जिल्ह्यातील सलग रुग्णवाढीने रंगपंचमीचा उत्साह केला बेरंग! जिल्ह्यात आज बारा महिन्यातील उच्चांकी रुग्ण आढळले; शासकीय प्रयोगशाळेचा मेहेरबानीने संगमनेरकरांना मात्र दिलासा.. संगमनेरातील आणखी एका ज्येष्ठ नागरिकाचा कोविडने घेतला बळी…
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संपूर्ण मार्च महिन्याने अहमदनगर जिल्ह्यातील कोविडची स्थिती आकाशाला नेऊन भिडवलेली असताना एप्रिलच्या पहिल्या दोन दिवसांनीही त्यात तीन हजाराहून अधिक रुग्णांची भर घालून जिल्ह्याची अवस्था चिंतेकडून चिंताजनककडे नेली आहे. आजही जिल्ह्यात गेल्या बारा महिन्यातील उच्चांकी 1 हजार 800 रुग्ण आढळून आले आहेत. आजच्या अहवालात नगर शहरातील रुग्णवाढीचा वेग कायम आहे. संगमनेर तालुक्याला मात्र शासकीय प्रयोगशाळेच्या मेहेरबानीने काहीसा दिलासा मिळाला आहे. संगमनेर तालुक्यात आज अन्य तालुक्यातील तिघांसह 71 जणांचे तर अकोले तालुक्यातून 62 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. संगमनेर तालुक्याची एकूण रुग्णसंख्या आता 8 हजार 637 वर जाऊन पोहोचली आहे, सक्रीय रुग्णांची संख्या 608 आहे. गुरुवारी रात्री शहरातील गोविंदनगर परिसरात राहणाऱ्या 68 वर्षीय इसमाचा कोविडने बळीही घेतला आहे.
गेल्या महिन्याभरापासून एकमेकांशी स्पर्धा करणाऱ्या कोविडच्या रुग्णसंख्येने आज गेल्या बारा महिन्यातील रुग्णवाढीचे सर्व विक्रम मोडीत काढून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. आज शासकीय प्रयोगशाळेकडून प्राप्त झालेले 434, खासगी प्रयोगशाळेकडून प्राप्त झालेले 882 व रॅपिड अँटीजेन चाचणी द्वारा समोर आलेले 484 अशा एकूण अठराशे जणांचे अहवाल पॉझिटिव प्राप्त झाले आहेत. सर्वाधिक रुग्ण वाढ होणाऱ्या अहमदनगर महापालिका क्षेत्रात आजही 456 रुग्णांची भर पडली आहे. तर नगरच्या ग्रामीण भागातून एकशे सात जणांना कोविडचे संक्रमण झाल्याचे समोर आले आहे.
त्याखालोखाल राहाता तालुक्यातील कोविडचा उद्रेक अद्यापही भरातच असून आजही तेथून तब्बल 208 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. राहाता तालुक्यातून मोठ्या प्रमाणात रूग्ण समोर येऊ लागल्याने जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी आज पुन्हा एकदा राहात्यात धाव घेत तेथील अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला आहे. त्यासोबतच कोविडचे संक्रमण खंडित करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांबाबत मंथनही सुरू केले आहे. काही तालुक्यातील वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता येणाऱ्या कालावधीमध्ये राहात्यासह संगमनेर, कोपरगाव व श्रीरामपूर या तालुक्यांनाही कठोर निर्बंधांचा सामना करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पाथर्डी तालुक्यातूनही आज तब्बल 136 रुग्ण समोर आले आहेत. श्रीरामपूर येथून 134, कोपरगाव येथून 110, राहुरी येथून 87 भिंगार लष्करी परिसरातून 81, कर्जत मधून 73, नेवासा येथून 72, संगमनेर येथून 71, अकोल्यातून 62, पारनेरमधून 51, जामखेड मधून 44, शेवगाव मधून 37, श्रीगोंदा तालुक्यातून 36 तर अन्य जिल्ह्यातील 35 अशा एकूण अठराशे जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या रुग्णसंख्येने उसळी घेत 98 हजार 41 रुग्णसंख्या गाठली आहे. जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आठ हजाराहून अधिक झाली आहे.
जिल्हा मुख्यालयाच्या खालोखाल गेल्या वर्षभरात कोविड रुग्णांच्या बाबतीत आघाडीवर असलेल्या संगमनेर तालुक्याला मागे टाकीत राहाता तालुक्याने ती जागा पटकाविली आहे. आजही दुसऱ्या क्रमांकाचे रुग्ण राहाता तालुक्यातूनच समोर आले आहेत. मात्र त्याच वेळी शासकीय प्रयोगशाळेच्या मेहेरबानीने वर्षभर आघाडीवर असणारा संगमनेर तालुका मात्र थेट अकराव्या क्रमांकावर फेकला गेला आहे. आज तालुक्यातील 67 जणांचे अहवाल खासगी प्रयोगशाळेकडून तर चौघांचे अहवाल रॅपिड अँटीजेन चाचणीद्वारे प्राप्त झाले. यात श्रीरामपूर येथील 67 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 45 वर्षीय महिला व बेलापूर येथील 55 वर्षीय महिलेचा समावेश आहे. तर शहरातील 29 जणांंसह ग्रामीण भागातील 39 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत.
शहरातील उच्चभ्रू वसाहत समजल्या जाणाऱ्या सुयोग सोसायटीतील 44 वर्षीय महिला, चैतन्य नगर परिसरातील 67 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, सावतामाळी नगर परिसरातील 30 वर्षीय महिला, नवीन नगर रस्त्यावरील 44 वर्षीय महिला, कुंभार आळा परिसरातील 50 वर्षीय महिला, घोडेकर मळ्यातील 49 वर्षीय इसम, इंदिरा नगर मधील 50 व 34 वर्षीय महिला व 42 वर्षीय तरुण, मेनरोड वरील 65 वर्षीय महिला, शासकीय विश्रामगृहा जवळील 21 वर्षीय तरुणी, नाशिक रस्त्यावरील 50 वर्षीय इसम, मालदाड रोड परिसरातील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 32, 28 व 20 वर्षीय तरुण तसेच, 51, 38 व 19 वर्षीय महिला तर केवळ संगमनेर असा पत्ता नोंदविलेल्या 68 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 47 वर्षीय इसम, 35, 34 व 31 वर्षीय तरुण तसेच, 57 37, 27 वर्षीय महिलांसह 19 वर्षीय तरुणी व सहा वर्षीय बालक आदींचा समावेश आहे.
तर तालुक्यातील खांबा येथील 32 वर्षीय महिला, चंदनापुरी येथील 50 वर्षीय महिलेसह 40 वर्षीय तरुण, अरगडे मळ्यातील 21 वर्षीय तरुणी, रायतेवाडी येथील 37 वर्षीय तरुण, तळेगाव येथील 68 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, जांबूत बुद्रुक येथील 35 वर्षीय तरुण, कोल्हेवाडी येथील 63 व 21 वर्षीय महिलांसह 45 वर्षीय इसम, मनोली येथील 25 वर्षीय महिला, साकुर येथील 45 वर्षीय इसमासह 37 व 23 वर्षीय तरुण, चिंचोली गुरव येथील 28 वर्षीय तरुण, चणेगाव येथील 49 व 24 वर्षीय महिला, चिकणी येतील 80 वर्षीय महिला, चिंचपूर येथील 58 वर्षीय इसम, नांदुरी दुमाला येथील 20 वर्षीय तरुणी, देवकवठे येतील 27 वर्षीय तरुण, सुकेवाडी येथील 61 वर्षीय महिला,
गुंजाळवाडी येथील 29 वर्षीय तरुणासह 24 वर्षीय महिला, वाघापूर येथील 62 वर्षीय जेष्ठ नागरिकासह 48 वर्षीय इसम, घुलेवाडी येथील 65 वर्षीय महिलेसह 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, 34 व 22 वर्षीय तरुण आणि 17 वर्षीय तरुणी, माळेगाव येथील 58 वर्षीय इसम, मेंढवण येथील 65 वर्षीय महिला, निमगाव जाळीतील 50 वर्षीय महिला, ओझर खुर्द येथील 21 वर्षीय तरुणी, पिंपळगाव देपा येथील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, सावरचोळ येथील 41 वर्षीय तरुण व शिबलापुर येथील 26 वर्षीय तरुणी अशा एकूण 71 जणांचा अहवाल आज पॉझिटिव प्राप्त झाला आहे. त्यामुळे तालुक्याची एकूण रुग्णसंख्या आता 8 हजार 636 वर पोहोचली आहे तर सक्रिय संक्रमित रुग्णांची संख्या 608 झाली आहे. आज तालुक्यातील 90 जणांना उपचारांती घरी सोडण्यात आले आहे.
Visits: 19 Today: 1 Total: 115760