वसतिगृहातील सात विद्यार्थ्यांना लाकडी दांडक्याने मारहाण शिरपुंजे आश्रमशाळेतील वसतिगृह अधीक्षकाचे अमानुष कृत्य


नायक वृत्तसेवा, अकोले
शिरपुंजे आश्रमशाळेतील सात आदिवासी विद्यार्थ्यांना शेकोटी पेटविल्याच्या कारणातून येथील वसतिगृह अधीक्षक अश्विन पाईकराव याने जळत्या लाकडाने बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. याचा पालकांसह तालुक्यातून निषेध होत असून, वसतिगृह अधीक्षकावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

अशोक संतु धादवड, यूवराज भाऊ धादवड, बाबू संतु धादवड, दत्ता सोमनाथ धादवड, ओमकार भीमा बांबळे व गणेश लक्षमण भांगरे यांनी शेकोटी पेटविल्याचे कारण देत अधीक्षक पाईकराव याने विद्यार्थ्यांना अंगावर वळ उमठेपर्यंत मारहाण केली आहे. वसतिगृह अधीक्षक पाईकराव यांनी केलेल्या या अमानुष कृत्याचा पालकांसह तालुक्यातून निषेध होत आहे. याची आमदार डॉ. किरण लहामटे यांनीही तत्काळ राजूर ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केलेल्या विद्यार्थ्यांना भेटून दिलासा दिला. तर प्रकल्प अधिकारी राजेंद्र भवारी यांना पाईकराव याला तत्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले. याचबरोबर डेमोक्रेटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया (डी.वाय.एफ.आय.) या युवक संघटनेनेही तीव्र शब्दांत धिक्कार केला आहे.

आदिवासी समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी कम्युनिस्ट पक्षाचे तत्कालीन आमदार बी. के. देशमुख यांनी सभागृहात आश्रमशाळांची संकल्पना राज्यभर राबविण्याची जोरदार मागणी केली होती. परिणामी तत्कालीन सरकारला या संकल्पनेच्या परिणामकारकतेचा अभ्यास करण्यासाठी बी. के. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमावी लागली होती. समितीने दिलेल्या अहवालाच्या आधारे राज्यभर आश्रमशाळा व आदिवासी विद्यार्थी वसतिगृहे सुरु करण्यात आली. स्थापन झालेल्या या आश्रमशाळांमधून हजारो, लाखो आदिवासी विद्यार्थी उच्चपदांपर्यंत पोहचले.

आश्रमशाळांचा पॅटर्न राज्यभर पोहचविणार्‍या बी. के. देशमुखांच्या तालुक्यात मात्र आज आश्रमशाळांची दैना झाली आहे. भ्रष्टाचाराने पोखरल्यामुळे या आश्रमशाळा विद्यार्थ्यांसाठी यातनागृह बनल्या आहेत. शिक्षण सोडाच साधे नीट जेवण व निवासाची साधी व्यवस्थाही आश्रमशाळांमध्ये होत नाही असे भीषण वास्तव तालुक्यात निर्माण झाले आहे. भरीस भर अत्यंत उद्दाम अधिकार्‍यांची या आश्रमशाळांमधून नियुक्ती झाल्याने विद्यार्थी आश्रमशाळांमध्ये प्रवेश टाळू लागले आहेत. शिरपुंजे आश्रमशाळेत घडलेल्या अमानुष मारहाणीने हीच बाब अधोरेखीत केली आहे. प्रशासनाने सदरची बाब लक्षात घेता मारहाण प्रकरणाची सखोल चौकशी करावी. चौकशी पूर्ण होईपर्यंत अधीक्षक पाईकराव यांना निलंबित करावे. चौकशी अंती दोषी आढळल्यास या अधीक्षकास कायम स्वरूपी कामावरून काढून टाकावे. आश्रमशाळांची दुरावस्था दूर करण्यासाठी ठोस पावले उचलली जावीत अशा मागण्या डेमोक्रेटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडियाचे (डी.वाय.एफ.आय.) अहमदनगर जिल्हाध्यक्ष एकनाथ मेंगाळ, सरचिटणीस गोरख अगिवले, कार्यकारिणी सदस्य वामन मधे, नाथा भहुरले, वाळीबा मेंगाळ, अजित भांगरे, सुरेश गिर्‍हे यांनी केल्या आहेत.

माजी आमदार वैभव पिचड यांची भेट घेऊन स्थानिक नागरिक व पालकांनी मारहाणीबाबत माहिती दिली. प्रकल्प अधिकारी राजेंद्र भवारी यांचेकडे पालकांनी तक्रार दाखल केली असून भवारी यांनी संबधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

Visits: 116 Today: 4 Total: 1109717

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *