बालकलाकारांच्या शब्दस्वरांतून उलगडले गीतरामायण! उद्योगपती राजेश मालपाणी अभीष्टचिंतन सोहळा; सरस रचनांनी रसिक मंत्रमुग्ध

नायक वृत्तसेवा, संगमनेर
लहान मुलांचा बहारदार गायन अविष्कार, रामभक्तीच्या साद घालणार्या रचना, गीतगायन-निवेदनातून उलगडणारे रामचरित्र आणि भावभक्तीच्या या सोहळ्यात देहभान हरपून तल्लीन झालेला हजारोंच्या संख्येतील रसिक प्रेक्षक असा माहोल शुक्रवारी संगमनेरच्या जाणता राजा मैदानाने अनुभवला. झी वाहिनीवरील सारेगमप फेम सारंग भालके आणि ध्रुव ग्लोबल स्कूलच्या बाल वाद्यवृंदाचा कलाविष्कार आणि शब्दस्वरांचा अनमोल नजराणा रसिकांसाठी वेगळी आनंदानुभूती देणारा ठरला.

उद्योगपती राजेश मालपाणी यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्यानिमित्त संगमनेरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याच्या पहिल्या दिवशी लिटिल चॅम्प सारंग भालके याच्यासह ध्रुव ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ग. दि. माडगुळकर लिखित व सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतरामायणातील 56 गीतांमधील आठ भावगीतांचे सादरीकरण करीत उपस्थित हजारो प्रेक्षकांना रामराज्याची सफर घडवली.

सुरेल आवाज आणि त्याला साजेशा संगीताची जोड यातून साकारलेल्या ‘दशरथा घे हे पसायदान, राम जन्मला गं सखी राम जन्मला, स्वयंवर झाले सीतेचे, नकोस नौके परत फिरु..’ अशा एकामागून एक सरस रचना आणि प्रत्येक गीतापूर्वी डॉ. संजय मालपाणी यांनी बहारदार निवेदनातून उलगडलेली पार्श्वभूमी यामुळे हाकार्यक्रम अतिशय उंचीवर जावून पोहोचला होता. गीतरामायणाच्या प्रारंभी ध्रुव ग्लोबल स्कूलच्या योगासनपटूंनी सादर केलेल्या सामूहिक योगासन नृत्यातून उपस्थित रसिकांना भक्ती आणि शक्तीचा अनोखा मिलाफही यावेळी अनुभवायला मिळाला.

शुक्रवारपासून सलग चार दिवस संगमनेरातील जाणता राजा मैदानावर होत असलेल्या या सोहळ्यात शनिवार व रविवारी प्रसिद्ध हिंदी कवी, लेखक व साहित्यिक डॉ. कुमार विश्वास यांचा तुफान लोकप्रिय ठरलेला ‘अपने अपने राम’ या भावस्पर्शी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी ध्रुव ग्लोबल स्कूलच्या तीनशे विद्यार्थ्यांकडून वाल्मिकी रामायणातील विविध प्रसंगांना एका माळेत गुंफून साकारलेल्या ‘रामायण’ या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे.

सुमारे 25 हजार प्रेक्षकांच्या बसण्याची सुसज्ज व्यवस्था, वाहनांसाठी जाणता राजा मैदानाकडे येणार्या प्रत्येक रस्त्यावर उभारलेले वाहनतळ, कार्यक्रमस्थळी उभारण्यात आलेले श्रीराम-लक्ष्मण व सीतामातेच्या आकर्षक प्रतिमा असलेले मंदिर, संपूर्ण कार्यक्रमस्थळ व वाहनतळावर सीसीटीव्ही कॅमेर्यांची नजर, उत्कृष्ट ध्वनी व प्रकाश योजना, पाठीमागे बसलेल्या प्रेक्षकांना मंचावरील प्रत्येक गोष्ट स्पष्टपणे दिसावी यासाठी मोठ्या एलईडी पडद्याची सोय याशिवाय जाणता राजा मैदानाच्या परिसरात सुरक्षेची परिपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. शुक्रवार ते सोमवार अशा सलग चार दिवस सादर होणार्या या सर्व कार्यक्रमांना प्रवेश खुला आहे.

शुक्रवारी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पार्श्वगायक कैलास खेर यांच्या ‘कैलासा’ या भावगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र दिल्लीहून येणारे त्यांचे विमान चुकल्याने व नंतरचे विमान उशिरा पोहोचणारे असल्याने ऐनवेळी त्यांचा कार्यक्रम रद्द झाला. त्यामुळे जाणता राजा मैदानात जमलेल्या हजारो रसिकांची निराशा टाळण्यासाठी ऐनवेळी सारंग भालके आणि ध्रुव ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘गीतरामायणा’ने कैलास खेर यांची उणीव भरुन काढल्याची भावना कार्यक्रमानंतर रसिकांच्या चेहर्यावर दिसून आली.
