संगमनेरच्या वीज वितरण कंपनीतील ‘कसाब’ची खात्यातंर्गत कसून चौकशी! दैनिक नायकच्या वृत्तमालेची पालकमंत्र्यांकडून दखल; चौकशी अहवालात कारवाईचा प्रस्ताव?..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्य सरकारच्या वीज वितरण कंपनीचे संगमनेर कार्यालय आपणास आंदण मिळाल्याचे समजून मनमानी कारभार करणार्‍या आणि सर्वसामान्य वीज ग्राहकांना पैशांसाठी नागविणार्‍या ‘कसाब’च्या पापाचा घडा अखेर भरला. बांधिलकी जनहिताची असे ब्रीदं घेवून गेल्या सहा वर्षांपासून वाचकांच्या सेवेत असलेल्या दैनिक नायकने संगमनेरच्या वीज कंपनीतील या भ्रष्ट अधिकार्‍याच्या कारभाराची पोलखोल केली होती. सलग चार दिवस चाललेल्या या लेखमालेतून स्वतःच्या कार्यालयातच ‘कसाब’ नावाने ओळखल्या जाणार्‍या या दुय्यम अधिकार्‍याचे वेगवेगळे कारनामे आणि त्यातून भ्रष्ट झालेल्या संपूर्ण यंत्रणेवरच जळजळीत प्रकाश टाकला गेला. दैनिक नायकमधील या वृत्तमालेची राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गंभीर दखल घेतली असून ‘कसाब’ची खात्यातंर्गत चौकशी करण्यात आली असून त्याचा अहवाल अधीक्षक अभियंत्यांकडे सोपविण्यात आला आहे.

गेल्या काही वर्षांपासून संगमनेरच्या वीज वितरण कंपनीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळला आहे. त्यातच संगमनेर शहर विभागाची जबाबदारी मात्र नाशिकमध्ये वास्तव्यास असलेल्या एका दुय्यम अधिकार्‍याने सरसकट प्रत्येक कामातून पैसा कमावण्यास सुरुवात केल्याने त्याच्या हाताखाली काम करणार्‍या तब्बल आठ कनिष्ठ अभियंत्यांसह वीज कंपनीतील कर्मचार्‍यांमध्येही प्रत्येक कामात पैसा शोधण्याची स्पर्धा लागली होती. त्यामुळे सर्वसामान्य वीज ग्राहकांच्या तक्रारींना न्याय मिळानासा झाल्याने वीज वितरण कंपनीच्या कारभाराबाबत जनमानसात संताप खदखदत होता. संगमनेर मर्चन्टस बँक व व्यापारी असोसिएशनचे माजी अध्यक्ष तथा संगमनेरातील प्रतिथयश व्यापारी श्रीगोपाळ पडतानी यांच्या घरचे वीज कनेक्शन परस्पर कापल्यानंतर दैनिक नायकने या विषयाची माहिती घेतली असता त्यातून भ्रष्टाचाराचे कुरण समोर आल्याने गेल्या बुधवारपासून त्यावर जळजळीत प्रकाश टाकणारी वृत्तमाला सुरु करण्यात आली होती.

ठेकेदार हेच जीवन मानून काम करणार्‍या वीज कंपनीतील ‘कसाब’ला सामान्य ग्राहकांशी काहीएक घेणं नसतं. त्याची सेवा फक्त वीज कंपनीचा भलामोठा पगार लाटणे आणि मिळालेल्या अधिकारातून ठेकेदार व दलालांना हाताशी धरुन बक्कळ पैसा कमावणे यासाठीच असल्याचे वास्तव या वृत्तमालेतून समोर आले. संगमनेरसारख्या जिल्ह्यातील प्रगत शहरातील वीज कंपनीत फोफावलेला भ्रष्टाचाराचा हा वटवृक्ष सामान्य ग्राहकांसाठी मात्र मनस्ताप देणारा ठरत होता. ग्राहकांचे मीटर बदलून देणे, वेळेवर रिडींग न घेतले जाणे, अव्वाच्या सव्वा बिलं वितरित करणे, परंतु त्याबाबत ग्राहकांना साधानकारक उत्तर न देणं अशा नियमित तक्रारी असतानाही त्याची साधी दखल घेण्यासही कोणी पुढे येत नव्हते. त्यामुळे सामान्यांना तासन् तास वीज मंडळात ठाण मांडावे लागत, मात्र त्यानंतरही त्यांच्या पदरी निराशाच पडत असल्याने नागरीकांच्या मनात वीज कंपनीबाबत रोष निर्माण झाला होता.

