आपली संस्कृती वैश्विक पातळीवर नेण्याची संधी ः योगमहर्षी स्वामी रामदेव संगमनेरात योगासन परीक्षक प्रशिक्षण कार्यशाळेचा दिमाखदार उद्घाटन सोहळा

नायक वृत्तसेवा, संगमनेर
आपली प्राचीन संस्कृती असलेल्या योगासनांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. या संधीचे सोने करताना वैश्विक पातळीवर योगाचे बीजारोपण करुन आपल्या या महान संकृतीचा परिचय जगाला करुन देण्यासाठी आपण सर्व सज्ज झालो आहोत. या माध्यमातून देशातील मुलांचे शरीर आणि संकल्प पोलादी करण्याचे राष्ट्रकायर्र्ही आपल्या हातून घडणार असल्याचे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय योगासना स्पोर्टस् फेडरेशनचे अध्यक्ष, योगमहर्षी स्वामी रामदेव यांनी केले.

गेल्या महिन्यात आयुष मंत्रालयाकडून मान्यता प्राप्त झालेल्या नॅशनल योगासना स्पोर्टस् फेडरेशनच्यावतीने संगमनेरात तीन दिवसीय योगासन परीक्षक प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी फेडरेशनचे महासचिव तथा एस व्यासा विद्यापिठाचे कुलपती डॉ.एच.आर.नागेंद्र (गुरुजी) व नॅशनल फेडरेशनचे महासचिव डॉ.जयदीप आर्य आदी मान्यवर ऑनलाईन प्रणालीद्वारा तर नॅशनल योगासना स्पोर्टस् फेडरेशनचे अध्यक्ष डॉ.ईश्वर बसवशेट्टी, उपाध्यक्ष डॉ.संजय मालपाणी, योगाचार्य निरंजन मूर्ती, उमंग द्वान, कार्यक्रमाचे समन्वयक सतीश मोहगावकर व पतंजली योग समितीचे समन्वयक भालचंद्र पडाळकर आदी उपस्थित होते.

राष्ट्रीय योगासना स्पोर्टस् फेडरेशनचे महासचिव डॉ.नागेंद्र यांनी योगासनांचा वैश्विक प्रसार करताना ‘ऑॅपरेशन’ नव्हे ‘को-ऑपरेशन’चे तंत्र वापरण्याचा सल्ला देताना देशातील अबालवृद्धांना या प्रवाहात आणण्यासाठी स्पर्धांचे खूप मोठे महत्त्व असल्याचे सांगितले. जगातील असंख्य योगप्रेमी या मिशनमध्ये सहभागी होण्यास उत्सुक असून ही कार्यशाळा त्यासाठी मोठी उपयुक्त सिद्ध होईल. या कार्यशाळेतून तयार होणार्‍या परीक्षकांनी आपल्यातील शक्तीचे एकत्रीकरण करुन महाशक्तीचे जागरण करण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
फेडरेशनचे अध्यक्ष डॉ.बसवशेट्टी यांनी आपले लक्ष्य स्वस्थ आणि सुंदर भारताचे असल्याचे सांगितले. आपली अध्यात्मिक व सांस्कृतिक परंपरा खूप मोठी असून योग हा जन्मतःच भारतीयांच्या अंगी असणारा उपजत गुण आहे. त्याला आता खेळाचा दर्जा प्राप्त झाल्याने त्याचा वेगाने प्रचार आणि प्रसार करण्याची संधी आपल्याला प्राप्त झाली आहे. गेल्या चार दशकांपासून देशातील योगप्रेमी या क्षणाची वाट पहात होते, त्याची आज पूर्ती होत असल्याचा खूप आनंद असल्याचेही ते यावेळी म्हणाले. हे कार्य खूप मोठे असून देशभरातील फेडरेशन व असोसिएशन्सनी एकत्रित येवून आपली संस्कृती जगासमोर नेण्याच्या या प्रयत्नात सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले.

प्रास्तविकात फेडरेशनचे उपाध्यक्ष डॉ.संजय मालपाणी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगमहर्षी स्वामी रामदेव यांनी बघितलेले स्वप्न आज अमृतवाहिनीच्या तीरावरील संगमनेरात साकारत असल्याचा अत्यानंद होत असल्याचे सांगितले. यापुढील काळात आपल्या सर्वांना खूप परिश्रम घ्यावे लागणार आहेत. जे स्पर्धक आपण घडविणार आहोत ते पराक्रमी व्हावेत, यशस्वी व्हावेत असे प्रशिक्षण त्यांना द्यावे लागणार आहे. फेडरेशनची स्थापना झाल्यानंतरचा परीक्षक प्रशिक्षणाचा पहिलाच कार्यक्रम संगमनेरसारख्या ऐतिहासिक नगरीत अमृतवाहिनीच्या तटावर व्हावा हा योगअमृत असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

फेडरेशनचे महासचिव डॉ.जयदीप आर्य यांनी ऑनलाईन प्रणालीद्वारा बोलताना हे कार्य शिखरावर घेवून जाण्याची जबाबदारी आपल्याला घ्यावी लागणार असून त्याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातून होत असल्याचा आनंद व्यक्त केला. योगासनांच्या माध्यमातून व्यसनाच्या आहारी गेलेल्या, परस्परांशी वैरत्त्व प्राप्त केलेल्यांनाही पुन्हा प्रवाहात आणण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. गिरीश डागा यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर उमंग द्वान यांनी आभार मानले.

आजच्या या ऐतिहासिक सोहळ्याचा शुभारंभ ध्रुव ग्लोबल स्कूलच्या ओडिसी नृत्य कलाकार व योगासनपटूंनी यादगार बनविला. नृत्य प्रशिक्षिका सोनाली महापात्र यांच्या दिग्दर्शनाखाली सादर झालेली योगवंदना व योगशिक्षक मंगेश खोपकर यांच्या मार्गदर्शनाखाली सादर झालेल्या योगासनांच्या सुंदर प्रात्यक्षिकांनी हा सोहळा दिमाखदार केला.

Visits: 13 Today: 1 Total: 117112

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *