अक्षय्यतृतीयेच्या दिनी सर्वधर्मीय सामूदायिक विवाह सोहळा! मालपाणी उद्योग समूहाचा उपक्रम; पंचवीस जोडपी होणार विवाहबद्ध

नायक वृत्तसेवा, संगमनेर
येत्या शनिवारी 22 एप्रिल रोजी अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर मालपाणी उद्योग समूहाच्यावतीने सर्वधर्मीय सामूदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मागील 25 वर्षांपासून सुरु असलेल्या या परंपरेत यंदा संगमनेर तालुक्यातील 25 जोडपी विवाहबद्ध होणार आहेत. मालपाणी लॉन्सच्या प्रशस्त प्रांगणात पार पडणार्या या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली असून जवळपास दहा हजार पाहुण्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार असल्याची माहिती मालपाणी उद्योग समूहाचे संचालक मनीष मालपाणी यांनी दिली.

मालपाणी उद्योग समूहाचे अध्वर्यू स्वर्गीय ओंकारनाथ व स्वर्गीय माधवलाल मालपाणी यांनी 1997 साली या सामाजिक उपक्रमाची सुरुवात केली होती. लोकहिताचा हा उपक्रम जनतेच्या उस्त्फूर्त प्रतिसादाने रौप्य महोत्सवी ठरला आहे. गेल्या अडीच दशकांत या सोहळ्यातून बाराशेहून अधिक परिवार एकमेकांशी जोडली गेले आहेत. अवघ्या एक रुपयाच्या नाममात्र मोबदल्यात होणारा हा सोहळा राज्यात कौतुकाचा विषय ठरत असतो. हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन आणि बौद्ध अशा सर्वधर्मीय वधू-वरांचे विवाह त्यांच्या धार्मिक प्रथेनुसार लावण्यात येतात.

या सोहळ्यासाठी विविध 25 कार्य समित्या काम करीत असून विवाहस्थळी सुसज्ज शाही मांडव, वधू व वरांची स्वतंत्र निवास व्यवस्था, दोन्ही बाजूच्या पाहुण्यांसह निमंत्रितांच्या भोजनाची व्यवस्था, शाही सवाद्य वर मिरवणूक, विवाहबद्ध होणार्या नवदाम्पत्यांना पोषाख, मुंडावळ्या, अक्षता, पुरोहित वृन्दाकडून मंत्रोच्चारात होणारी सप्तपदी व मंगलाष्टके तर बौध्द, मुस्लीम, ख्रिश्चन धर्मियांच्या परंपरेनुसार त्या-त्या धर्मगुरुंच्या उपस्थितीत हे विवाह साजरे होणार आहेत. प्रत्येक दाम्पत्याला मालपाणी उद्योगाच्यावतीने स्टील कपाट, भांडी, भांड्यांची मांडणी व संसारोपयोगी साहित्य असे सुमारे पंचवीस हजारांचे साहित्य भेट म्हणून देण्यात येणार आहे. शनिवार दिनांक 22 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजता मालपाणी लॉन्स, कॉलेज रोड येथे पार पडणार्या या सोहळ्यासाठी सकाळी 10 वाजता वर्हाडी मंडळींचे लग्नस्थळी आगमन होईल. संगमनेरकरांनी या शाही सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहून नवदाम्पत्यांना शुभाशीर्वाद द्यावेत असे आवाहन मालपाणी उद्योग समूहाचे अध्यक्ष राजेश मालपाणी यांच्यासह डॉ. संजय, मनीष, गिरीश, आशीष मालपाणी यांनी केले आहे.
