जिल्ह्यासह संगमनेर तालुक्याच्या दैनिक सरासरीत झाली वाढ! पहिल्या पंधरवड्यात दिलासा मिळाल्यानंतर सरासरीला चिंताजनक गती..

नायक वृत्तसेवा, संगमनेर

जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात जिल्ह्यातील बहुतेक सर्व तालुक्यातील दैनंदिन रुग्ण समोर येण्याच्या सरासरीत घसरण झाल्याने संक्रमणाची दुसरी लाट ओसरत असल्याचे दिलासादायक चित्र निर्माण झाले होते. मात्र जिल्ह्यातील काही असंवेदनशील नागरिकांनी पुन्हा एकदा असंवेदनशीलतेचे दर्शन घडवण्यास सुरुवात केल्याने त्याचा फटका आता संपूर्ण जिल्ह्यालाच बसला असून ओसरलेली लाट वारंवार उसळी घेत असल्याने जिल्ह्याच्या चिंता वाढल्या आहेत. दररोजच्या रुग्णगतीत वाढ झाल्याने जिल्ह्यातील सक्रीय रुग्णांची संख्याही साडेसहा हजारांच्या घरात गेली असून रुग्णालये पुन्हा गजबजू लागली आहेत. रविवारच्या तुलनेत जिल्ह्यासह संगमनेर तालुक्याच्या एकूण रुग्णसंख्येत आज घट झाली, मात्र सरासरी उंचावलेलीच असल्याने हा दिलासा तात्पुरताच ठरण्याची शक्यता आहे. आज जिल्ह्यात 628 तर संगमनेर तालुक्यात 52 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

नियमांना तिलांजली देवून राज्यासह जिल्ह्यात राजकीय कार्यक्रमांसह लग्नसोहळे, दहावेबारावे व वाढदिवसाच्या कार्यक्रमांनी कोविडला निमंत्रण धाडले आणि मार्चपासून जिल्ह्यात संक्रमणाची दुसरी लाट येवून मोठ्या प्रमाणात नागरिक जायबंदी झाले. या कालावधीत अनेकांना उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला. धामधुमीचा हा भयानक कालावधी जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने अनुभवला. कोविडचे दुसरे संक्रमण वाढण्यास कारणीभूत ठरलेल्या गोष्टींची मिमांसाही झाली आणि असे प्रकार घडू नये यासाठी मंथनासह नियमांची जंत्रीही जाहीर झाली. मात्र त्याचा परिणाम शून्यच असल्याचे सध्या संक्रमणाला आलेल्या गतीवरुन दिसू लागले आहे. 16 जुलैपासून भरीला आलेल्या संक्रमणाने जिल्ह्यातील सरासरीची गती फुगविली असून पहिल्या पंधरवड्याच्या सरासरी 466 रुग्णगतीवरुन थेट 684 रुग्णांवर उसळी घेतली आहे. प्रत्येक दिवसाला सुमारे दोनशे रुग्णांची वाढ अत्यंत चिंतादायक असून कोविडकडे असेच दुर्लक्ष सुरु राहील्यास जिल्हा पुन्हा एकदा निर्बंधांच्या उंबरठ्यावर उभा राहीला आहे.

संगमनेर तालुक्याची अवस्थाही अशीच असून सुरुवातीच्या 1 ते 15 जुलै या पंधरा दिवसांत तालुक्यात सरासरी 45 रुग्ण दररोज या वेगाने अवघे 677 रुग्ण समोर येवून संक्रमण आटोक्यात येत असल्याचे चित्र दिसत असतांना मागील अकरा दिवसांतच हे चित्र धुसर बनले आहे. सध्या जिल्ह्यासह तालुक्याच्या संक्रमणाची गतीही वाढली असून गेल्या 11 दिवसांत तालुक्यातून सरासरी 78 रुग्ण या वेगाने बाधित समोर येत आहेत. मागील 26 दिवसांत सरासरीचा वेग वाढत जावून आजअखेर 59 रुग्ण दररोज या सरासरीने तालुक्यातील 1 हजार 535 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून सक्रीय रुग्णांची संख्याही साडेपाचशेच्या पुढे गेली आहे. संक्रमणाच्या गतीमध्ये झालेली ही वाढ संगमनेरकरांची चिंता वाढवणारी असून तालुक्यात जिल्ह्यातील दुसर्‍या क्रमांकाचे रुग्ण समोर येत आहेत.

