संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी शिवारात चोरट्यांची दहशत सह्याद्री विद्यालयातील महिला कर्मचार्‍याचे घर फोडले; दागिन्यांसह कागदपत्रेही चोरली


नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या काही कालावधीपासून संगमनेर तालुक्यातील सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चोर्‍या, घरफोड्यांसह अवैध व्यवसायांचा आलेख उंचावला आहे. त्यात बुधवारी आणखी एका घटनेची भर पडली असून संगमनेरच्या सह्याद्री विद्यालयात कार्यरत असलेल्या महिला कर्मचार्‍याचे कोल्हेवाडीतील घर भरदिवसा फोडून अज्ञात चोरट्यांनी रोकडसह पावणे दोन लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले आहेत. धक्कादायक प्रकार म्हणजे चोरट्यांनी रोख रक्कम व दागिन्यांसह जमिनीची कागदपत्रे, बँकेचे चेक व पासबुक आणि सुमारे साडेचार लाखांच्या मुदत ठेव पावत्याही गायब केल्या आहेत. या घटनेने कोल्हेवाडी पंचक्रोशीत चोरट्यांची दहशत निर्माण झाली असून पोलिसांनी ठोस कारवाई करण्याची मागणी होत आहे.

याबाबत संगमनेर तालुका पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरची घटना काल (ता.7) सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेसहा या वेळेत कोल्हेवाडीत घडली. याप्रकरणी संगमनेर येथील सह्याद्री विद्यालयात कारकून पदावर काम करणार्‍या उज्ज्वला मधुकर कोल्हे यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार बुधवारी नेहमीप्रमाणे त्या सकाळी साडेनऊच्या सुमारास आपल्या घराला कुलूप लावून संगमनेर येथील सह्याद्री विद्यालयात नोकरीच्या ठिकाणी आल्या. दिवसभर विद्यालयातील कामकाज केल्यानंतर सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान त्या कोल्हेवाडी येथील आपल्या घरी परतल्या. यावेळी त्यांच्या घराचा सरकता दरवाजा अर्धवट उघडा असल्याचे पाहून त्यांच्या मनात संशय निर्माण झाला.

त्यामुळे त्यांनी लागलीच आपली मोपेड घरासमोर उभी करुन घरात धाव घेतली असता मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेलेे त्यांना दिसले. त्यातून घरात चोरी झाल्याचा अंदाज आल्याने त्यांनी आपली खोली तपासली तेव्हा खोलीच्या दरवाजाचे कुलूपही कोणीतरी तोडल्याचे त्यांना आढळले. खोलीत अस्ताव्यस्त पडलेले कपडे, उघडी असलेली कपाटं पाहून त्यांना रडूच कोसळले. यावेळी चोरट्यांनी घरातून नेमकं काय नेले आहे याचा अंदाज घेतला असता त्यांच्या कपाटातील सगळ्या चिजवस्तु, रोकड व कागदपत्रे गायब असल्याचे आढळल्याने त्यांना धक्काच बसला. याबाबत त्यांचे नातेवाईक व आसपासच्या नागरिकांनी तालुका पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांनीही तत्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. रात्री उशिराने श्वान व ठसे तज्ज्ञांच्या पथकालाही पाचारण करण्यात आले होते. याप्रकरणी बुधवारी रात्री त्यांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार त्यांच्या घराच्या दोन दरवाजांची कुलपं तोडून अज्ञात चोरट्यांनी कपाटात ठेवलेले अडीच तोळे वजनाचे गंठण, एक तोळ्याची पोत, अर्धा व एक तोळा वजनाचे प्रत्येकी एक सोन्याचे गंठण, तीन जोड्या कानातील सोन्याचे टॉप्स, चांदीच्या तोरड्या, सोन्याचे ओमपान व पाच हजार रुपयांची रोकड असा एकूण 1 लाख 71 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला.

विशेष म्हणजे या घटनेत चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रकमेसह 3 लाख व 1 लाख 40 हजार रुपयांच्या बँकेतील ठेवपावत्या, वेगवेगळ्या तीन बँकांची चेक पुस्तकं व पासबुक आणि चक्क त्यांच्या मालमत्तेचे खरेदीखतही चोरट्यांनी चोरुन नेले. याप्रकरणी त्यांच्या फिर्यादीवरुन संगमनेर तालुका पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात भा.दं.वि. कलम 454, 380 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अरुण आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल एस. आर. बढे यांच्याकडे देण्यात आला आहे. या घटनेने कोल्हेवाडी शिवारात चोरट्यांची दहशत निर्माण झाली असून पोलिसांनी रात्रीप्रमाणे दिवसाही गस्त घालण्याची मागणी होत आहे.

गेल्या काही कालावधीपासून संगमनेर तालुक्यातील चारही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चोर्‍या, घरफोड्यांसह मोटारसायकल चोरीचे प्रकार, किरकोळ चोरीच्या घटना नियमितपणे घडत आहेत. त्यातच शहर व तालुक्यातील अवैध व्यावसायिकांनीही आता डोकेवर काढल्याने संपूर्ण तालुक्यात गुन्हेगारी प्रवृत्तींचा वावर वाढला आहे. घडलेल्या घटनांचे तपासही लागत नसल्याने अशा घटनांमध्ये नागरिकांचा रोषही उफाळून येत असून पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेवून नागरिकांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आहे. कोल्हेवाडीत घडलेला प्रकार दिवसाढवळ्या घडला असल्याने सामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

Visits: 18 Today: 1 Total: 79906

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *