पिकअपने बैलगाडीला दिली जोराची धडक; तिघांसह बैल जखमी डाऊच खुर्द परिसरातील घटना; जखमींना उपचार करुन दिले सोडून

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
पुणतांबा फाटा ते झगडे फाटा रस्त्यावर भीषण अपघात घडला आहे. पिकअप आणि बैलगाडीचा अपघात झाला. या अपघातामध्ये तिघांसह बैल जखमी झाले आहेत. डाऊच खुर्द परिसरात हा अपघात घडला आहे. अपघातग्रस्त बैलगाडी ऊसतोड करणार्या मजुराची होती.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पुणतांबा फाटा ते झगडे फाटा रस्त्यावर डाऊच खुर्द हद्दीत कर्मवीर काळे कारखान्याची ऊस वाहतूक करणारी बैलगाडी व पिकअप यांच्यात धडक झाली. या अपघातात बैलगाडीमधील दोन पुरुष व एक महिला यांच्यासह बैल जखमी झाले आहे. सदर रिकामी बैलगाडी ही कोपरगावच्या दिशेने जात होती व त्याच दिशेने जाणार्या पिकअपने (क्र. एमएच.04, एचडी.8123) बैलगाडीला धडक दिल्याने बैलगाडीतील राजेंद्र मंगू राठोड (वय 50), दाजीबा राजेंद्र राठोड (वय 30) व एक महिला शोभा दिलीप गायकवाड (वय 35) हे जखमी झाले आहेत. तसेच बैल देखील जखमी झाले आहेत.

या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी सकाळच्या व्यायामाला जात असताना देवा पवार, आकाश पवार व जोगेश्वरी इंटरनॅशनल स्कूलचे व्यवस्थापन सागर होन यांनी ग्रामीण रुग्णालयाला कळवून रुग्णवाहिकेतून जखमींना संत जनार्दन स्वामी हॉस्पिटल येथे उपचारांसाठी पाठवण्यात आले. दरम्यान संत जनार्दन स्वामी हॉस्पिटल येथे चौकशी केली असता सदर जखमींना उपचार करून सोडून देण्यात आले असल्याचे समजते. सदर गुन्ह्याची नोंद अद्याप पोलिसांत झालेली नाही.
