एका दिवसाच्या चार्जमध्ये घाटावरील अवैध धंद्यांचा पर्दाफार्श! श्रीरामपूरच्या उपअधीक्षकांचा छापा; चंदनापुरी घाटातील हायप्रोफाईल वेश्या व्यवसाय उध्वस्थ
नायक वृत्तसेवा, संगमनेर
पुणे-नाशिक महामार्गावर गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात हॉटेल व धाबे निर्माण झाले असून त्यातील काही ठिकाणांना संपर्काचे केंद्र बनवून अवैध व्यावसायिकांनीही आपले बस्तान थाटले आहे. चंदनापुरी घाटातील अशाच एका ठिकाणावर बुधवारी श्रीरामपूरच्या पोलीस उपअधीक्षकांनी छापा घालून तेथील हायप्रोफाईल वेश्या व्यवसाय उघड केला असून सदरचा कुंटणखाना चालविण्यास प्रोत्साहन देणार्या महिलेवर गुन्हा दाखल करीत दोन बंगाली तरुणींची सुटका करण्यात आली आहे. या कारवाईने अशा ठिकाणांचा आडोसा धरुन सुरु असलेल्या अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
याबाबत घारगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरची कारवाई बुधवारी (ता.7) सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटाच्या माथ्यावरील हॉर्टल साईकृपाच्या पाठीमागील तळेवाडी रस्त्यावर हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय सुरु असल्याची माहिती श्रीरामपूरचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांना समजली होती. त्यानुसार त्यांनी तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण आव्हाड यांच्यासह याठिकाणी कारवाईचे नियोजन केले.
बुधवारी सायंकाळी पोलिसांनी बनावट ग्राहकांकडे निशाणी केलेल्या पाचशे रुपयांचा नोटा देवून त्यांना सदरच्या कुंटणखाण्यात पाठवले. त्यावरुन मिळालेली माहिती सत्य असल्याचे स्पष्ट होताच आसपासच्या डोंगराच्या कडेला दबा धरुन बसलेल्या पोलीस पथकाने पोखरी बाळेश्वरच्या शिवारातील एका शेतात उभारलेल्या पत्र्याच्या शेडवर छापा घातला. याठिकाणी अवैध पद्धतीने हायप्रोफाईल वेश्या व्यवसाय सुरु असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी सदरच्या शेतमालकाच्या चाळीस वर्षीय पत्नीला ताब्यात घेत त्याठिकाणाहून अनुक्रमे 30 व 26 वर्षीय बंगाली तरुणींची सुटका केली.
याप्रकरणी महिला पोलीस शिपाई मंगल जाधव यांनी घारगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी सदरचा वेश्या व्यवसाय चालविण्यासाठी जागा उपलब्ध करुन देण्यासह त्याला प्रोत्साहन देणार्या चाळीस वर्षीय महिलेविरोधात महिला व मुलींचे अनैतिक व्यापारास प्रतिबंध करणार्या अधिनियमाच्या कलम 3, 4, 5, 7 व 8 नुसार गुन्हा दाखल करुन सुटका करण्यात आलेल्या दोन्ही परप्रांतीय मुलींची रवानगी अहमदनगरच्या महिला सुधारगृहात केली आहे. या कारवाईत तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात, चालक पो. ना. मनोज पाटील, पोलीस शिपाई नितीन शिरसाठ, महिला पोलीस मंगल जाधव यांचा सहभाग होता.
संगमनेर तालुक्यातील चारही पोलीस ठाण्यांमध्ये सध्या खमक्या अधिकार्यांची वाणवा असल्याने व त्यातच नूतन उपविभागीय पोलीस अधिकार्यांची अद्यापही नियुक्ती नसल्याने तालुक्यात अवैध व्यवसायांचा सुळसुळाट झाला आहे. बुधवारी संगमनेरच्या उपविभागीय पोलीस कार्यालयाचा केवळ एका दिवसाचा ‘चार्ज’ मिळताच श्रीरामपूरचे उपअधीक्षक संदीप मिटके यांनी सदरची कारवाई केली. त्यांना जी गोष्ट एका दिवसांत शक्य झाली, ती घारगावच्या पोलीस निरीक्षकांना आजवर कशी समजली नाही?, अशाप्रकारच्या अवैध व्यवसायांना त्यांचेच तर पाठबळ नाही ना? अशा विविध शंका या कारवाईनंतर व्यक्त केल्या जात आहेत.