आज शासकीय प्रयोगशाळेचे 20, खासगी प्रयोगशाळेचे 18 व रॅपीड अँटीजेनचे 14 अशा एकूण 52 अहवालातून तालुक्यातील रुग्ण समोर आले. त्यात अकोले तालुक्यातील दोघांसह शहरातील चौघांचा समावेश आहे. उर्वरीत 46 रुग्ण ग्रामीणभागातील 29 गावांमधून समोर आले आहेत. पठारभागातून रुग्ण समोर येण्याची श्रृंखला अद्यापही कायम असून आजही पठारावरील अकरा गावांमधून 23 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आजच्या अहवालात शहरातील नवीन नगर रस्त्यावरील 57 वर्षीय इसमासह संगमनेर असा पत्ता असलेल्या 58 वर्षीय इसमासह 30 वर्षीय महिला व 25 वर्षीय तरुणाचा समावेश आहे. याशिवाय अकोले तालुक्यातील 42 23 वर्षीय तरुणांचाही संगमनेरच्या एकूण रुग्णसंख्येत समावेश आहे.

तालुक्यातील ग्रामीणभागात वाढलेले संक्रमण आजही कायम असून आजच्या अहवालातून पठारावरील साकूर येथील 24 22 वर्षीय तरुणांसह 18 वर्षीय तरुणी व 16 वर्षीय मुलगी, आंबी दुमाला येथील 38 वर्षीय महिला, नांदूर खंदरमाळ येथील 56 वर्षीय इसम, बोटा येथील 65 45 वर्षीय महिला, कुरकूटवाडीतील 65 32 वर्षीय महिलांसह 14 वर्षीय मुलगी, हिवरगाव पठार येथील 40 वर्षीय महिलेसह 27 20 वर्षीय तरुण, कालेवाडीतील 35 वर्षीय महिला, कर्जुले पठार येथील 55 वर्षीय इसमासह 14 वर्षीय मुलगी, बिरेवाडीतील 40 वर्षीय तरुणासह 28 वर्षीय महिला, मांडवे बु. येथील 40 वर्षीय महिला व शिंदोडी येथील 84 वर्षीय वयोवृद्धासह 70 35 वर्षीय महिलांचा समावेश आहे.

याशिवाय तालुक्यातील अन्य ठिकाणच्या तळेगाव येथील 52 वर्षीय इसम, कोकणेवाडीतील 35 वर्षीय तरुण, कनोली येथील 56 वर्षीय महिला, धांदरफळ येथील 55 30 वर्षीय महिला, 35 वर्षीय तरुण व 22 वर्षीय तरुणी, सुकेवाडीतील 75 वर्षीय महिला, कोल्हेवाडीतील 35 वर्षीय तरुण, चिखली येथील 18 वर्षीय तरुणी, निमज येथील 30 वर्षीय महिला, पिंपळगाव माथा येथील 40 वर्षीय महिलेसह 39 वर्षीय तरुण, निंभाळे येथील 31 वर्षीय तरुण, पिंपळे येथील 20 वर्षीय तरुणी, पानोडी येथील 65 वर्षीय महिलेसह 20 वर्षीय तरुण, निमगाव पागा येथील 55 27 वर्षीय महिला, निमगाव जाळी येथील 55 वर्षीय इसम, जाखुरी येथील 25 वर्षीय तरुण, जोर्वे येथील 34 वर्षीय महिला व सोनोशी येथील 35 वर्षीय तरुण अशा एकूण 52 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून तालुक्याची एकूण रुग्णसंख्या आता 24 हजार 358 झाली आहे.

3 जूननंतर पहिल्यांदाच रविवारी (ता.25) जिल्ह्याची रुग्णसंख्या एक हजाराच्या पुढे गेली. मात्र आज त्यात पुन्हा मोठी घट झाल्याने जिल्ह्याला काहीसा दिलासा मिळाला आहे. आज प्राप्त झालेल्या अहवालांमधून जिल्ह्यातील 628 जणांना कोविडची लागण झाल्याचे समोर आले असून त्यात पारनेर 83, नगर ग्रामीण 81, कर्जत 65, पाथर्डी 62, संगमनेर 52, अहमदनगर महापालिका क्षेत्र 49, शेवगाव 47, राहुरी 28, जामखेड 27, श्रीगोंदा 25, कोपरगाव 24, अकोले 21, नेवासा 20, राहाता 16, इतर जिल्ह्यातील 12, श्रीरामपूर पाच व लष्करी रुग्णालयातील एकाचा समावेश आहे. आजच्या रुग्णवाढीने जिल्हा आता 2 लाख 94 हजार 386 रुग्णसंख्येवर पोहोचला आहे. जिल्ह्यातील सक्रीय रुग्णांची संख्याही साडेसहा हजारांच्या घरात पोहोचली आहे.

Visits: 12 Today: 1 Total: 116690

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *