गावांचे घारगाव हे मुख्य बाजारपेठेचे केंद्र आहे. यामुळे नेहमीच येथे गर्दी होत असते. त्यातच कोरोना विषाणूचा भडका उडाल्याने ग्रामपंचायतने खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना मास्क लावणे, हात वारंवार स्वच्छ धुणे, सॅनिटायझर वापरणे, गर्दी टाळणे यांसह सर्वच नियमांचे पालन करण्याबाबतचे आवाहन केले आहे. अन्यथा, नियम मोडणार्यांवर सक्तीने कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
