श्रीरामपूरातील लहुजी सेनेचे उपोषण दुसर्‍या दिवशीही सुरूच!

श्रीरामपूरातील लहुजी सेनेचे उपोषण दुसर्‍या दिवशीही सुरूच!
संबंधित विभागाने अद्यापही घेतली नाही दखल; उपोषणार्थींमध्ये तीव्र नाराजी
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात राजरोसपणे सुरू असलेल्या गुटख्यावर बंदी आणावी, तसेच गुटखा विक्री करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी श्रीरामपूर येथील प्रांत कार्यालयाजवळ भारतीय लहुजी सेनेने गुरुवारी (ता.8) उपोषण सुरू केले आहे. शुक्रवारी (ता.9) उपोषणाचा दुसरा दिवस असूनही संबंधित विभागाने अद्याप दखल घेतलेली नाही, अशी माहिती राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.


यावेळी बोलताना भारतीय लहुजी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल म्हणाले, श्रीरामपूर शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात गुटखा बंदी असताना ही गुटखा विक्री मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. अन्न व प्रशासन विभागाने अद्यापही या प्रश्नाकडे पाठ फिरवली आहे. उपोषणाचा शुक्रवारी दुसरा दिवस आहे. याबाबत ठोस पावले न उचलल्यास आंदोलन अधिक तीव्र केले जाईल असा इशाराही बागुल यांनी दिला आहे.


तर राष्ट्रीय सचिव हनिफ पठाण म्हणाले, उपोषणाचा दुसरा दिवस असूनही खुलेआम गुटखा विक्री करणार्‍यांवर कोणतीही कारवाई केली गेली नाही. संबंधित खाते व अधिकारी बघ्याची भूमिका घेत आहे. कोरोनाच्या भीषण परिस्थितीत निकृष्ट दर्जाचा गुटखा घातक विषारी द्रव्ये वापरून तयार केला जात आहे. यामुळे काही तरुणांचे बळी गेले असल्याचे सांगून पठाण यांनी गुटखा बंदीची कठोर अंमलबजावणी करावी अशी मागणी केली. या उपोषणामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल, राष्ट्रीय सचिव हनिफ पठाण, राजेंद्र त्रिभुवन, शेख अहमद नसीर, नितीन जाधव, शुभम बागुल, गिरीश खैरनार सहभागी झाले आहेत. तसेच अनेक नागरिक देखील उपोषणस्थळी भेट देऊन पाठिंबा देत आहे.

Visits: 34 Today: 1 Total: 309846

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *