मोबाईलच्या अतिवापरामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान ः मदने चंदनेश्वर विद्यालयात गणेशोत्सवानिमित्त व्याख्यानमाला

नायक वृत्तसेवा, संगमनेर
सध्याच्या काळात शालेय शिक्षणाच्या व्यवस्थेमध्ये ऑनलाईन शिक्षण व मोबाईलच्या सततच्या वापरामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे पूर्ण दुर्लक्ष झाले असून सोशल मीडिया, यू-ट्युबच्या वापरामुळे मुलांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. यातून अभ्यासाची क्षमता कमी झाल्याने मुलांनी आता तरी मोबाईल न वापरता पुस्तकी ज्ञानावर अधिक भर द्यावा व मोबाईलपासून होणार्या दुष्परिणामांपासून सावध व्हावे. त्यातून होणारी गुन्हेगारी वृत्ती देखील वाढत असल्याने आपलं आयुष्य हे गुन्हेगारी स्वरूपाचं होऊ नये त्यासाठी मोबाईलचा उपयोग टाळावा, असे आवाहन संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांनी केले.

संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी येथील ‘एक गाव एक गणपती’ निमित्ताने चंदनेश्वर विद्यालयात आयोजित व्याख्यानमाला कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर जनता शिक्षण प्रसारक मंडळचे अध्यक्ष आनंद कढणे, पत्रकार संघाचे जिल्हा निवड समितीचे अध्यक्ष सोमनाथ काळे, विद्यालयाचे प्राचार्य अशोक खेमनर, उपप्राचार्य के. जी. रहाणे, उपसरपंच भाऊराव रहाणे, पोलीस पाटील ज्ञानदेव रहाणे, उपमुख्याध्यापक सुनील कढणे, जीवन गिरगुणे आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना पोलीस अधिकारी मदने म्हणाले, माझे शिक्षण देखील ग्रामीण भागातच झाले आहे. त्यावेळी मी शालेय अभ्यासाबरोबर क्रीडा क्षेत्रात राज्य पातळीवर पदक मिळवले असून त्यातूनच मी आज आपल्या समोर पोलीस उपाधीक्षक म्हणून उभा आहे. राज्य शासनाने देखील क्रीडा क्षेत्राततून येणार्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांमध्ये पाच टक्के जागा आरक्षित केल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रातून आपले नाव लौकिक करून अधिकारी व्हावे. तसेच शालेय मुलींनी जीवनात होणार्या त्रासाबद्दल किंवा होणार्या छेडछाडीबद्दल जर कोणी तुम्हाला ब्लॅकमेल करत असेल अशा मुलांना पाठिशी न घालता संबंधित गुन्हेगाराची तक्रार शाळेकडे करा किंवा आमच्याकडे करा त्याची योग्य ती दखल घेतली जाईल, असे आश्वासन दिले. सूत्रसंचालन योगेश साळुंखे यांनी केले. प्रास्ताविक प्राचार्य अशोक खेमनर यांनी केले तर आभार सुनंदा उगले यांनी मानले.
