शाळकरी मुलीला वाचविणारी कार महामार्गावर पलटी डोळासणे शिवारातील घटना; एक ठार आठ गंभीर जखमी


नायक वृत्तसेवा, घारगाव
पुणे-नाशिक महामार्ग ओलांडण्याच्या प्रयत्नात असलेल्या शाळकरी मुलीला वाचविण्यास कार चालकाने अचानक कारचा ब्रेक दाबल्याने कार पलटी झाली. या अपघातात कारमधील एकजण जागीच ठार झाला तर मुलीसह आठजण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (ता. 18) दुपारी तीन वाजेच्या सुमारास डोळासणे शिवारात घडली आहे.

याबाबत डोळासणे महामार्ग मदत केंद्राच्या पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, नाशिक येथे अस्थी विसर्जन करून नारायणगाव येथील डेरे कुटुंब हे कारमधून (क्र. एमएच. 14, केबी. 8714) नाशिक-पुणे महामार्गाने पुण्याच्या दिशेने नारायणगाव येथे घरी परतत होते. दरम्यान, शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ते बांबळेवाडी (डोळासणे) शिवारात आले असता वैष्णवी मेंगाळ ही शाळकरी मुलगी दुभाजकाच्या झाडाझुडपांतून अचानक रस्ता ओलांडण्यासाठी रस्त्यावर आली. त्यावेळी कारचालक विनायक डेरे यांनी मुलीला वाचविण्यासाठी कारचा अचानक ब्रेक दाबला. कार भरधाव वेगात असल्याने ब्रेक दाबताच कार पाच ते सहावेळा पलटी होऊन 500 मीटरवर महामार्गाच्या खाली जाऊन थांबली. यात कारचे टायर फुटले असून मोठे नुकसान झाले आहे.

तर कारमधील विजय शंकर डेरे (वय 62, रा. नारायणगाव, जि. पुणे) यांचा मृत्यू झाला असून रोहित विजय डेरे (वय 23), उज्ज्वला विजय डेरे (वय 48), मोहित विजय डेरे (वय 30), सविता अनिल शेटे (वय 48), शैला दिलीप वारुळे (वय 58), विनायक शिवाजी डेरे (वय 50, सर्व रा. नारायणगाव, पुणे), शोभा दशरथ वायाळ (वय 54, रा. नांदूर, नाशिक) यांच्यासह रस्ता ओलांडणारी शाळकरी मुलगी वैष्णवी विश्वास मेंगाळ (वय 12, सध्या रा. बाळेश्वर आश्रमशाळा, सारोळे पठार, मूळ गाव रा. पाटगाव आळेफाटा पुणे) हे गंभीर जखमी झाले आहेत.

या अपघाताची माहिती मिळताच डोळासणे महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी, पोलीस हवालदार अरविंद गिरी, पोलीस नाईक नंदकुमार बर्डे, भरत गांजवे, योगीराज सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रुग्णवाहिकेतून संगमनेर येथील रुग्णालयात दाखल केले. अपघातादरम्यान रस्त्यावर बराच काळ वाहतूक खोळंबली होती. महामार्ग पोलिसांनी ही वाहतूक सुरळीत केली.

Visits: 154 Today: 2 Total: 1959049

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *