… प्रतीक्षा लागून असलेला आढळा जलाशय ओसंडला! नदीपात्रात अवघ्या दहा क्युसेकने विसर्ग सुरू तर लाभधारकांत पसरले चैतन्य

नायक वृत्तसेवा, अकोले
गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा लागलेल्या आढळा नदीवरील देवठाण येथील मध्यम प्रकल्प शुक्रवारी (ता.8) 4 वाजता ओसंडला. यामुळे लाभक्षेत्रातील अकोले, संगमनेर, सिन्नर तालुक्यातील सोळा गावांतील शेतकर्यांत चैतन्याचे वातावरण पसरले असून, सद्यस्थितीत सांडव्यावरुन 10 क्युसेकने नदीपात्रात विसर्ग सुरू आहे.

आढळा नदीवरील आढळा जलाशय 1 हजार 60 दशलक्ष घनफूट पाणीसाठा होऊन शुक्रवारी पूर्ण क्षमतेने भरला. तीन तालुक्यांतील लाभक्षेत्रातील 3 हजार 914 हेक्टर सिंचन क्षेत्र रब्बी हंगामात या पाण्यावर अवलंबून असते. धरणातील 975 दशलक्ष घनफूट पाणीसाठा सिंचनासाठी उपयुक्त असून उर्वरित 85 दशलक्ष घनफूट मृतसाठा आहे. 1979 पासून ते 2021 पर्यंत धरण 28 वेळा पूर्ण क्षमतेने भरले. यामध्ये फक्त 2018 चा अपवाद आहे. धरणाची उंची 40 मीटर असून पाणलोट क्षेत्र 177 चौरस किमी, सांडव्याची लांबी 144 मीटर असून धरणाची लांबी 623 मीटर आहे. सांडव्याची वहन क्षमता 1 हजार 582 घनमीटर आहे. धरणाला दोन कालवे असून उजवा कालवा 11.80 किमी लांबीचा असून डावा कालवा 8.80 किमी लांबीचा आहे. डावा कालव्याची वहन क्षमता 68 क्युसेक आहे. उजवा कालव्याचे सिंचन क्षेत्र 2 हजार 422 हेक्टर असून डावा कालव्याचे सिंचन क्षेत्र 1 हजार 492 हेक्टर आहे. खरीप हंगामासाठी साधारणपणे 780 हेक्टर सिंचन होते.

मागील वर्षी जलाशय लवकर ओसंडला होता. यंदा मात्र लाभधारकांची चिंता वाढविली होती. तालुक्यातील सारी धरणे स्वातंत्र्यदिनानंतर भरली. परंतु, आढळा मात्र मान्सून परतीच्या वेळी भरले. परतीचा पाऊसही आढळा पाणलोटात म्हणावा असा न झाल्याने अखेरच्या टप्प्यात आवक दरदिवशी साधारण 5 ते 10 दलघफू इतकी अत्यल्प होती. सद्यस्थितीत धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर सांडव्यावरुन 10 क्युसेक्सने पाणी नदीपात्रात वाहू लागले. धरण भरुनही जर पाऊस झाला नाही तर नदीपात्र आणि कालव्यांमधून अतिरीक्त पाणी लाभक्षेत्रात जाणार नाही. परिणामी भूजलस्तर धरण भरुनही खालावतच जाईल, अशी भीती लाभधारकांत आहे. सध्या पाणलोटातून पाण्याची आवक देखील पूर्ण मंदावली आहे. मात्र, जलाशय भरल्याने तीनही तालुक्यांतील 16 गावांच्या 3 हजार 914 हेक्टर क्षेत्रातील लाभक्षेत्रात आढळा धरण पूर्णत्वाने भरल्याने आनंदी वातावरण तयार झाले आहे.

आढळा जलाशयावर अकोले, संगमनेर व सिन्नर तालुक्यातील सोळा गावांचे क्षेत्र ओलिताखाली येते. त्यामुळे दरवर्षी राखीव साठा ठेवून पाटपाण्याचे काटेकोर नियोजन केले जाते. यापुढील हंगामात देखील काटेकोर नियोजन करुन शेवटच्या शेतकर्याला पाणी पोहोचविण्याचा निर्धार आहे.
– रजनीकांत कवडे (शाखा अभियंता)
