‘बापा’च्या उल्लेखावर अडखळली संगमनेरची निवडणूक! थोरातांचा परिवार सात लाखांचा : डॉ.जयश्री थोरात; लोकशाहीत जनताच मायबाप : डॉ.सुजय विखे पा…


श्याम तिवारी, संगमनेर
विधानसभा निवडणुकांच्या घोषणेसह राज्यातील राजकीय वातावरण तापत असतानाच संगमनेर तालुक्यात आजी-माजी महसूलमंत्र्यांच्या मुला-मुलीकडून सुरु असलेल्या संकल्प आणि संवाद यात्रेतून राजकीय धुरळा उडाला आहे. तळेगावंमधील युवा संकल्प यात्रेच्या निमित्ताने बोलताना माजी खासदार डॉ.सुजय विखे-पाटील यांनी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर सडकून टीका करताना त्यांच्या राजकीय कारकीर्दीला दहशतीचा कालावधी संबोधीत आमच्या कार्यकर्त्यांना हात लावाल तर इथेच गाडून टाकू असे आक्रमक वक्तव्य केले होते. त्याचा समाचार घेताना थोरात यांच्या कन्या डॉ.जयश्री यांनी बाळासाहेब थोरात यांचा परिवार पाच-दहा लोकांचा नव्हेतर सात लाख लोकांचा आहे. खबरदार! माझ्या बापाविषयी बोलाल तर.. अशा शब्दात त्यांना प्रत्यूत्तर दिले होते. त्यावरुन संगमनेरची निवडणूक ‘हॉट’ झालेली असतानाच आता डॉ.विखे-पाटील यांनी पुन्हा एकदा साकूरमध्ये चाळीस वर्षांची दहशत या विषयावर हल्लाबोल करीत लोकशाहीत जनताच मायबाप असल्याचा आमचा आदर्श असताना तालुक्याच्या राजकन्या मात्र जनता नव्हेतर इथला आमदार सगळ्यांचा बाप आसल्याचे सांगत आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच हा इतिहास घडल्याची घणाघाती टीका करीत त्यांनी पुन्हा एकदा डॉ.थोरात यांना चुचकारले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर माजीमंत्री थोरात यांच्या कन्या डॉ.जयश्री कशा शब्दात व्यक्त होतात याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.


पुढील महिन्यात होत असलेल्या राज्य विधानसभेसाठी आजपासून (ता.22) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असताना सत्ताधारी भाजपकडून जाहीर झालेल्या 99 उमेदवारांशिवाय महायुती अथवा आघाडीतील अन्य कोणत्याही पक्षाने अद्याप आपली यादी जाहीर केलेली नाही आणि दोन्ही गटांनी जागावाटपाचे सूत्रही स्पष्ट केलेले नाही. त्यातच काँग्रेसकडून माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या खांद्यावर आघाडीतील समन्वयाची जबाबदारी देण्यात आल्याने त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या कन्या डॉ.जयश्री थोरात यांनी प्रचाराची सूत्र हाती घेतली असून कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी त्यांनी मतदारसंघातील 145 गावांमध्ये ‘युवासंवाद यात्रा’ आयोजित केली आहे.


तर, संगमनेरमधून विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या डॉ.सुजय विखे-पाटील यांनीही येथील उमेदवारीबाबत अद्यापही स्पष्टता नसतानाही ‘युवा संकल्प यात्रा’ आयोजित करुन तळेगावपासून महायुतीच्या प्रचारालाही सुरुवात केली आहे. तळेगावमधील जाहीरसभेत माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका करताना डॉ.विखे-पाटील यांनी थोरातांनी 40 वर्ष सेटलमेंटचे राजकारण केले. आम्ही चाळीस वर्षांची दहशत मोडून काढणार आहोत. जर आमच्या कार्यकर्त्यांना हात लावायचा प्रयत्न केला तर, इथे येवून गाडेल असे विधान केले होते. त्यावरुन संगमनेर तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालेले असतानाच शिर्डी मतदारसंघात मोडणार्‍या तालुक्यातील जोर्वे गटात युवासंवाद यात्रेच्या मंचावरुन बोलताना डॉ.जयश्री थोरात यांनी त्याला जोरदार प्रत्यूत्तर देताना पलटवार केला होता.


त्यावेळी डॉ.थोरात यांनी जेव्हापासून राज्यात खोके सरकार आले आहे, तेव्हापासून त्रास सुरु झाल्याचे सांगत बाळासाहेब थोरात यांनी त्यांचे काय वाईट केले? असा सवाल उपस्थित केला. थोरात साहेबांनी सर्वाधिक काळ राज्याचे महसूलमंत्री म्हणून काम केले पण त्यांनी कधीही कोणाचे वाटोळे केले नाही असा चिमटा काढताना यांनी मात्र खोट्या केसेस करुन लोकांना त्रास दिल्याचा घणाघात केला. यावेळी त्यांनी यावर्षी आपल्याला दोन निवडणुका लढायच्या आहेत असे सांगताना संगमनेरात विरोधकांचे डिपॉझिट जप्त होईलच पण त्यासोबतच शिर्डीत मोडणारी 28 गावे विरोधकांना 2009 सालच्या निवडणुकीची आठवण करुन देतील असे सांगत नाव न घेता थेट महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावरही निशाणा साधला होता.


तळेगावातील डॉ.विखे-पाटलांच्या टीकेचा समाचार घेताना त्या अधिक आक्रमक झाल्या होत्या. यावेळी त्यांनी खबरदार! अशा सज्जड शब्दाचा उच्चार करीत ‘जर माझ्या बापाविषयी असं काही बोलले तुम्ही. हा बाप माझ्या एकटीचा नाहीये, इथे सात लाख पोरा-पोरींचा बाप आहे, सात लाख. ज्यांना स्वतःचे घर सांभाळता आले नाही, ते आपलं घर काय सांभाळणार? असे सवाल उपस्थित करुन त्यांनी यांच्या संस्था कर्जात बुडाल्या, बाभळेश्‍वरचा दूध संघ बंद पाडला, गणेश कारखाना आठ वर्ष बंद ठेवला, राहुरी कारखान्याचे काय झाले अशा विषयांना हात घालताना पुन्हा नाव न घेता महसूलमंत्री विखे-पाटील यांच्यावर शरसंधान साधले.


यासर्व पार्श्‍वभूमीवर सोमवारी (ता.21) साकूरमध्ये डॉ.सुजय विखे-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत युवा संकल्प मेळावा झाला. यावेळी भाजपचे पक्ष निरीक्षक, सुरेंद्रनगरचे आमदार जगदीश मकवाना, शिवसेनेचे विठ्ठल घोरपडे, बाबासाहेब कुटे, मनसेचे किशोर डोके, शिवसेना उद्धव ठाकरे गटातून भाजपमध्ये प्रवेश करणारे उद्धवगटाचे तालुकाप्रमुख गुलाबराजे भोसले यांच्यासह पठारावरील विविध ठिकाणचे शाखाप्रमुख, विद्यार्थीसेनेचे पदाधिकारी, आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी बोलताना माजी खासदार डॉ.सुजय विखे-पाटील यांनी पुन्हा एकदा माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कन्या डॉ.जयश्री यांचे थेट नाव न घेता ‘ताई ओऽ ताई..’ आणि ‘राजकन्या’ असा नामोल्लेख करीत थोरातांवर टीकेचे आसूड ओढले.


यावेळी त्यांनी त्यांनी थेट डॉ.थोरात यांच्या युवासंवाद यात्रेवर घणाघात करीत संवादयात्रा कशाची काढताय? असा सवाल उपस्थित केला. या संवाद यात्रेत दोनच प्रकारची माणसं दिसतात. एकतर त्यांचे कर्मचारी, नाहीतर त्यांच्या घरातील मंडळी किंवा वाळुवाले या पलिकडे कोणीही या यात्रेत नसल्याची जोरदार टीका त्यांनी केली. तुमच्या तालुक्यातील युवक आज सुजय विखे-पाटलाबरोबर आलाय, त्यामुळे तुमची युवा संवाद यात्रा बंद करा अशी कडी रचताना त्यांनी यात्रा काढताय, हरकत नाही.पण त्यातील भाषणं काय हे विचारता सोय नाही असे म्हणत डॉ.थोरात यांच्या जोर्वेमधील ‘त्या’ भाषणाकडे उपस्थितांचे पुन्हा लक्ष वेधले.


संगमनेर तालुक्याच्या राजकन्या असा उल्लेख करीत त्यांनी ‘माझ्या बापाला जर काही बोलाल तर याद राखा!’ या डॉ.थोरातांच्या विधानाला प्रत्यूत्तर देताना; ‘ताई ओऽ ताई.. मी तुमच्या वडिलांबद्दल काहीच बोललो नाही. मी आमदारांबद्दल बोललो होतो. त्यांच्या कार्यपद्धतीवर आणि निष्क्रियतेवर बोललो होतो’ अशा शब्दात त्यांनी पलटवार केला. जो आमदार 40 वर्षांपासून संगमनेर तालुक्याशी, गोरगरीब जनतेशी खिलवाड करीत राहील त्या विषयी बोलू नये? असा सवाल करताना त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने आपल्याला दिलेला तो अधिकार असल्याचे सांगत लोकशाही पद्धतीत एखादा माणूस गरीबांचे रक्त शोषित असेल तर, त्याच्या विरोधात विखे-पाटील परिवार सदैव उभा राहील. आमचे बोलायचे तुम्ही थांबवू शकत नाहीत अशी पृष्टीही डॉ.विखे-पाटील यांनी जोडली.


यांना कधी ऐकण्याची सवयच नसल्याचे सांगत त्यांनी पुन्हा नाव न घेता डॉ.जयश्री थोरात यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. वर्षनुवर्ष तुम्ही लोकांची तोडं दाबून ठेवली, पण आता ऐकायला शिका असा घणाघात करताना त्यांनी आता संगमनेर तालुका गप्प बसणार नाही. तुम्ही कानात कापसाचे बोळे घातले तरीही हा आवाज तुमच्या घरापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. ही परिवर्तनाची नांदी आहे. ही नांदी तालुक्यात तख्तापालट केल्याशिवाय राहणार नाही असे थेट राजकीय आव्हानही त्यांनी दिले. गोष्ट जेव्हा एका बापापर्यंत असेल तेव्हा समजता येतं असे म्हणत त्यांनी पुन्हा ‘त्या’ मुद्दाला हात घातला. आपण पहिल्यांदाच ऐकतोय की बाप एकट्याचा नाही तर सात लाख लोकांचा बाप आहे.


50 वर्ष विखे-पाटील परिवाराने राजकारण केले. स्वर्गीय बाळासाहेब विखे-पाटलांनी जनता हिच मायबाप असते हा आदर्श आम्हाला घालून दिला. महाराष्ट्रातील संगमनेरमध्ये मात्र हा इतिहास पहिल्यांदाच घडला. जीथे या तालुक्याच्या राजकन्या म्हणतात की, जनता नाही इथला आमदार सगळ्यांचा बाप आहे. हे पहिल्यांदाच ऐकायला मिळाले असून आता ही सात लाखांची बेरीज कशी लागायची अशी मिश्किल टीपण्णी करीत त्यांनी डॉ.थोरात यांच्या त्या वक्तव्याची खिल्ली उडवली. तालुक्यातील गोरगरीब, शेतकरी पाण्याअभावी संकटावर मात करीत जगतोय आणि तुम्ही त्यांचा बाप काढायला निघालात? असा सवाल करीत त्यांनी डॉ.थोरात यांचे ते वक्तव्य निवडणुकीच्या केंद्रस्थानी आणण्याचाही प्रयत्न केला.


‘ताई ओऽ ताई..’ येणार्‍या 20 नोव्हेंबरला संगमनेरची जनता दाखवून देईल की या तालुक्याचा बाप कोण आहे. इथे बसलेली सर्वसामान्य जनताच बाप आहे की, या तालुक्याचा आमदार बाप आहे. स्वातंत्र्यापासून सत्ता भोगणारे जर गोरगरीबांचे मायबाप काढणार असतील तर यापेक्षा मोठे पाप नाही. जे वंचित आहेत, शोषित आहेत त्यांच्यावर वर्षनुवर्ष अन्याय झाले. वर्षनुवर्ष शब्द दिले गेले, ते पूर्ण न होताही त्यांना मतदान पडले. आता तरी जागे व्हा आणि एकदा परिवर्तन करुन दाखवा असे आवाहनही डॉ.सुजय विखे-पाटील यांनी केले. आजच्या या मेळाव्याला मोठी उपस्थिती होती. तरुणांकडून वारंवार घोषणा दिल्या जात होत्या. त्यामुळे निवडणूक जशी जवळ येवू लागली आहे, तसे तालुक्यातील राजकीय वातावरणही तप्त होवू लागल्याचे चित्र सध्या बघायला मिळत आहे.


पठारभागात उद्धव गटाला खिंडार..
46 गावांच्या पठारभागातील साकूरमध्ये राहणारे कट्टर शिवसैनिक गुलाबराजे भोसले यांच्यासह आसपासच्या गावांमधील अनेक शाखाप्रमुख, कार्यकर्ते, शिवसैनिक यांनी डॉ.सुजय विखे-पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. भोसले यांना पठारावरील हिंदुत्त्ववाद्यांची तोफ समजले जाते. त्यामुळे संपूर्ण पठारभागातील तरुणांमध्ये त्यांचा चांगला प्रभाव आहे. निष्ठावान शिवसैनिक म्हणून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना एकनिष्ठ असलेल्या गुलाबराजे भोसले यांच्यासह माजी तालुकाप्रमुख बाबासाहेब कुटे, संदीप खिलारी, अ‍ॅड.अमित धुळगंड, उज्ज्वला गुळवे या प्रमुख पदाधिकार्‍यांसह पठारावरील दहा गावांमधील सरपंच, अन्य पदाधिकारी व सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंच्या तालुकाप्रमुखांनी आपल्या समर्थकांसह पक्ष सोडल्याने पठारभागातील पक्षाची ताकद क्षीण झाली आहे.

Visits: 4 Today: 4 Total: 83028

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *