आंबड-पाडाळणे रस्त्याची दयनीय अवस्था परिसरातील ग्रामस्थांचा आंदोलन करण्याचा इशारा
नरेंद्र देशमुख, अकोले
तालुक्यातील आंबड ते पाडाळणे रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग जाणीवपूर्वक कानाडोळा करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. जर याची दखल घेऊन रस्त्याची दुरूस्ती केली नाही तर तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडू असा इशारा देखील दिला आहे.
या रस्त्यावरुन विद्यार्थी व शेतकर्यांची नेहमी ये-जा असते. परंतु, सद्यस्थितीत रस्ता पावसामुळे चिखलमय झाला आहे. यापूर्वी रस्त्याच्या कामाबाबत पाडाळणे, शेलद, आंबड या ग्रामपंचायतींनी अनेकदा रस्ता दुरुस्तीची मागणी करून तसा ठराव घेऊन पाठपुरावा केला. परंतु, संबंधित विभागाने ते कचर्याच्या डब्यातच टाकून दिल्याचे चित्र आहे. अजूनही साधे खड्डे देखील बुजविले नसल्याने नागरिकांत संतापाचे वातावरण आहे.
दरम्यान, माजी आमदार वैभव पिचड यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत आंबड-पाडाळणे रस्त्याचा पाठपुरावा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तोंडी व लेखी स्वरूपात केला होता. मात्र राज्यातील व तालुक्याची सत्ता बदलली म्हणून त्यांनीही जनतेच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. विद्यमान लोकप्रतिनिधी डॉ. किरण लहामटे यांच्याकडूनही जनतेला अपेक्षा होती. परंतु, त्यांनीही भ्रमनिरास केला आहे. अनेकदा मुळा विभागात जाताना त्यांनी याच रस्त्यावरुन प्रवास केला आहे. मग रस्त्याला पडलेले खड्डे व दुरावस्था त्यांना दिसली नाही का? असा सवाल नागरिकांनी विचारला आहे. प्रवरा व मुळा विभागातील पाडाळणे, शेलद, पैठण, आंभोळ, चिंचावणे व आदिवासी वाड्या-वस्त्यांवर व गावांना जाण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा हा रस्ता आहे. मात्र, सद्यस्थितीत रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने प्रवास करताना कसरत करावी लागत आहे. यात छोटे-मोठे अपघात होवून दुखापतही होत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने नवीन रस्ता लवकरात लवकर केला नाही तर परिवारातील नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येऊन कोल्हार-घोटी रस्त्यावर आंदोलन करतील असा इशारा संबंधित गावांतील सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ यांनी दिला आहे.