अल्पवयीन मुलीचा पाठलाग करणार्यास सहा महिन्यांचा कारावास! आश्वी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रकार; संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
सतरावर्षीय अल्पवयीन मुलीचा वारंवार पाठलाग करणे, मोबाईल क्रमांक मिळवून त्यावर अश्लील संदेश पाठविणे, दमदाटी करुन जवळीक साधण्याचा प्रयत्न करणे अशा विविध कारणांवरुन आश्वी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील 23 वर्षीय आरोपीला संगमनेरचे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश योगेश मनाठकर यांनी सहा महिने सश्रम कारावास आणि 15 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. अक्षय प्रमोद पराड असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबतची हकीकत अशी की, डिसेंबर 2018 ते एप्रिल 2019 या पाच महिन्यांच्या कालावधीत मनोली येथील अक्षय प्रमोद पराड (वय 23) याने लगतच्या ग्रामीण भागात राहणार्या एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग सुरु केला. सदरील मुलीने वेळोवेळी त्याच्या या प्रकारांना विरोध केला, मात्र त्याने त्याकडे दुर्लक्ष करीत कधी उघडपणे तर कधी लपून-छपून दुचाकीवरुन आपला उद्योग सुरुच ठेवला. त्या दरम्यान आरोपीने पीडित मुलीचा मोबाईल क्रमांक मिळवून त्यावरुन तिला फोन करणे, अश्लील संदेश पाठवणे, याशिवाय वेळोवेळी ती जात असलेल्या रस्त्यावर पुढे जावून दुचाकीच्या आरशातून तिच्याकडे टक लावून बघणे.

सदरील मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असतानाही तिला दमदाटी करीत तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करणे अशा विविध कारणांनी सदरील मुलगी अक्षरशः वैतागली होती. अखेर तिने आपल्या कुटुंबियांना याबाबत सविस्तर माहिती सांगितल्यानंतर त्यांनी त्याचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी कायदेशीर कारवाईचा मार्ग पत्करला आणि 9 एप्रिल 2019 रोजी आश्वी पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात कायदेशीर तक्रार दाखल केली. त्यावरुन पोलिसांनी आरोपी अक्षय प्रमोद पराड (वय 23, रा.मनोली, ता.संगमनेर) याच्या विरोधात भा.दं.वि. कलम 354 (अ) (ड) सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणार्या कायद्याचे (पोक्सो) कलम 11, 12 नुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली.

या प्रकरणाचा संपूर्ण तपास आश्वी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक दत्तात्रय उजे यांनी पूर्ण करुन आरोपीविरोधात संगमनेरच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. सदर खटल्याचे कामकाज अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश आर. आर. कदम यांच्यासमोर चालले. या खटल्यात सरकारी पक्षाच्यावतीने सहा साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी अभियोक्ता म्हणून कामकाज पाहताना संजय वाकचौरे यांनी अशाप्रकारच्या खटल्यांमध्ये वरिष्ठ न्यायालयांनी दिलेले निकाल, पोलिसांनी केलेला तपास आणि साक्षीदारांची साक्ष याबाबत जोरदार युक्तीवाद केला.

या प्रकरणात पीडित मुलीने न्यायालयासमोर नोंदविलेली साक्ष महत्त्वाची ठरली. दोन्ही बाजूचा युक्तीवाद, न्यायालयासमोर आलेले साक्षी व पुरावे या आधारे सरकारी पक्षाचा दावा ग्राह्य धरुन अतिरीक्त जिल्हा न्यायाधीश योगेश मनाठकर यांनी ओरापीला या प्रकरणात दोषी ठरवताना आरोपी अक्षय प्रमोद पराड याला पोक्सोच्या कलम 12 अंतर्गत सहा महिन्यांचा सश्रम कारावास व 15 हजार रुपये दंड, दंडाची रक्कम न भरल्यास आणखी एका महिन्याच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. गेल्या तीन वर्षांपासून सुरु असलेल्या या खटल्याकडे आश्वी पंचक्रोशीचे लक्ष लागून होते. या खटल्याचे संपूर्ण कामकाज सरकारी अभियोक्ता संजय वाकचौरे यांनी पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक सुनील सरोदे, पोलीस हेडकॉन्स्टेबल पी. डी. डावरे, चंद्रकांत तोर्वेकर, महिला पोलीस शिपाई एस. बी. डोंगरे, कोर्ट ऑर्डिली, महिला पोलीस स्वाती नाईकवाडी व दीपाली दवंगे यांनी यांनी सहकार्य केले.

