… अद्यापही अकोले आगारातून बस धावेना! प्रवाशांची होतेय गैरसोय; तर खासगी वाहनांकडून होतेय लूट

नायक वृत्तसेवा, अकोले
विविध मागण्यांसाठी एसटी बस कर्मचार्यांचा मागील अडीच महिन्यांपासून संप सुरू आहे. या कालावधीत अकोले आगारातून अद्याप एकही बस धावलेली नाही. जिल्ह्यातील 11 आगारांपैकी सध्या नऊ आगारांतून थोड्याफार प्रमाणात बस सुटत असल्याने प्रवाशांची गैरसोय टळत आहे. मात्र, आदिवासी आणि विस्तीर्ण असलेल्या अकोले तालुक्यात बस धावत नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.

गेल्या अडीच महिन्यांपासून एसटी कर्मचार्यांचे काम बंद आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे एसटीची सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. आजअखेर एसटीचे एक हजार 269 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. सध्या जिल्ह्यात खासगी वाहतूक जोमाने सुरू आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील काही बसस्थानकांतून खासगी वाहने प्रवासी घेत आहेत. त्याचा फटका आगामी काळात एसटीला बसणार आहे. संपामुळे एसटीच्या अहमदनगर विभागाला सुमारे 40 कोटींपेक्षा जास्त नुकसान झाले आहे.

सध्या जिल्ह्यात नऊ आगारांतून 120 बसच्या माध्यमातून जिल्ह्यासह जिल्ह्या बाहेरील प्रवाशांना सुविधा पुरविली जात आहे. 120 बसच्या माध्यमातून दैनंदिन 250 फेर्या होत आहे. याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. बसची संख्या वाढू लागल्याने खासगी वाहतूकदारांचे धाबे दणाणले असून, अव्वाच्या सव्वा भाडे आकरणी आता बंद होऊ लागलेली आहे. परंतु, अकोले आगारातून अद्याप एकही बस रस्त्यावर आली नसल्याने आगाराचे नुकसान होत आहे. विस्तीर्ण आणि आदिवासी असलेल्या तालुक्यातील नागरिकांचा प्रवास मुख्यत्वे एसटी बस अवलंबून आहे. मात्र, बसेस आगाराच्या बाहेर पडल्या नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. याचबरोबर अनेक महत्त्वाच्या कामांसाठी दूरवर जाण्यासाठी साधनांची सोय नसल्याने नागरिक हतबल होत आहे.