या सर्व घटनाक्रमाची नोंद घेवून दैनिक नायकने आपल्या चार दिवसांच्या लिखानातून शहरी विभागातील ‘कसाब’ नावाने ओळखल्या जाणार्‍या त्या अधिकार्‍यासोबतच त्याच्या हाताखाली काम करणारे आठ कनिष्ठ अभियंते व ‘सागर’ नावाने परिचित असलेला हंगामी कर्मचारी यांचे विविध कारनामे उजेडात आणले. त्यातूनच शहरातील जवळपास तीन हजारांहून अधिक ग्राहकांना खराब मीटर बदलून पाहिजे असतांना या ‘कसाब’कडे वितरणासाठी आलेले पाचशेहून अधिक नवीन मीटर केवळ त्यातील ‘कट’ आपल्यापर्यंत पोहोचला नाही म्हणून त्याने दोन महिने दाबून ठेवले होते. मात्र इतका गंभीर प्रकार घडूनही या घटनेची संगमनेरच्या कार्यकारी अभियंत्यांनी कोणतीही दखल घेतली नव्हती हे विशेष. ठेकेदारांकडून दुपारी ‘बिर्याणी’ आणि संध्याकाळी ‘दारु’ मिळवणारा हा ‘कसाब’ सायंकाळी चक्क अंडाभुर्जीच्या हातगाड्यांवर पडद्यामागे तोंड लपवून मद्यपानही करीत असल्याने वीज मंडळाची लक्तरं अक्षरशः वेशीवर टांगली गेली होती.

या सर्व गोष्टी दैनिक नायकच्या वृत्तमालेतून उघड झाल्यानंतर राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्याची गांभीर्याने दखल घेतली व अहमदनगरचे अधीक्षक अभियंता सुनील काकडे यांना या ‘कसाब’ची खात्यातंर्गत चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार त्यांनी संगमनेरचे कार्यकारी अभियंता अनिल थोरात यांना त्याची चौकशी करुन तत्काळ अहवाल सादर करण्यास सांगितले. कार्यकारी अभियंता थोरात यांनी त्यानुसार सखोल चौकशी करुन आपला सीलबंद अहवाल अधीक्षक अभियंत्यांकडे सोपविला व त्यांनीही त्यावर आपला ‘शेरा’ मारुन पुढील कारवाईसाठी तो नाशिकच्या मुख्य कार्यकारी अभियंत्यांकडे पाठविला आहे. या दरम्यान अधीक्षक अभियंता सुनील काकडे यांची पदोन्नतीवर मुंबईत बदली झाल्याने व त्याबाबत आदेश मिळताच त्यांनी तत्काळ नगरच्या अधीक्षकपदाचा पदभार सोडल्याने नेमकी कोणती कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे याबाबत माहिती उपलब्ध झाली नाही.

मात्र येत्या दोन दिवसांत नवीन अधीक्षक अभियंता त्यांची जागा घेणार असून त्यानंतरच कारवाईचे विवरण समोर येणार आहे. याबाबत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या यंत्रणेकडूनही माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला असता दैनिक नायकमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनेक मुद्द्यांमध्ये संबंधित अधिकारी दोषी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्यांचे निलंबन प्रस्तावित असण्याची शक्यता त्यांच्याकडून वर्तविण्यात आली आहे. सदरची वृत्तमाला सुरु झाल्यापासून ‘कसाब’ नावाने ओळखला जाणारा हा दुय्यम अधिकारी संगमनेरात आलेला नाही हे विशेष.


राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशाने संगमनेरच्या वीज वितरण कंपनीतील ‘कसाब’ची खात्यातंर्गत चौकशी पूर्ण झाली आहे व त्यांच्या चौकशी अहवालातून त्यांच्यावर कारवाई देखील प्रस्तावित करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज संगमनेर व्यापारी असोसिएशनद्वारा संगमनेरच्या कार्यकारी अभियंत्यांची भेट धेतली जाणार असून प्रतिथयश व्यापारी श्रीगोपाळ पडतानी यांचे वीज कनेक्शन तोडल्याबाबत जाब विचारला जाणार आहे.

Visits: 22 Today: 2 Total: 118058

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *