अखेर ‘त्या’ तिघा प्रयोगशाळा तंत्रज्ञांवर ‘बोगस’ डॉक्टर म्हणून कारवाई! सामाजिक कार्यकर्ते गणेश बोर्हाडे यांच्या आत्मदहनाच्या इशार्याने यंत्रणा हलली..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
स्वाक्षरी करण्याची पात्रता नसूनही चक्क रुग्णालयातील प्रयोगशाळा तंत्रज्ञाचा पदभार सांभाळण्यासह त्यांच्या निष्कर्ष अहवालांवर सह्या ठोकणार्या संगमनेरातील तीन प्रयोगशाळा तंत्रज्ञांवर ‘बोगस’ डॉक्टर म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यातील दोघांवर सहा महिन्यांच्या विलंबाने तर एकावर रडतखडत कारवाई करण्यात आल्याने आश्चर्यही व्यक्त होत आहे. वरील तिनही ‘बोगस’ डॉक्टरांवर कारवाईसाठी सामाजिक कार्यकर्ते गणेश बोर्हाडे यांनी देखील मागणी करीत आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यावर प्रांताधिकार्यांनी बैठक घेत मंगळवारी (ता.10) कारवाईचे आदेश दिल्यानंतर आता शहरातील दोघांसह घुलेवाडी शिवारातील एका बोगस डॉक्टरवर महाराष्ट्र वैद्यकीय अधिनियम 1961 च्या कलम 33 अन्वये संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईने शहरातील पॅथोलॉजीकलसह वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार घुलेवाडी शिवारात असलेल्या एका मोठ्या धर्मदाय रुग्णालयातील प्रयोगशाळेची जबाबदारी डी.एम.एल.टी शिक्षण आर्हता असलेल्या नितीन द्रुपद माळी यांच्याकडे आहे. 2 जून ते 6 ऑगस्ट या कालावधीत माळी यांनी प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून मान्यता नसतांना व तशी शिक्षण आर्हता नसतांनाही रुग्णांच्या रक्त, लघवी, थुंकी अथवा इतर नमून्यांच्या चाचणी अहवालांवर प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून स्वाक्षर्या केल्या. या प्रकरणी प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे यांच्या दालनात झालेल्या बैठकीत या विषयावर साधकबाधक चर्चा होवून त्यांनी तालुका वैद्यकीय अधिकार्यांना संबंधितावर तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार निमोण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.दीपिका संतोष पालवे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

तसेच शहरातील रुग्णालयांचा परिसर म्हणून परिचित असलेल्या नवीन नगर रस्त्यावरील दिशा पॅथोलॉजीकल लॅबमधील विकास कडलग व सुधा नवले यांच्यावरही वरीलप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी 4 मार्च 2021 रोजी एका रुग्णाचा अहवाल अशाच पद्धतीने अधिकार नसतांना स्वाक्षरी करुन दिला होता. मात्र संबंधिताला पॅथोलॉजीकल अहवालांवर स्वाक्षरी करण्याचा अधिकार नसल्याची बाब लक्षात आल्यानंतर ‘त्या’ रुग्णाच्या नातेवाईकांनी अहमदनगरच्या जिल्हा शल्यचिकित्सकांकडे तक्रार केली होती. त्यांनी संगमनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा बोगस डॉक्टर शोध समितीचे (शहर) अध्यक्ष डॉ.सचिन बांगर यांना याबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार डॉ.बांगर यांनी शहरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.मच्छिंद्र साबळे यांना गेल्या मार्चमध्येच कारवाई करण्याबाबत सूचना दिली होती, मात्र डॉ.साबळे गेल्या पाच महिन्यांपासून प्रत्यक्ष गुन्हा दाखल करण्यात टाळाटाळ करीत होते.

या दोन्ही विषयांवर रुग्णांच्या संबंधित अन्य पाच मुद्द्यांवर कारवाई होत नसल्याने हतबल झालेले सामाजिक कार्यकर्ते गणेश बोर्हाडे यांनी ‘अखेर’ कारवाईसाठी थेट ‘आत्मदहना’चा निर्णय घेतला होता. त्याची दखल घेत गेल्या मंगळवारी (ता.10) उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे यांनी संबंधित सर्व अधिकार्यांची बैठक बोलावून प्रलंबित विषयांबाबत अधिकार्यांची झाडाझडती घेतली. यावेळी शहरी विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.साबळे यांच्यावरही ताशेरे ओढण्यात आले. या बैठकीनंतर 48 तासांतच डॉ.साबळे यांनी दिशा पॅथोलॉजीकल लॅबच्या विकास कडलग यांच्यासह त्यांना साहाय्य करणार्या सुधा नवले यांच्यावर महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम 1961 च्या कलम 33 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईने संगमनेरातील पॅथोलॉजीकल लॅबचालकांसह वैद्यकीय व्यावसायिकांमध्येही मोठी खळबळ उडाली आहे.

12 डिसेंबर 2017 रोजी विशेष अनुमती याचिकेवरील सुनावणीच्या वेळी सर्वोच्च न्यायालयाने केवळ विकृती चिकित्सा (पॅथोलॉजी) विद्याशाखेत पदव्यूत्तर अभ्यास पाठ्यक्रम पूर्ण करणार्या नोंदणीकृत वैद्यक व्यवसायी प्रयोगशाळेतील तपासण्यांचे अहवाल स्वाक्षरीत करु शकतात असा महत्त्वपूर्ण निर्वाळा दिला होता. मात्र या उपरांतही संगमनेरातील काही रुग्णालयांसह काही विकृती चिकित्सा प्रयोगशाळांमध्ये अशा प्रकारच्या तपासण्या नोंदणीकृत विकृतीशास्त्रज्ञांच्या देखरेखीखाली होत नाहीत. एकाचवेळी वरील तिघांवर दाखल झालेल्या गुन्ह्यातून हिच गोष्ट अधोरेखीत होत असून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही सामाजिक कार्यकर्त्याला त्यासाठी ‘आत्मदहना’चा इशारा द्यावा लागला होता.

