महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष पूर्ण करेल ः तनपुरे

महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष पूर्ण करेल ः तनपुरे
अहमदनगरच्या शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी साधला संवाद
नायक वृत्तसेवा, नगर
‘राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष पूर्ण करेल, यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही. उलट आमची पाच वर्षे व्यवस्थित व अशा पद्धतीने पूर्ण होणार आहेत की, पुढची पाच वर्षे आम्ही तिथेच असणार आहोत,’ असा दावा करत ‘लवकरच सरकार पडेल’ असे सातत्याने सांगणार्‍या भाजप नेत्यांना राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी टोला लगावला आहे. आगामी काळात अहमदनगर जिल्ह्यातील भाजपचे जास्तीत जास्त पदाधिकारी, कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असेही त्यांनी ठासून सांगितले.

पाथर्डी तालुक्यात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे या तालुक्यातील शिरापूर व परिसरात सोमवारी (ता.2) तनपुरे यांनी दौरा करीत तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर ते अहमदनगरच्या शासकीय विश्रामगृहावर आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यातील सरकार सहा महिन्यात पडेल, असे बोलले जात होते. मात्र महाविकास आघाडी सरकार आता एक वर्षे पूर्ण करणार आहे, याकडे तुम्ही कसे पाहता? असे तनपुरे यांना विचारले असता ते म्हणाले, आमचे सरकार पाच वर्ष पूर्ण करणार आहे, यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका राहिली नाही. सरकार हे पाच वर्षे व्यवस्थित व अशा पद्धतीने पूर्ण करणार की, पुढचे पाच वर्षे आम्ही पुन्हा तेथे असणार आहे,’ असेही ते म्हणाले.

पाथर्डी तालुक्यात धुमाकूळ घातलेल्या बिबट्याला नरभक्षक ठरवण्याची प्रक्रिया पूर्ण करून त्याला ठार मारण्याचे देखील आदेश द्यावे, अशी मागणी मी केली होती, असे सांगत तनपुरे पुढे म्हणाले, राज्यातील वरीष्ठ अधिकार्‍यांनीही तशी तयारी दाखवली आहे. तसेच आजही मी सर्व प्रक्रियेचा आढावा घेतला आहे. एक तर बिबट्याला पकडा किंवा ठार मारा, असे निर्देश दिले आहेत, असेही ते म्हणाले. पाथर्डी तालुक्यातील शिरापूर येथे भेट देऊन बिबट्याने ठार केलेल्या मुलाच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत सरकारच्यावतीने दिली आहे. या मुलाच्या कुटुंबीयांच्या नावे दहा लाख रुपये मुदत ठेव ठेवली जाणार आहे. बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू असून बाहेरच्या जिल्ह्यातून तेथे पथक आणले आहेत. 22 ते 25 पिंजरे लावले आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

 

Visits: 89 Today: 1 Total: 1112679

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *