गोल्डनसिटीतील सोनसाखळी चोरांच्या मागावर पोलीस! संगमनेर शहरासह सिन्नर पोलिसांच्या हद्दितही मारला होता हात; तपासाला गती..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या काही महिन्यांपासून पुन्हा सुरु होवू पाहणार्या सोनसाखळी चोरीच्या घटना रोखण्यासाठी संगमनेर पोलीस ‘अॅक्शन मोड’मध्ये आले आहेत. रविवारी नवर्षाच्या दुसर्याच दिवशी गोल्डनसिटीतील गृहिणीच्या गळ्यातील पोत लांबविण्याच्या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची गती वाढवून चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न सुरु केला. तपासादरम्यान एकाच दिवशी या चोरट्यांनी तीन ठिकाणी हात मारल्याचे समोर आले असून त्यातील एक घटना सिन्नर पोलीस ठाण्याच्या हद्दितील आहे. त्यामुळे सोनसाखळी लांबविण्याच्या प्रकरणात आता एकाच आरोपीचा दोन जिल्ह्याच्या पोलिसांकडून स्वतंत्र तपास सुरु झाल्याने हे चोरटे लवकरच जेरबंद होवून त्यांच्याकडून अनेक घटनांचा उलगडा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

रविवारी (ता.2) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास गोल्डनसिटीतील समर्थ कॉलनीत राहणार्या आशा शिंदे या गृहिणीच्या गळ्यातील 17 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत दुचाकीवरील चोरट्यांनी धुमस्टाईलने लांबविली होती. गेल्या वर्षभरापासून शहर पोलिसांनी मुख्य वाहतूकीच्या रस्त्यांवर दिवसभर नाकाबंदी व पोलीस तैनातीचा उपक्रम राबविला. त्याचा परिणाम शहर हद्दित सातत्याने घडणार्या सोनसाखळी चोरीच्या घटनांना पायबंद होण्यात झाला. मात्र मागील काही दिवसांत नाकाबंदीचे रस्ते सोडून आसपासच्या उपनगरांतील महिलांना चोरटे लक्ष्य करु लागल्याचे समोर आले. त्यामुळे पोलीस अधिक सतर्क झाले असून पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांनी सूत्रे हाती घेत पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्यासह अशा प्रकरणातील बारकावे शोधण्यास सुरुवात केली आहे.

रविवारी गोल्डलसिटीत घडलेल्या घटनेच्या तपासात त्याच दिवशी याच दुचाकीवरील दोघा चोरट्यांनी सिन्नर पोलीस ठाण्याच्या हद्दितील नांदूर शिंगोटे येथून एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी ओरबाडली होती, तर सोमवारी (ता.3) संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दितील निमोण येथेही याच दोघांनी असाच प्रकार केल्याचेही समोर आले. वेगवेगळ्या ठिकाणांहून प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेली माहिती, उपलब्ध झालेले सीसीटीव्ही फुटेज आणि त्यातच आता या प्रकरणात नाशिक पोलिसांचीही झालेली एन्ट्री यामुळे गेल्या काही दिवसांत शहरात घडलेल्या अशा घटनांचा उलगडा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

संगमनेर पोलिसांना गोल्डनसिटी, निमोण व नांदूर शिंगोटे या तिनही ठिकाणच्या चोरीनंतर पळून जाणार्या चोरट्यांचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध झाले आहे. त्यासर्व फूटेजमधून चोरट्यांची ओळखही स्पष्ट होत असल्याने ठिकठिकाणच्या पोलीस नोंदी तपासल्या जात आहेत. नाशिक आयुक्तालयाचेही यासाठी सहकार्य घेतले जात आहे. त्यामुळे मागील काही दिवसांत संगमनेर परिसरात घडलेल्या सोनसाखळी चोरीच्या घटना उघड होण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षभराहून अधिक कालावधीपासून संगमनेर पोलिसांकडून पुणे-नाशिक महामार्गावरील बसस्थानक व तीनबत्ती चौक, तसेच बँका आणि रुग्णालयांचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणार्या नवीन नगर रस्त्यावर नाकाबंदी सुरु करीत सरकारी वाहनाची सातत्यपूर्ण गस्तही कायम केली. त्याचा परिणाम शहरातील सोनसाखळी चोरीच्या घटनांना आळा बसला. मात्र गेल्या काही दिवसांपासून नाकाबंदी व बंदोबस्ताचे रस्ते सोडून उपनगरीय रस्त्यांवर अशा घटना घडू लागल्याने पोलिसांची चिंता वाढली आहे, त्यामुळे गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांची गांभिर्याने नोंद घेण्यात आली असून घटनेतील प्रत्येक बारकावा तपासला जात आहे.

