अनोख्या विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकर्‍यांनी उपटला टोमॅटोचा फड! पठारभागातील तांगडी येथील टोमॅटो उत्पादक शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात

नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील आंबीखालसा गावांतर्गत असलेल्या तांगडी येथील अर्जुन गंगाधर गाडेकर या टोमॅटो उत्पादक शेतकर्‍यासह इतर शेतकर्‍यांच्या सोन्यासारख्या असलेल्या टोमॅटो पिकावर अनोख्या विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याने संतप्त झालेल्या टोमॅटो उत्पादक शेतकर्‍यांनी थेट टोमॅटोची झाडेच उपटून शेतीच्या बांधावर टाकण्याचा सपाटा सुरू केला आहे. लाखो रुपये खर्च करुनही पदरी काहीच पडत नसल्याने शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडले आहेत.

पठारभाग म्हटला की दुष्काळ हे समीकरणच आहे. त्यातूनही मार्ग काढत शेतकरी मोठ्या हिंमतीने शेती पिकवत उदरनिर्वाह करत आहेत. पाण्याचे उद्भव कमी असूनही उत्तम शेती करण्याचा आदर्शही येथील शेतकर्‍यांना घालून दिलेला आहे. परंतु, एकामागून एक येणार्‍या संकटांनी शेतकरी अक्षरशः हतबल झाले आहेत. कोरोना संकटामुळे शेतीपिकांना बाजारभाव मिळाले नाही, त्यात निसर्ग चक्रीवादळ आणि अवकाळीचा तडाखा असे एक ना अनेक संकटांचा मुकाबला करत शेतकर्‍यांनी टोमॅटो पिकांची लागवड केली आहे. परंतु, आंबीखालसा गावांतर्गत असलेल्या तांगडी येथील अर्जुन गाडेकर या शेतकर्‍यासह इतर शेतकर्‍यांनी लाखो रुपयांचा खर्च करुन टोमॅटोचे फड फुलविले. पिकही जोमात आले. मात्र, नियतीचा घाला पडल्याने अनोख्या विषाणूचा प्रादुर्भाव होऊन संपूर्ण फडच उध्वस्त झाला आहे. फळ टणक बनून आतून काळे पडल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

आधीच महागडी औषधे फवारुन फड उभा केला. त्यात विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याने मोठे उत्पन्न मिळेल या भाबड्या आशेवर अक्षरशः पाणी फिरले. ही फळे बाजारात नेली असता व्यापारी त्यांच्याकडे डोकावून पहायलाही तयार नाहीत. याला वैतागून अखेर संतप्त टोमॅटो उत्पादकांनी कोणताही विचार न करता संपूर्ण फडच उपटून टाकत झाडे बांधावर टाकली आहे. एकामागून एक येणारे संकटे झेलत नव्या उमेदीने उभ्या राहिलेल्या शेतकर्‍यांना सतत आर्थिक झळा सोसाव्या लागत असल्याने शेतकर्‍यांनी डोक्यालाच हात लावला आहे.

कोरोना संकट, चक्रीवादळ आणि अवकाळीच्या तडाख्यातून सावरुन टोमटो पिकाची लागवड केली होती. त्यासाठी एक लाख रुपयांच्या वर खर्च आला आहे. परंतु, कोरोनानंतर टोमॅटोवर अनोख्या विषाणूचा शिरकाव झाल्याने फळे खराब होत आहे. बाजारात ही फळे घेण्यास कुणीही धजावत नसल्याने फडच उपटून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
– अर्जुन गाडेकर (टोमटो उत्पादक, तांगडी)

Visits: 11 Today: 1 Total: 119114

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *