जहागिरदारवाडीत फुलली सूर्यफुलाची आदर्श शेती प्रयोगशील शेतकरी बाळू घोडे यांचा यशस्वी प्रयोग


नायक वृत्तसेवा, अकोले
कळसुबाईच्या पायथ्याशी असलेल्या जहागिरदारवाडी येथील प्रयोगशील शेतकरी बाळू घोडे व विमल घोडे या पती-पत्नीने आपल्या प्रयोगशील कृतीने नेहमीच आदर्श घडवला आहे. सूर्यफुलाची आदर्श शेती फुलविल्याने असंख्य शेतकरी आणि पर्यटक त्यांची शेती पाहण्यासाठी आवर्जुन भेट देत आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातील शेवटचे टोक म्हणून ओळखले जाणारे बारी आणि जहागिरदारवाडी ही गावे निसर्गाच्या कुशीत वसलेली टुमदार गावे आहेत. इथला शेतकरी काबाडकष्ट करून आपली शेती फुलवितो. जहागिरदारवाडीतील बाळू व विमल घोडे हे अत्यंत कष्टाळू कुटुंब आपल्या शेतीत सातत्याने नवनवीन प्रयोग करत असतात. त्यांच्या या प्रयोगशील शेतीमध्ये त्यांची मुले केशव आणि रूपाली हे सुद्धा तेवढ्याच आवडीने सहभागी होतात. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी मिश्र पीक पद्धती आपल्या शेतावर करून शेतीतील वेगळेपण त्यांनी जपले आहे.

सप्टेंबर महिन्यामध्ये हुलगा, राजगिरा व सूर्यफुलाची एकत्रित पद्धतीने पेरणी केली. त्यांची शेती छोट्या-छोट्या तुकड्यांमध्ये विखुरलेली आहे. सिंचनाच्या कुठल्याही सोयी उपलब्ध नसल्याने पावसाच्या पाण्यावर ते शेती करतात. मेहनत आणि कष्ट यावर संपूर्ण भरोसा ठेवत यंदाही सुंदर पद्धतीने शेती फुलवली आहे. एकाच पिकाच्या मागे न लागता मिश्र पीक पद्धतीचा अवलंब केला आहे. सध्या त्यांच्या शेतात फुललेले सूर्यफूल सर्वांचे लक्ष वेधत आहे. सूर्यफुलाचे पारंपारिक वाण ते गेली चार ते पाच दशके आपल्या शेतात करत आले आहेत. पावसाळा संपल्यानंतर जमिनीतील ओलीवर होऊ शकणारे पिके आपल्या जमिनीत ते करतात. चालू हंगामात सुद्धा नियोजनबद्ध शेती करताना त्यांनी वेगळा आदर्श घालून दिला आहे. खुरसणी, भुईमूग व सूर्यफूल यांचे एकत्रित तेल पाडून ते दैनंदिन आहारामध्ये वापरतात. त्यामुळे भेसळयुक्त तेलांपासून त्यांना मुक्तता मिळते. मुंबई येथील एएसके फाउंडेशन आणि बायफ संस्थेचे त्यांना नियमित मार्गदर्शन लाभत आहे.

Visits: 102 Today: 1 Total: 1103090

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *