महाराजस्व अभियानातून शिवार रस्त्यांचे स्वप्न झाले साकार सावरगाव तळचे पोलीस पाटील गोरक्ष नेहेंनी घेतला पुढाकार

नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील सावरगाव तळ येथे महसूल विभागाच्या महत्वाकांक्षी महाराजस्व अभियानातून शेतकर्यांचे आपल्या शेती व घरापर्यंत पोहचण्याचे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे.
![]()
सावरगाव तळ येथील विठ्ठल बाजीराव नेहे, जालिंदर सोपान नेहे, शांताराम सोपान नेहे, रावसाहेब यादव नेहे या चार शेतकर्यांना घरापर्यंत जाण्यासाठी पायी वाट सुद्धा व्यवस्थित नव्हती. तर रघुनाथ लहानू नेहे, नंदराम सीताराम नेहे, बाळासाहेब सिताराम नेहे, रोहित सोमनाथ नेहे, मनाजी मार्तंड नेहे आदी दहा शेतकर्यांना त्यांच्या पंधरा हेक्टर शेतीत जाण्या येण्यासाठी रस्त्याची अतिशय गैरसोय होती. या शेतकर्यांना आपला शेतमाल अंदाजे एक किलोमीटरपर्यंत डोक्यावर वाहतूक करावा लागत असे. यातून या शेतकर्यांना प्रचंड मानसिक, शारीरिक त्रास सहन करावा लागत असे. आपल्या गावातील शेतकरी बांधवांची ही अनेक वर्षांची रस्त्याची समस्या सोडविण्यासाठी गावचे पोलीस पाटील गोरक्ष नेहे यांनी पुढाकार घेतला.

यात संबंधित सर्व शेतकर्यांशी चर्चा करून प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे आणि तहसीलदार अमोल निकम यांना माहिती कळविली असता त्यांनी सविस्तर मार्गदर्शन करून या सर्व संबंधित शेतकर्यांना महसूल विभागाचे महाराजस्व अभियानातून हा रस्ता खुला करण्याची एक चांगली संधी असल्याचे शेतकर्यांना पटवून दिले. यामुळे या सर्व दहा शेतकर्यांनी हा रस्त्या तयार करण्यासाठी सहमती दर्शविली.

मात्र रस्ता तयार करताना रघुनाथ नेहे, विठ्ठल नेहे, सोपान नेहे यांचे घरांचे तसेच नंदराम नेहे यांच्या शेततळ्याची अडचण होत होती. परंतु आपल्या जीवनातील ही समस्या कायमची सुटत असल्याने या शेतकर्यांनी आपल्या घरांचा व शेततळ्याचा सुद्धा मागेपुढे विचार केला नाही व मनाचा मोठेपणा दाखवत हा रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करताना आपली सक्रीय घरे व शेततळेही या शेतकर्यांनी काढून घेतले. गावचे पोलीस पाटील गोरक्ष नेहे पाटील यांच्या पुढाकाराने हा शिवार रस्ता तयार झाल्याने अनेक वर्षांच्या संघर्षदायी जीवनात खर्या स्वातंत्र्याची पहाट झाल्याची भावना शेतकर्यांनी व्यक्त केली.

सरकारी कर्मचारी म्हणजे तलाठी, ग्रामसेवक, मंडळ अधिकारी यांचा संप सुरु असताना गावपातळीवरील शासन प्रतिनिधी म्हणून पोलीस पाटील गोरक्ष नेहे यांनी पुढाकार घेऊन महसूल विभागाच्या महाराजस्व अभियानातून हा शिवार रस्ता तयार करून वाहतुकीला खुला केला ही पोलीस पाटील यांची कामगिरी कौतुकपात्र आहे.
– अमोल निकम, तहसीलदार-संगमनेर
