विद्यार्थ्यांचे पन्नास टक्के शुल्क माफ करण्याची भाजपची मागणी

नायक वृत्तसेवा, संगमनेर
खासगी विद्यालये व महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे पन्नास टक्के शुल्क माफ करावे. या मागणीचे निवेदन मंगळवारी (ता.14) संगमनेर तालुका गटशिक्षण अधिकारी के. के. पवार यांच्या माध्यमातून राज्य सरकारला देण्यात आले.

कोरोना काळात अनेक परिवार आर्थिक संकटात सापडले आहेत. सर्वसामान्य शेतकरी, मजूर, वंचित छोटे व्यावसायिक व समाजातील सर्व घटकांना अनेक आर्थिक प्रश्नांना तोंड द्यावे लागत आहे. सध्या मुलांचे शिक्षण ऑनलाईन पध्दतीने सुरू असून शिक्षण संस्थांचे खर्च बर्याच प्रमाणात कमी झालेले असून देखील शिक्षण संस्था पूर्वीप्रमाणे विद्यार्थ्यांकडून भरमसाठ शुल्क आकारत आहेत. हे शुल्क आकारणी खासगी शिक्षण संस्थांनी आकारणे तत्काळ थांबवावे. तसेच कोरोनाच्या विळख्यातून प्रचंड आर्थिक अडचणीत असलेल्या सर्व सामान्य गोरगरीब, मध्यमवर्गीय तसेच समाजातील इतर सर्व घटकांना राज्य सरकारने 50 टक्के शुल्क माफीचा आदेश काढून मदतीचा हात द्यावा, अशा स्वरूपाचे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी भाजप युवा मोर्चाचे उत्तर नगर जिल्हा कोषाध्यक्ष केशव दवंगे, जिल्हा उपाध्यक्ष कल्पेश पोगुल, तालुका सरचिटणीस हरीष वलवे, संतोष हांडे, अनिल निळे, जिल्हा सचिव किरण गुंजाळ, हिवरगाव पावसा गावचे उपसरपंच गणेश दवंगे, तालुका उपाध्यक्ष सुनील घुले, जग्गू शिंदे, तालुकाप्रसिद्धी प्रमुख अरुण शिंदे, ऋषीकेश घोलप, संदीप शिंदे, आकाश भोसले, मंगेश अवचिते आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
