बीजमाता राहीबाई पोपेरेंनी केली निसर्गावर मात अतिवृष्टीमध्ये भाजीपाला पिकांचे काढले यशस्वी उत्पादन
नायक वृत्तसेवा, अकोले
चालू खरीप हंगामामध्ये सर्वत्र अतिवृष्टीने पिकांना फटका बसला आहे. बहुतेक शेतकर्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले होते. तरी देखील पद्मश्री बीजमाता राहीबाई पोपेरे यांनी निसर्गापुढे हार न मानता भाजीपाला पिकांची यशस्वी लागवड करून बियाणांचे उत्पादन काढले आहे.
अतिवृष्टीच्या संकटातून काही शेतकरी सावरले तर काही शेतकरी जमीनदोस्त झाले. अशीच काही परिस्थिती बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्यावर सुद्धा ओढावली होती. अतिवृष्टीमुळे भाजीपाला पिकांची लागवड त्यांना तब्बल तीन वेळेला करावी लागेल. घरात होते नव्हते हे सर्व बियाणे शेतामध्ये पेरावे लागले. जागतिक तापमान वाढ व हवामान बदलाचा फटका यंदा त्यांच्या शेतीलाही बसला. जिद्दी आणि कष्टाळू राहीबाईंनी निसर्गापुढे हार मानली नाही. संधी मिळताच भाजीपाला पिकांच्या लागवडी त्या करत राहिल्या. चालू हंगामात बियाणे तयार होणार नाही अशीच काहीशी परिस्थिती होती. निराश न होता त्यांनी घरातील सदस्यांना बरोबर घेत पुन्हा एकदा विविध भाजीपाला पिकांची लागवड केली. कारली, दोडका, घोसाळी, वाल, चंदन बटवा, मिरची, टोमॅटो, वांगी, डांगर भोपळा, दुधी भोपळा, काकडी, खरबूज इत्यादी विविध प्रकारच्या भाजीपाला पिकांच्या अस्सल वाणांची लागवड त्यांनी यशस्वी करून दाखवली आहे. जिद्द आणि पूर्णपणे झोकून देत केलेल्या कामामुळे त्यांची बियाणे शेती पुन्हा एकदा बहरली आहे.
राज्यासह इतर राज्यातूनही मोठ्या प्रमाणावर गावरान बियांची मागणी त्यांच्याकडे होत असते. चालू हंगामात अतिवृष्टीमुळे बियाणे निर्मितीवर त्याचा परिणाम झाला आहे. त्यातून सावरत त्यांनी शेतकरी राजासाठी दर्जेदार व अस्सल गावठी बियाणे निर्माण केले आहे. आपल्या घरी येणार्या प्रत्येक शेतकर्याला बियाणे देता यावे यासाठी त्यांनी कळसूबाई परिसर बियाणे संवर्धन सामाजिक संस्था स्थापन केली आहे. बायफ या आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त संस्थेच्या मार्गदर्शनाने ही संस्था आदिवासी भागातील सुमारे 50 गावांमध्ये कार्य करत आहे. जास्तीत जास्त शेतकर्यांनी देशी बियाण्याकडे वळून शेती समृद्ध करावी असे आवाहन पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी केले आहे.