मालपाणी उद्योग समूह सेवक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी राजेश डुबे बिनविरोध निवडीची चार दशके; उपाध्यक्षपदी राहुल शेरमाळे तर, सचिवपदी कविता गुंजाळ

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या चार दशकांहून अधिक कालावधीपासून मालपाणी उद्योग समूहातील कर्मचार्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य निर्माण करणार्या शेठ दामोदर मालपाणी उद्योग समूह सेवक पतसंस्थेच्या पदाधिकार्यांच्या निवडी जाहीर झाल्या आहेत. स्थापनेपासूनच निवडणूकरहित असलेल्या या संस्थेच्या नूतन अध्यक्षपदी राजेश डुबे, उपाध्यक्षपदी राहुल शेरमाळे तर सचिवपदी कविता गुंजाळ यांची एकमताने निवड करण्यात आली. संस्थेच्या कार्यालयात झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत पदाधिकार्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली, त्याला संचालक मंडळाने टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला.

कर्मचार्यांच्या आर्थिक अडचणी सोडविता याव्यात यासाठी उद्योगपती स्वर्गीय ओंकारनाथ मालपाणी यांच्या प्रेरणेतून 1981 साली मालपाणी उद्योग समूहातील कामगार-कर्मचार्यांसाठी ही पतसंस्था सुरु करण्यात आली. स्थापनेपासून ऑडिट वर्ग अ असलेल्या या संस्थेचे 31 मार्च अखेरचे एकूण भाग भांडवल 5 कोटी 66 लाख 86 हजार रुपये असून सभासदांना 6 कोटी 92 लाख 82 हजार रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. यावर्षी संस्थेला 43 लाख 75 हजार रुपये नफा झाला असून सभासदांना 6.57 टक्के लाभांश वाटण्यात आला आहे.
![]()
कर्मचार्यांनी आपल्याच पैशांतून उभ्या केलेल्या या संस्थेने उद्योग विश्वातील कामगार-कर्मचार्यांसाठी नवा आदर्श निर्माण केला असल्याचे उद्योग समूहाचे चेअरमन राजेश मालपाणी यांनी यावेळी सांगितले. भविष्यात या संस्थेच्या माध्यमातून कर्मचार्यांसाठी विविध उपक्रम राबविले जावेत अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. मालपाणी उद्योग समूहाचे संचालक डॉ. संजय मालपाणी, मनीष मालपाणी, गिरीश मालपाणी, सीए. प्रशांत रुणवाल, ओंकार तिवारी, महिन्द्र राठोड, शिवाजी आहेर, गणेश वीसपुते आदिंनी नूतन पदाधिकार्यांचे अभिनंदन केले आहे. संस्थेच्या कार्यालयात पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत नवनिर्वाचित पदाधिकार्यांसह सर्वश्री संतोष आगलावे, योगेश खालकर, संतोष राऊत, योगेश म्हसे, गणेश जाधव, संजय वाकचौरे, वैशाली गडगे व नितीन हासे आदी संचालक उपस्थित होते.
